अमृतानुभव एवं चांगदेव पासष्टी (सन्त ज्ञानेश्वर - चिद्विलासवाद एवं अद्वैत अनुभूति सटीक)
Amritanubhava and Changdev Pasashti of Sant Jnanadev
सन्त ज्ञानेश्वर / ज्ञानदेव महाराज द्वारा
४८ सार्थ अमृतानुभव
अनुभवा ही ठावोवारी । आपुलीच अनवसरी ॥ तेथें अक्षराची
हारी । वाइल काई ॥ ६२ ॥ कां परेसी पडे मिठी । तेथें नादा
सळु नुठी ॥ मी वावरीजेल वोठीं । हें कें आहे ॥ ६३ ॥ चेइलिया
पाठीं । चेत्रगयाच्या गोष्टी ॥ कीं धाला बैसें पाठी । रंधनाच्या
॥ ६४ ॥ उदेलिया दिवसपती । तैं कीं दिवें सेजें येती ॥
वांचूनि पिकलां शेती । सुइजताती नांगर काई ॥ ६५ ॥ म्हणोनि
बंधमोक्षाचें व्याज । नाहीं निमालें काज ॥ आतां निरूपण
मोज । वोळगे जरी ॥ ६६ ॥ आणि पुढील कां आपणापें ।
वस्तु विसराचेनि हातें हारपें ॥ मग शब्देंचि घेपे । आठवूनियां
॥ ६७ ॥ येतुलियाही परौते । चांगावें नाहीं शब्दांतें ॥ जरी
स्मारकपणें कीर्तीतें । मिरवी हा जगीं ॥ ६८ ॥
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते सच्चिदानंद
पदत्रयविवरणं नाम पंचमप्रकरणं संपूर्णम् ॥
परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाची अशी दशा होते, मग त्या
ठिकाणीं शब्दांची काय मातब्बरी ? ६२. ज्याचें वर्णन करतांना परावाणी
लुळीं पडते, जेथें नादाची सत्ता असत नाहीं, त्या परमात्म वस्तूचें तोंडानें
वर्णन करता येईल कां ? ६३. जागा झाल्यानंतर जागें करण्याच्या गोष्टी
कशाला ? अगर तृप्त झालेला पुरुष स्वयंपाक करण्याच्या भानगडींत कशाला
पडेल? ६४. सूर्योदय झाल्यावर दिवे मालवतात; शेत पिकल्यावर त्यांत कोणी
कशाला नांगर धरील ? ६५. म्हणून बंधमोक्षाचें निमित्त नाहीं, कार्य संपलें,
तरी हें निरूपण कौतुकानें प्राप्त झालें आहे. ६६. आणि दुसऱ्याला किंवा
आपल्याला स्वस्वरूपवस्तूविषयीं विसर पडला असेल, तर त्या वस्तूविषयीं
शब्दच स्मृति करून देतो, असा अनुभव आहे. ६७. परमात्म्याची स्मृति
करून देणारा हा शब्द त्याचें स्मारक म्हणून जगांत कीर्ति मिरवीत असला
तरी त्याच्याजवळ यापेक्षां जास्त चांगुलपणा नाहीं. ६८. याप्रमाणें श्रीमत्
अमृतानुभवग्रंथांतील सच्चिदानंद पदत्रयविवरण प्रकरण पांचवें समाप्त झालें.
प्रकरण पांचवें समाप्त
प्रकरण सहावें
बाप उपेगी वस्तु शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ॥ अमूर्ताचा
विशदु । अरिसा नव्हे ॥ १ ॥ पाहते अरिसा पाहे । येथे
कांहींचि नवल नव्हे ॥ परी दर्पणें येणें होये । न पाहतें पाहतें
॥ २ ॥ वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योतकार सूर्य जैसा ॥
येणें एकें गुणें आकाशा । अंबरत्व ॥ ३ ॥ आपण तंव खपुष्प ।
परी फळ दे जगद्रूप ॥ शब्द मवी तैं अमुप । कोण आहे
॥ ४ ॥ विधिनिषेधाचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ॥ बंध-
मोक्ष कळीकटा । शिष्ट हाचि ॥ ५ ॥
शब्द ह्या शब्दांतील अक्षरें अत्यंत उपयुक्त तर आहेतच; पण आठवण
करून देणारा म्हणूनहि 'शब्द' हा विख्यात आहे. ह्या अक्षरांना, व्यक्त
नसलेल्या परमात्म्याला स्पष्ट करून दाखविणारें जसें आरसेंच म्हणूं नये
काय ? १. डोळ्यांनी पाहणारा आरशांत पाहील यांत कांहीं विशेष नाहीं;
पण हा अध्यात्मशास्त्ररूप दर्पण असा विशिष्ट गुणवान् आहे कीं, त्यांत
अंधसुद्धां पाहूं शकतात, ज्ञानी होतात. २. शब्द हा मूळ मायेच्या वंशां-
तला; रवीसारखा कुलदीप आहे. शब्दाच्या या एका गुणामुळेंच आभा-
ळाला अंबर म्हणतात. ३. स्वतः आकाशाचें फूल असला तरी शब्द
जगाची सिद्धि करवितो. शब्दानें मोजतां येत नाहीं असा कोणता पदार्थ
आहे सांगा पाहूं ? ४. ही शब्दरूपी मशाल विधिनिषेधाच्या वाटा दाखविते.
एखाद्याला बंध आणि दुसऱ्या एखाद्याला मोक्ष अशा वेगवेगळ्या
तऱ्हा सांगून दोघांत भांडण लावणारा हा शब्द मोठा शिष्टच दिसतो
कीं ! ५.
सा. अ. ...४
५० सार्थ अमृतानुभव
हाचि अविद्येचा आंगीं पडे । तैं नाथिले ऐसें रूढे ॥ न
लाहिजे तीन कवडे । साचा वस्तु ॥ ६ ॥ शुद्धा शिवाच्या
शरीरीं । कुमारु हा जीउ भरी ॥ जेवि आंगे पंचाक्षरी । तेविचि
बोलु ॥ ७ ॥ जीव देहे बांधिला । तो बोलें एकें सुटला ॥ आत्मा
बोलें भेटला । आपणपया ॥ ८ ॥ दिवसातें उगो गेला । तंव
रात्रीचा द्रोहो आला ॥ म्हणोनि सूर्यो या बोला। उपमा नव्हेचि
॥ ९ ॥ जे प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुद्धा इया हातु धरिती ॥
मग शब्दाँचि चालती । एकलोंनि ॥ १० ॥ सहाय आत्मविद्येचें ।
करावया आपण वेचे ॥ गोमटे काय शब्दाचें । एकैक वानूं
॥११॥ किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु । परी ययाही
संबंधु । नाहीं येथें ॥ १२ ॥
अविद्येची बाजू घेऊन शब्द हा हें खोटें दिसणारें जग खरें आहे असें
दाखवितो तेव्हां सद्रूप परमात्म्याला तीन कवडीहि किंमत उरत नाहीं. ६.
ज्याप्रमाणें पंचाक्षरी हा अक्षता फेकून पिशाच्चाला बोलावितो, नेमका
तसाच हा शब्द 'जीवेश्वर भाव' उमटवितो. ७. शुद्ध परमात्मारूप जीव
हा देहाच्या सान्निध्यानें बद्ध झाला असला तरी तो श्रुतिशब्दरूप महा-
वाक्यानें देहसंबंधांतून अलग होतो. मग आपलें आपल्यालाच शुद्ध परमा-
त्मस्वरूप भेटतें तेंहि शब्दानेंच ८. सूर्य दिवसाचा उदय करावयास गेला
असता रात्रीचा मात्र नाश करतो, म्हणून सूर्याची उपमा शब्दाला देणें
बरोबर नाहीं. ९. पण प्रवृत्ति आणि निवृत्ति ह्या एकमेकीविरुद्ध असणाऱ्या
दोघींना एकमेकींचे हात धरून शब्द मात्र चालवितो. १०. शब्दांचा
चांगुलपणा किती सांगावा ! हा आत्मविद्येची प्राप्ति करून देण्यांत
स्वतःचा नाश करून घेतो. ११. अधिक काय बोलावें ? स्मरण करून
देण्यांत शब्द प्रसिद्ध आहे हें खरे, पण ब्रह्माच्या ठिकाणीं स्मरणाचा संबंध
येतोच कोठें ? १२.
प्रकरण सहावें ५१
आत्मया बोलाचें । कांहींच उपयोगा न वचे ॥ स्वसंवेद्या
कोन्हाचें । ओझें आधी ॥ १३॥ आठवे कां विसरे । विषयो
होऊनि अवतरे ॥ तरी वस्तूशीं वस्तु दुसरे । असेना कीं ॥१४॥
आपण आपणयातें । आठवी विसरे केउते ॥ काय जिभ जिभेतें ।
चाखे न चाखे ॥ १५॥ जागणेया नीद नाहीं । मा जागणें
घडे काईं । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैशीं ॥ १६ ॥
सूर्यो रात्री पां नेणे । मा दिवो काय जाणे । तेवी स्मरणास्मरणें ।
आपण वस्तु ॥ १७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरी स्मारकें
काज काई ॥ म्हणोनि इये ठाई । बोलू न सरे ॥ १८ ॥
आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं शब्दांचा उपयोग कांहींच नाहीं. स्वसंवेद्य
परमात्म्याला कोणाची मदत लागत नाहीं. १३. स्मरण होवो, विस्मरण
होवो, अथवा विषयांचे रूपाने प्रकट होवो, तरी पण एक वस्तूच, दुसरें
कांहीं नाहीं. १४. स्वतःचें स्वतःला स्मरण किंवा विस्मरण कसे संभवणार ?
जीभ स्वतःला चाखते किंवा चाखत नाहीं हें म्हणणें योग्य आहे का ?
१५. जागणाऱ्याला झोंप तर नाही, मग ' मी जागा आहे ' असे म्हणणें
त्याच्या ठिकाणीं संभवेल का ? अर्थात् नाहीं. त्याप्रमाणें स्वरूपाच्या
ठिकाणीं स्मरण विस्मरण हीं दोन्ही नाहींत. १६. सूर्याला रात्र ठाऊकच
नाहीं, मग त्याला दिवस तरी ठाऊक आहे ? त्याप्रमाणें परमात्मवस्तु, स्मरण
आणि विस्मरण या दोघांनाहि जाणवत नाहीं. १७. परमात्मस्वरूपाच्या
ठिकाणीं जर स्मरण वा विस्मरणाचा संबंध नाहीं; तर मग स्मरण करून
देणारा जो शब्द त्याचेंहि कारण नाहीं, म्हणून परमात्मवस्तूच्या ठिकाणीं
शब्दानें काम भागत नाहीं, तिचा लाभ होत नाहीं. १८.
५२ सार्थ अमृतानुभव
आणिक एक शब्दें । काज कीरु भले सिद्धे ॥ परी धिवसा
न बंधे । विचारु येथें ॥ १९ ॥ कां जे बोले अविद्या नाशे ।
मग आत्मैन आत्मा भासे ॥ म्हणत खेव पिसें । आलेंच कीं
॥ २० ॥ सूर्यो रात्री मारील । मा आपणया उदो करील । हे
कुडे सरती बोल । साचाच्या गांवीं ॥ २१ ॥ निदेलें निदे रुसे ।
ऐसें कीं नीद असे ॥ कीं चेइलें चेऊं बैसे । ऐसे चेणें आहे
॥ २२ ॥ म्हणौनि नाशा पुरती । अविद्या नाहीं निरुती । नाही
आत्मा आत्मस्थिती । रिगे ऐसा ॥ २३ ॥ अविद्या तंव स्वरूपें ।
वांझेचें कीर जाऊपे । ना तर्काचें खुरपें । खांडणे कोणा ॥ २४ ॥
इंद्रधनुष्या सिते । कवण धनवई न घालिजेते ॥ तें दिसे तैसें
होतें । साच जरी ॥ २५ ॥
शब्दानें आणखी एक चांगले काम केलें जातें हें खरें; पण हा विचार
करण्याचा धीर होत नाहीं. १९. कारण शब्द अविद्येचा नाश करितो,
मग आत्मा आत्म्याला भासमान होतो, असें म्हणणें वेडगळपणाचें ठरतें.
२०. सूर्य प्रथम रात्रीचा नाश करील आणि मग आपला उदय करील; हें
बिनबुडाचे बोलणें विचाराच्या गांवांत टिकणारें नाहीं. २१. जागा झाल्या-
वर निद्रेची भीति वाटेल अशी कोठें निद्रा असते ? नेहमीं जागा आहे तो
‘ जागा झाला ’ असें जागणें कोठें आहे कां ? २२. म्हणून शब्दानें नाश
करण्यापुरती खरोखर अविद्या तर नाहींत, आणि शब्दसाहाय्यानें आत्म-
स्थितींत आत्मा प्रवेश करील असा आत्माहि नाहीं. २३. खरोखर अविद्या
तर स्वरूपानें वांझेचें पोर आहे. अभावरूप आहे. मग शब्दरूपी खुरपें
कोणाचा नाश करणार हो ? २४. दिसतें तसें इंद्रधनुष्य जर खरें असतें,
तर एखाद्या धनुष्य धारण करणाऱ्याने त्याला प्रत्यंचा चढविला नसतां
काय ? २५.
प्रकरण सहावें ५३
अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ॥ तरी
मार देतो तर्का । अविद्येशीं ॥ २६ ॥ साहे बोलाची वळधी ।
ऐशी अविद्या असे जगीं ॥ तरी जाळूना कां आगीं । गंधर्वनगरें
॥ २७ ॥ नातरी दीपाचिये सोये । अंधारें कीर न साहे ॥
तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ॥ २८ ॥ नातरी पाहावया दिवसु ।
वातीचा कीजे सोसु ॥ तेव्हढाही उद्दसु । उद्दसु पडे ॥ २९ ॥
जेथें साउली न पडे । तेथें नाहीं जेणें पाडें ॥ मा पडे तेथें
तेव्हडें । नाहींच कीं ॥ ३० ॥ दिसताचि स्वप्न लटिकें । हें
जागरीं होय ठाउकें ॥ तैविं अविद्याकाळीं सतुके । अविद्या नाहीं
॥ ३१ ॥ वोडंबरीच्या लेणिया । घरभरी आतुडलिया ॥ नागवे
नागविलिया । विशेषु काई ॥ ३२ ॥ मनोरथाचें परिमळ । अरो-
गिजतु कां लक्षवेळ । परी उपवासा वेगळ । आनु आथी ॥ ३३ ॥
मृगजळ अगस्तीच्या घोटाला पुरलें असतें, तर शब्दानें अविद्येचा नाश
झाला असता. २६. शब्दाची चढाई सहन करणारी अविद्या जगांत असती
तर, खऱ्या अग्नीनें गंधर्वनगरें का जाळूं नयेत ? २७. दिव्यापुढें अंधार
येणें शक्य नाहीं असें जर आहे; तर मग दिव्याच्या प्रकाशानें नाहीसे
होण्यासारखें कांहीं आहे का ? २८. अथवा सूर्य पाहण्यासाठीं वाती
लावण्याची खटपट करणें जसा व्यर्थ शिण होय; त्याप्रमाणें शब्दानें
अविद्येचा नाश होतो हें म्हणणें अडाणीपणाचें आहे. २९. जेथें सावली पडत
नाहीं तेथें जितक्या प्रमाणांत ती नाहीं, तितक्याच प्रमाणांत जेथें सावली
पडतें, तेथेंहि ती नसणारच कीं ! ३०. झोपेंत दिसणारें स्वप्न दिसत
असतांहि तें खोटें आहे, हें जागें झाल्यावर समजतें; त्याचप्रमाणें अविद्या-
कालींहि अविद्या मुळींच नाहीं. ३१. गारुड्यानें खेळांत दाखविलेलें दागिने
तिजोरींत भरून ठेविले, अगर एखाद्या नागव्या माणसांस लुटलें तर त्यानें
विशेष काय साधणार ? ३२. कल्पनेतील पक्वान्नें लाखो वेळ खाल्ली
तरी उपाशी राहण्याशिवाय दुसरें कांहीं फल मिळणार नाहीं. ३३.
५४ सार्थ अमृतानुभव
मृगजळ जेथ नमुंडे । तेथ असे पां कोरडे । मा उमंडे तेथ
जोडे । वोल्हांसु काई ॥ ३४ ॥ हें दिसे तैसें असे । तरी
चित्रींचेनि पाउसें ॥ बोल्हावस्तु कां माणसें । आगरा तळीं
॥ ३५ ॥ कालवूनि अंधारें । लिहो येती अक्षरें ॥ तरी मशी-
चिये वोरबारे । कां शिणावें ॥ ३६ ॥ आकाश काय निळें ।
न देखतु हे डोळे ॥ तेवी अविद्येचे टवाळे । जाणोनि घेईं
॥ ३७ ॥ अविद्या येणें नांवें । मी विद्यमानाचि नव्हे ॥ हे
अविद्याचि स्वभावें । सांगतसें ॥३८॥ आणि इये अनिर्वाच्यपण ।
ते दुजेही देवांगण ॥ आपुलां अभावीं आपण । साधितसे ॥३९॥
कांहींच जरी आहे । तरी निर्धारु कां न साहे ॥ वरी घटाभावीं
भोये । अंकित दिसे ॥ ४० ॥
ज्या जागीं मृगजळ दिसत नाहीं, ती कोरडी असते. पण जेथें तें दिसते
त्या जागीं तरी कांहीं ओलावा असतो काय ? ३४. प्रत्यक्ष दिसणारें
जग जसें दिसतें, तसेंच अविद्याकार्य यथार्थ असतें, तर चित्रांत काढलेल्या
पावसानें माणसें, भाताची आगरें व तळींहि भिजून नसती का गेली ? ३५.
अंधार जसा दिसतो तसाच जर तो खरोखर काळा पदार्थ असता, तर तो
पाण्यांत कालवून लिहितां आलें असतें व मग शाईकरितां काजळ
मिळविण्याची उठाठेव तरी कोणी कशाला केली असती ? ३६. मुळींच रंग
नसणारे आकाश जसें डोळ्यांना निळें दिसतें, त्याप्रमाणें हें अविद्याकार्य
जगत् नसूनहि दिसतें; म्हणून तें मिथ्या समजावे. ३७. 'अविद्या' या
नांवानें मी विद्यमानच असें अविद्या स्वतःच सांगते. ३८. आणि अविद्येनें
आपल्या अनिर्वाच्यपणाची शपथ घेऊन आपलें नसलेपण आपल्या
नांवावरून सिद्ध करून दिलें. ३९. कारण ही अविद्या आहे असें म्हणावें
तर ती विचारांपुढें कां टिकत नाही ? घटाभावानें जमीन कोठे घटाभास-
युक्त दिसते काय ? ४०.
प्रकरण सहावें ५५
अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रभा । सूर्या आंगीं तमा ।
जयापरी ॥ ४१ ॥ हे अविद्या तरी मायावी । परी मायावीपणचि
लपवी ॥ हे साचा आली अभावी । आपुलां हे ॥ ४२ ॥ बहुता-
परी ऐसी । अविद्या नाहीं आपैशी ॥ आतां बोलू हात वसी ।
कवणावरी ॥ ४३ ॥ साउलि येते साबळे । हालया भोय
आडळे ॥ कीं हालेन अंतराळें । थोटावे हातु ॥ ४४ ॥ कां
मृगजळाच्या पानीं । गगनाच्या आलिंगनी ॥ नातरी चुंबनीं ।
प्रतिबिंबाच्या ॥ ४५ ॥ उठावला बोथरे तवका । तो सुनाथा
पडे असिका ॥ अविद्यानाशी तर्का । तैसें होये ॥ ४६ ॥ ऐशी
अविद्या नासावी । हें वाहेल जो जीवीं ॥ त्यानें साली काढावी ।
आकाशाची ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणें अंधकाराचा नाश करणें हें सूर्याची प्राप्ति करून घेणें
नाही; त्याप्रमाणें अविद्येचा नाश झाल्यावर आत्म्याची प्राप्ति होईल असें
बुद्धीस वाटत नाहीं. ४१. अविद्या ही मायावी असून ती आपला मायावी-
पणाच लपविते असें म्हणणें असेल, तर या म्हणण्यानेंच तिचा अभाव
सिद्ध झाला. ४२. निरनिराळ्या बाजूंत विचार केला तरी अविद्या नाहीं,
असें सहजच ठरतें; मग शब्दानें कोणावर हात उचलावयाचा ? ४३.
पहारीनें सावलीस मारावयास गेलें तर जमिनीलाच खळगी पडेल; अगर
हातानें आभाळाला चापटी दिली तर हातच उखडेल ! ४४. किंवा मृग-
जळ प्यावें, आकाशाला मिठी मारावी, अथवा प्रतिबिंबाचें चुंबन घ्यावें,
४५. अशी मनांतली प्रबळ इच्छा कमी होऊन पूर्णपणें व्यर्थ होते.
शब्दाची स्थिति अविद्येचा नाश करण्याचे कामीं व सांगितल्याप्रमाणें होते.
४६. अशा अभावरूपानें असलेल्या अविद्येचा नाश करावा असें ज्याच्या
मनांत येईल त्यानें आकाशाची साल काढावी. ४७.
५६ सार्थ अमृतानुभव
तेणें शेळी गळां दोहावी । गुडगाडोळां वास पहावी ॥ वाळ-
वूनि काचरी करावी । सांजवेळेची ॥ ४८ ॥ जांभई वाटूनि
रसु । तेणें काढावा बहुवसु ॥ कालवूनि आळसु । मोदळा पाजावा
॥ ४९ ॥ तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ॥ वारयाचे
ताथू । वळूं सुखें ॥ ५० ॥ तो बागुलातें मारूं । प्रतिबिंब खोळे
भरूं ॥ तळहातींचे विंचरू । केश सुखे ॥ ५१ ॥ घटाचे नाहींपण
फोडूं । गगनाचीं फुलें तोडूं ॥ सशियाचे मोडूं । शिंग सुखें
॥ ५२ ॥ तो कापुराची मशी करु । रत्नदीपीं काजळ धरू ॥
वांझेंचें लेंकरूं ॥ परणू सुखें ॥ ५३ ॥ तो अवसेचिनि सुधाकरें ।
पोसू पाताळींचीं चकोरें ॥ मृगजळींची जळचरें । गाळूं सुखें
॥ ५४ ॥ अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ॥
आतां काय नासावें । शब्दें येणें ॥ ५५ ॥
शेळीच्या गळ्यांतील स्तनाचें दूध काढावें, गुडघ्यांच्या डोळ्यांनीं
मार्ग पाहावा, सांजवेळ वाळवून तिची काचरी करावी; ४८. जांभई वाटून
रस काढावा व त्यांत आळस कालवावा, तो चिखलाच्या गोळ्यास पाजावा;
४९. त्यानें पाण्यासुद्धां पाठ उलथावा; पाटाचें पाणी उलट दिशेला न्यावें;
सावली उलथवावी; वाऱ्याचे धागे वळावे; ५०. त्यानें बागुलबोवाला मारावें;
प्रतिबिंब वस्त्रांत घ्यावें, तळहातावरचें केस हवें तितकें विंचरावे ! ५१.
नसलेलें गाडगें फोडावें, आकाशाची फुले तोडावीं; सशाचें शिंग सुखानें
मोडावें; ५२. त्यानें कापूर जाळून त्याची शाई करावी, रत्नाच्या दिव्यावर
काजळ धरावें, वांझेच्या मुलीशीं लग्न करावें. ५३. अमावास्येचें चंद्रामृत
पाताळांतील चकोरांना घालून ते वाढवावेत, मृगजळांतील प्राणी पकडावे.
५४. खरोखर ह्या सर्व गोष्टी ज्याप्रमाणें असंभवनीय आहेत, त्याप्रमाणें
नाहींपणानें असणाऱ्या अविद्येचा शब्दानें नाश असंभवनीय होय. ५५
प्रकरण सहावें ५७
नाहीं तयाचेनि नासे । शब्द नये प्रमाणदशे ॥ आंधारीं
अंधारा जैसें । नव्हे रूप ॥ ५६ ॥ अविद्येची नाहीं जाती । तेथें
नाहीं म्हणतया युक्ति ॥ जैंवी दुपारी कां वाती । अंगणींचिया
॥ ५७ ॥ न पेरितां शेतीं । जे कीं संवगाणिया जाती ॥ तया
लाजापरौती । जोडी आहे ॥ ५८ ॥ खवाणियाच्या आंगा । जेणें
केला वळघा ॥ तो न करितांचि उगा । घरीं होता ॥ ५९ ॥
पाण्यावरी वरखु । होतां कें असे विशेखु ॥ अविद्यानाशी
उन्मेखु । फाकावा तैसा ॥६०॥ माप मापपण श्लाघे । जंव आकाश
मऊं नरिघे ॥ तम पाहतां वाउगें । दीपाचे जन्म ॥ ६१ ॥
गगनाची रससोये । जीभ जैं अरोगूं जाये ॥ मग रसना हे होयें ।
आडनांव कीं ॥ ६२ ॥ नव्हतेन वल्लभें । आहेवपण कां शोभे ॥
खातां केळीचे गाभे । न खातां गेलें ॥ ६३ ॥
शब्द हा नसणाऱ्या अविद्येच्या नाशानें प्रमाणदशेला येत नाहीं.
अंधारांत अंधार वेगळा नसतो. ५६. अंगणांत दोन प्रहरीं दिवा नेऊन
ठेविला तर त्याचा उपयोग काय ? अविद्येलाच जर खरूपस्थिति नाहीं,
तर तेथें युक्तीचा उपयोग काय ? ५७. धान्य न पेरतां जे शेतकाढणीला
जातात, त्यांना लाजेशिवाय दुसरें मिळणार काय ? ५८. आकाशाच्या
अंगावर हल्ला करणारा स्वस्थ घरांत होता असेंच म्हटलें पाहिजे. ५९.
समुद्रावर वर्षाव झाला तर त्यांत काय झालें ? त्याप्रमाणें अविद्येचा नाश
करण्यांत शब्दाचा प्रयत्न व्यर्थ आहे. ६०. आकाशाचें माप घेतलें जात
नाहीं तोंपर्यंतच मापाला मापपणाची शोभा. दिव्यानें अंधकार पाहिला तर
त्याचा जन्म व्यर्थ होय ! ६१. आकाशाच्या पक्वान्नाची जीभ जर चव
घेईल, तर तिचें रसना म्हणजे चव घेणारी हें नांव व्यर्थ होईल. ६२.
जिचा पती जिवंत नाहीं त्या स्त्रीला ‘ सुवासिनी ’ असें म्हणणें शोभेल
काय ? किंवा केळीचा गाभा कोणी भक्षण करूं म्हणेल तर तें भक्षण
करणें न भक्षण करणेंच होय. ६३.
५८ सार्थ अमृतानुभव
स्थूल सूक्ष्म कवणयेकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ॥ परी
रात्रीविषयीं अप्रयोजिकु । जालाचि कीं ॥ ६४ ॥ दिठी पाहतां
काय न फवे । परी निदेतें तंव न देखवे ॥ चेतातें न संभवे ।
म्हणूनियां ॥ ६५ ॥ चकोराचिया उद्यमा । लटिकेपणाची सीमा ॥
जरी दिहाची चंद्रमा । गिंवसूं बैसे ॥ ६६ ॥ नुसधीयेचि
साच्या । मुका होय वाचरुकाचा ॥ अंतराळीं पायाचा । पेंधा
होय ॥ ६७ ॥ तैशी अविद्येसीं सन्मुखे । सिद्धाचि प्रतिसेदके ॥
उठलींचि निरर्थकें । जल्पें होतीं ॥ ६८॥ अवसे आला सुधाकरु ।
न करीचि काई अंधःकारु ॥ अविद्यानाशी विचारु । तैसा होये
॥ ६९॥ नाना न निफजतेन अन्नें । जेवणें तोचि लंघनें ॥ निमा-
लेन नयनें । पाहणाचि अंधु ॥ ७० ॥
सूर्य स्थूल किंवा सूक्ष्म असा कोणता पदार्थ प्रकाशित करीत नाहीं. परंतु
तोच सूर्य रात्रीचा प्रकाश करण्यांत निरुपयोगीच ठरणार. ६४. दृष्टि इतर
सर्व पाहते पण ती झोपेला पाहायला दुबळी आहे; कारण जागा असलेला
‘झोपला आहे’ हें म्हणणें संभवतच नाहीं. ६५. दिवसा चंद्रामृतपान
करण्याच्या इच्छेनें चकोर चंद्राला शोधीत बसेल तर फुकट आहे. ६६.
‘कोरा कागद वाच’ असें सांगितलें तर वाचणारा मुका होतो, कसलाहि
चालणारा आकाशांत चालताना पांगळा होतो. ६७. त्याप्रमाणें स्वाभाविक
अभावरूप असणाऱ्या अविद्येच्या समोर, तिचा नाश करणारा शब्द उठला
तरी तो निरर्थकच होतो. ६८. अंवसेच्या रात्री चंद्र उदयास आलाच तर
तो प्रकाश देईल म्हणून ती अंवस नव्हेच. त्याप्रमाणें अविद्येच्या अनाशा-
विषयी शब्दाची स्थिति होय. ६९. किंवा तयार न केलेल्या अन्नाचें जें
जेवण तेंच लंघन; फुटलेल्या डोळ्यांनीं पाहणारा तोच आंधळा. ७०.
प्रकरण सहावें ५९
कैसेंन ही वस्तु नसे । तेथें जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ॥ तैं
निरर्थकपणें नाशे । शब्दही थिता ॥ ७१ ॥ आतां अविद्याचि
नाहीं । हें कीर म्हणों काई ॥ परी नाशितां कांहीं । नुरोचि
शब्दाचें ॥ ७२ ॥ यालागीं अविद्येचिया मोंहरा । उठिलियाही
विचाग ॥ आंगाचाचि संसारा । होऊनि ठेला ॥ ७३ ॥ म्हणोनी
अविद्येचोनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ॥ हे अविद्याचि नाहीं-
पणें । नेदी घडो ॥ ७४ ॥ आणि आत्मा हन आत्मया । दाऊनि
बोलू महिमया ॥ येईल हे साविया । विरुद्धचि ॥ ७५ ॥ आपणया
आपणपेशी । लागलें लग्न कवणें दिवशीं ॥ कीं सूर्य आंग ग्रासी
ऐसें ग्रहण आहे ॥ ७६ ॥ गगन आपणया निघे । सिंधू आपणपा
रिघे ॥ कीं तळतात काय वळंघे । आपणपया ॥ ७७ ॥
कोणत्याहि रूपानें नसणाऱ्या पदार्थांची सिद्धि करण्याविषयीं शब्द
प्रयत्न करूं लागला तर तो प्रयत्न निरर्थक होऊन शब्द आपले अस्तित्व
मात्र नाहींसें करून घेतो. ७१. आतां अविद्याच नाहीं, असें कसे म्हणावें ?
पण तिचा नाश करू जातां शब्दच उरत नाहीं. ७२. म्हणजेच अविद्येचा
नाश करण्यासाठीं विचार म्हणजे शब्द तिच्यासमोर उभा राहील तर तो
स्वतःनाश पावेल. ७३. म्हणून अविद्येच्या नाशानें शब्दाला प्रामाण्य
येईल ही गोष्ट, अविद्याच आपल्या नाहींपणानें घडूं देत नाहीं. ७४. आणि
आत्म्याला आत्मा दाखवून शब्द प्रतिष्ठेला येईल, हें म्हणणेंच खरोखर
उलट आहे. ७५. आपलें आपल्याशींच लग्न लागले असें कुठें तरी ऐकलें
आहे कां ? किंवा सूर्य आपलें बिंब आपणच ग्रासतो असें कुठे तरी ऐकलें
आहे का ? ७६. स्वतःकडे जाण्यासाठीं आकाश निघूं शकेल काय ?
किंवा स्नानाकरितां समुद्र आपल्या पोटांत शिरेल तरी कसा ? अगर
तळहात तळहातावरच चढेल काय ? ७७.
६० सार्थ अमृतानुभव
सूर्य सूर्यासी विवळे । फळ आपणया फळे ॥ कीं परिमळु
परिमळे । घेतसे ॥ ७८ ॥ चराचरा पाणीपाजणी । करूं
येईल एके क्षणीं ॥ परी पाणियासी पाणी । पाजों ये काई
॥ ७९ ॥ साठीतिसा दिवसा । माजी एकादा होय ऐसा ॥ जे
सूर्यासी सूर्य जैसा । डोळा दावी ॥ ८० ॥ कृतांत जरी कापेल ।
तरी त्रैलोक्य हें जाळील ॥ वांचूनि आगी लावील । आगीसी
काई ॥ ८१ ॥ आपणपे आपणया । दर्पणेवीण धातया ॥ समोर
होआवया । ठाकी आहे ॥८२॥ दिठी दिठींतें रिघों पाहे । रुचि
रुचीतें चाखूं सूये ॥ कीं चेतया चेवऊं ये । हें नाहींच कीं
॥ ८३ ॥ चंदन चंदनपणा लावी । रंग रंगपणा रावी ॥ मोती-
पण मोती लेववी । ऐसें कैसें ॥ ८४ ॥
सूर्य सूर्यालाच उदय करील ? फळ आपला उपयोग आपणच घेते
काय ? गंधाला आपलाच वास घेतां येईल काय ? ७८. सर्व चराचराला
एकाच क्षणांत पाणी पाजण्याचें मनांत आणलें तर तें शक्य आहे; पण
पाण्याला कसें पाणी पाजतां येईल ? ७९. तीनशें साठ दिवसांत एखाद्या
दिवशीं तरी सूर्य आपल्या डोळ्यांनीं आपल्यास पाहील काय ? ८०.
प्रलयकालचा अग्नि कोपानें त्रैलोक्य जाळून टाकील, पण त्याला स्वतःला
पेटवून घेतां येईल काय ? ८१. ब्रह्मदेवाला तरी आरशावांचून आपल्या-
समोर आपलें रूप पाहण्याची काय सोय आहे ? ८२. दृष्टि दृष्टीला कशी
पाहील ? रुचि आपली रुचि घेईल काय ? किंवा जाग्यास जागें करतां
येईल काय ? हें नाहींच. ८३. चंदन आपली उटी आपल्यास लावील,
रंग आपल्यालाच रंगवील किंवा मोतीं आपलीच प्रभा आपल्याच अंगावर
घालील हें कधीं घडेल काय ? ८४.
प्रकरण सहावें ६१
सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ॥ रसपण
बुडी दे रसीं । तें के जोडे ॥ ८५ ॥ आपुले मुकुटीं समर्थां ।
चंद्र बैसविला सर्वथा । परी चंद्र चंद्राचिये माथा । वाऊं ये काई
॥ ८६ ॥ तैसा आत्मराज तंव । ज्ञानमात्रचि भरीव ॥ आतां
ज्ञाने ज्ञानासी खेव । कैसें दीजे ॥ ८७ ॥ आपुलेनि जाणपणें ।
आपणयातें जाणों नेणें ॥ डोळ्या आपुले पाहणें । दुवाड जैसें
॥ ८८ ॥ आरसा आपुलिये । आंगीं आपणा पाहे ॥ तैं जाणणें
जाणों लाहे । आपणयातें ॥ ८९ ॥ दिगंता पैलीकडेचें ।
धांवोनि सूर्या खोचे ॥ मा तिये कां तियेचें । आंग फुटे ॥९०॥
रसवृत्तीसी उगारणें । घेऊनि जिव्हाग्र शहाणें ॥ परी काई कीजे
नेणें । आपणपें चाखों ॥ ९१ ॥
सोनेंच सोन्याचा कस लावील, दिवाच दिव्याला प्रकाश करील, रसच
रसांत बुडी देईल, हें कसें घडेल ? ८५. समर्थ भगवान् शंकरांनीं आपल्या
डोक्यावर चंद्र बसविला, पण चंद्राला आपल्याच डोक्यावर बसतां येणें
शक्य आहे काय ? ८६. ज्याप्रमाणें कधींच ह्या गोष्टी घडणें शक्य नाहीं.
त्याचप्रमाणें आत्मा तर भरीव ज्ञान आहे, तेव्हां आतां त्या ज्ञानाला शब्द-
रूपी ज्ञानानें आलिंगन कसें द्यावें ? ८७. आपणा स्वतःला पाहतां येत
नाहीं. ८८. आरसा आपल्याच ठिकाणीं आपलें स्वरूप पाहूं शकेल, तरच
ज्ञान आपल्यास ज्ञेय करून जाणूं शकेल. ८९. सुरी धांवत जाऊन
आकाशापलीकडच्या पदार्थालाहि मारूं शकेल, पण ती स्वतःला मारून
घेईल का ? ९० सर्व रसांची चव घेण्यांत जीभ कुशल असली तरी
आश्चर्य हें कीं, ती स्वतःला चाखूं शकत नाहीं. ९१.
६२ सार्थ अमृतानुभव
तरी जिभे काय आपुलें । चाखणें हन ठेलें ॥ तैसें नव्हे
संचलें । तेंचि तें कीं ॥ ९२ ॥ तैसा आत्मा सच्चिदानंदु ।
आपणया आपण सिध्दु ॥ आतां काय दे शब्दु । तयाचें तया
॥ ९३ ॥ कोणाही प्रमाणाचेन हाते । वस्तु घे ना नेघे आपण-
यातें ॥ जें स्वयें आइते । घेणें ना नघेणें ॥९४॥ म्हणोनी आत्मा
आत्मलाभे । नांदवुनि शब्द शोभे ॥ येईल ऐसा न लभे । उमसु
घेवो ॥ ९५ ॥ एवं माध्यान्हीची दिवा । तम धाडी ना दिवो
दावी ॥ तैशी उभयतां पदवी । शब्दा जाली ॥ ९६ ॥ आतां
अविद्या नाहींपणें । नाहीं तये नासणें ॥ आत्मा सिध्दुचि मा
कोणें । काय साधावें ॥ ९७ ॥
असें जरी आहे तरी जिभेचे चाखणें नाहींसें झाले असें म्हणावें तर
तसें नाहीं. किंतु जिव्हाग्र चाखणेंपणानेंच भरले आहे. ९२. त्याचप्रमाणें
आत्मा सच्चिदानंदज्ञानरूप आपल्या ठिकाणीं आपण सहजच सिद्ध आहे.
आतां अशा स्वतःसिद्ध प्रकाशरूप आत्म्याला तो शब्द आपल्या पदरचें
नवीन ज्ञान काय देणार ? ९३. (प्रत्यक्षादि ) प्रमाणाच्या साहाय्यानें
परमात्मा स्वतःचें अस्तित्व सिद्ध करीत नाहीं किंवा होऊं देत नाहीं;
कारण अनादिसिद्धच आहे. सिद्धि वा असिद्धि हा शब्द वस्तुस्वरूपाच्या
ठिकाणीं कुचकामी आहे. ९४. म्हणून आत्म्याला सच्चिदानंद स्वरूपाची
प्राप्ति करून देऊन शब्दाला शोभा येईल असें मुळींच नाहीं. ९५. एवंच
ज्याप्रमाणें मध्यान्हकालीं सूर्यप्रकाशांत ठेविलेला दिवा अंधार घालवूं
शकत नाहीं व दिवसही दाखवू शकत नाहीं, त्याप्रमाणें आत्मस्वरूप
प्रकाशित किंवा अज्ञान निवृत्त करण्याविषयीं पात्रता नसल्यामुळे शब्दाला
तीच दशा प्राप्त होते. ९६. आतां अविद्या मुळींच नाहीं म्हणून तिचा
नाश संभवत नाहीं. आणि आत्मा स्वतःसिद्ध असल्यामुळे शब्दानें त्याची
सिद्धि होत नाहीं, अशा स्थितींत कोणीं काय साधावें ? ९७.
प्रकरण सहावें ६३
ऐसा उभयपक्षीं । बोला न लाहोनि नखी ।। हारपला प्रळयो-
दर्कीं । वोधू तैसा ।। ९८ ।। आतां बोला भागू कांहीं । असणें
जयाच्या ठाईं ।। अर्थता तरी नाहीं । निपटूनियां ।। ९९ ।। बागूल
आला म्हणते । बोलणें जैसें रितें ।। कां आकाश वोळंबतें ।
तळहातीं ।। १०० ।। तैसीं निरर्थकें जल्पे । होऊनियां सपडपें ।।
शोभती जैशीं लेपें । रंगावरी ।। १०१ ।। एवं शब्दैकजीवनें ।
बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।। साचपणें वनें । चित्रींचीं जैशीं ।।१०२।।
या शब्दाचा निमाला । महाप्रळयो हो सरला ।। अभ्रासवें गेला ।
दुर्द्दिनु जैसा ।। १०३ ।।
इति श्रीसिद्धानुवादे श्रीमदनुभवामृते शब्दखंडनं
नाम षष्ठप्रकरणं संपूर्णम् ॥
दोन्ही बाजूंनीं नखाइतकाहि शब्दाचा प्रवेश न होता प्रलयजळांत
ओघ नाहींसा होतो, शब्दहि नाहींसा होतो. ९८. विचार केला कीं
शब्दाचा आत्मस्वरूपाशीं कसलाहि संबंध नाहीं, हें लक्षांत येतें. ९९.
बागुलबोवा आला, आभाळ हातांत पकडलें हें बोलणें निरर्थक १००.
रंगांतील चित्रे जितकीं निर्बल तितकाच आपल्या सर्व बडिवारासह शब्द
आत्म्याला सिद्ध करण्यास दुबळा ठरतो. १०१ केवळ शब्दाच्या साम-
र्थ्यानें जगणारीं ज्ञानें आणि अज्ञानेंहि चित्रांत रंगविलेल्या उपवनाप्रमाणें
खरीं भासतात. १०२. ढगाळ हवा नाहींशीं झाली कीं दुष्काळ पडण्याचें
संकट नाहींसें होतें. त्याचप्रमाणें येथें शब्द अकार्यक्षम होतो म्हणून
त्यावर आधारलेली व परमात्मस्वरूप स्पष्ट करूं इच्छिणारीं ज्ञानें आणि
अज्ञानेंहि अशीं निरर्थक ठरतात. ॥१०३॥
प्रकरण सहावें समाप्त
प्रकरण सातवें
येन्हवीं तन्ही अज्ञाना । जैं ज्ञानाची नसे क्षोभना ॥ तै तरी
काना- । खालींच दडे ॥ १ ॥ आडसूनि अंधारी । खद्योत दीप्तीं
सिरी । तैसें लटिकेवरी । अनांदी होये ॥ २ ॥ जैसी स्वप्ना
स्वप्नीं महिमा । तर्मी मानूं असे तमा ॥ तेवी अज्ञानगरिमा ।
अज्ञानींची ॥ ३ ॥ कोल्हेरीचे । असिवारु न येता धारकी घरु ॥
नये लेणा श्रृंगारु । वोडंबरीचे ॥ ४ ॥ हे जाणण्याच्या घरीं ।
खोंचिलेंही आन न करी ॥ काई चांदिणां उठे लहरी । मृग-
जळाची ॥ ५ ॥ आणि ज्ञान हें जें म्हणिजे । तें अज्ञानचि पा
दुजें ॥ एक लपवूनि दाविजे । एक नव्हे ॥ ६ ॥
तसें पाहिलें तर ज्ञानाचा टेका अज्ञानाला नसेल तर अज्ञान हा शब्द
ऐकायलाहि मिळणार नाहीं. १. अंधाराचा आश्रय घेऊन काजवा आपलें
तेज मिरवतो, तसें अज्ञान अभावाचा आश्रय घेऊन अनादिपणानें मिरवितें.
२. स्वप्नाचें महत्त्व स्वप्नांतच; अथवा अंधकाराचें महत्त्व अंधकारांतच,
त्याप्रमाणें अज्ञानाची थोरवी अज्ञानांतच. ३. कुंभारानें तयार केलेले मातीचे
घोडे रणावर वरतां येत नाहींत. मंत्रानें केलेले दागिने अंगावर घाल-
ण्याच्या उपयोगीं पडत नाहींत. ४. त्याप्रमाणें ज्ञानाच्या घरांत अज्ञानाला
डिवचलें तरी तें भिन्नरूपानें प्रत्ययास येत नाहीं. ( अरे ! ) चांदण्यामुळे
मृगजळाच्या लाटा तयार होतील का ? ५. व्यवहारांत जसें दोन समान
पदार्थ असले म्हणजे एक लपवून दुसरा दाखवीत नाहींत का, तसें
ज्याला ज्ञान म्हणतात तेंहि पण दुसरें अज्ञानच होय. ६.
चतुर्थ से षष्ठ प्रकरण: अज्ञान-खण्डन एवं वस्तु-प्रभा (चित्-स्वरूप)
प्रकरण सातवें ६५
असो आता हा प्रस्तावो । आधीं अज्ञानाचा धांडोळा घेवों ॥
मग तयाच्या साची लाहो । ज्ञानही लटिकें ॥ ७ ॥ या अज्ञान
ज्ञानातें । आंगेंचि आहे जितें ॥ तरी जेथें असे तयातें । नेण कां
न करी ॥ ८ ॥ अज्ञानें जेथें असावें । तेणें सर्व नेण होआवें ॥
ऐशी जाती स्वभावें । अज्ञानाची ॥ ९ ॥ तरी शास्त्रमत्त ऐसें ।
जे आत्माच अज्ञान असे ॥ आणि तेणें तो गिवसे । आश्रो जरी
॥ १० ॥ तरी नुठिता दुजें । जैं अज्ञान असे बीजे ॥ तैं तेंचि
आधीं हें बुझे । कोण येथें ॥ ११ ॥ अज्ञान तंव आपणयातें ।
जडपणें नेणें निरुतें ॥ आणि प्रमाण प्रमाणातें । होत आहे ॥१२॥
अज्ञानाप्रमाणेंच ज्ञान हें लटकें आहे हा ज्ञानखंडनाचा हा एक तत्त्व-
विचार तूर्त बाजूला ठेवूं. या प्रकरणांत अज्ञानविषयक विचार करूं या.
त्याच्या विचारांत तें लटकें ठरलें तर त्यावरून ज्ञानहि खोटें म्हणावयास
कांहीं अडचण आहे काय ? ७. ज्या परमात्म्याच्या ठिकाणीं तें अज्ञान
आहे त्याच्या स्वरूपाचा तें लोप कां करीत नाहीं ? ८. ज्या ठिकाणीं
अज्ञान असतें तें ज्ञानाला झांकून टाकतें. तो तर अज्ञानाचा स्वभाव आहे.
९. त्या आत्म्यावर अज्ञानाचें आवरण असल्यानें आत्मा त्याचा आश्रित
असून आच्छादित आहे असें शास्त्रमत आहे. १०. वेगळेपणा उत्पन्न न
होतां त्याच्या ठिकाणीं अज्ञान हें बीजरूपानें आहे असें मानावें; तर
मग तें तेथे आहे हें कोणाला समजणें शक्य आहे ? ११. स्वतः आपण
जड (अचेतन) असल्यानें अज्ञान हें त्याचें त्यास व इतरांसहि
समजत नाहीं. अविश्वासार्ह अज्ञान प्रमाण म्हणून कसें मानतां
येईल ? १२.
सा. अ. . ५
६६ सार्थ अमृतानुभव
यालागीं जरी अज्ञान । करील आपुलें ज्ञान ॥ हें म्हणत खेव
घववी मौन । विरोधचि ॥ १३ ॥ आणि जाणती वस्तु येक ।
तें येणें अज्ञानें कीजे मूर्ख ॥ तैं अज्ञान हे लेख । कवण धरी
॥ १४ ॥ अहो आपणयाही पुरता । नेणू न करवे जाणता ॥
तयातें अज्ञान म्हणता । लाजिजे कीं ॥ १५ ॥ आभाळें भानु
ग्रासे । तैं आभाळ कोणें प्रकाशे ॥ सुषुप्ती सुषुप्ते या रुसे । तें तेंचि
कोणा ॥ १६॥ तैसें अज्ञान असे जेथें । तेंच जरी अज्ञान आते ॥
तरी अज्ञान अज्ञानातें । नेणतां गेलें ॥ १७ ॥ नातरी अज्ञान
एक घडे । हें जयास्तव निवडे ॥ तें अज्ञान नव्हे फुडें । कोण्हे
काळीं ॥१८॥ पडळही आथी डोळां । आणि डोळा नव्हे आंधळा ॥
तरी आथी या पोकळा । बोलिया कीं ॥१९॥ इंधनाच्या आंगी ।
खवळलेन आगी ॥ तें न जळे तरी बाउगी । शक्तीच ते ॥२० ॥
एवढ्यासाठीं अज्ञानानें स्वतः माहिती करून घ्यावी, असें म्हटल्यास
विरोध येतो. त्यामुळे मौन स्वीकारावें लागतें. १३. परमात्मा ही जाणून
घेण्याची वस्तु या अज्ञानानें मूढ केली, असें म्हटलें तर हें अज्ञानाचें ज्ञान
तरी कोणाला झालें ? १४. आपल्यापुरता परमात्मा हा तरी ज्ञेय-अज्ञेय,
अतीत आहे. तो अज्ञानी म्हणावयास लाजणार. १५. आभाळानें सूर्य
ग्रासला म्हणावें तर मुळांत आभाळ दिसणार तें कोणामुळें ? झोंपी गेलेल्या
इसमावर निद्रा रुसली म्हणावें तर मग त्या माणसांस काय मिळालें ? १६.
त्याप्रमाणें ज्या ठिकाणीं अज्ञान असतें तो जर आज्ञेय झाला, तर मूळचें
अज्ञान या झांकलेल्या अज्ञानामुळे न कळतांच गेलें असें होणार नाहीं का?
१७. सिद्धांत असा कीं, ज्या ज्ञानानें अज्ञान निवटलें जातें, तें ज्ञान
केव्हांही अज्ञान होणार नाहीं. १८. डोळ्यांवर पडळ आलें तरी डोळा
आंधळा नाहीं, 'पडळ आलें', हें म्हणणें जसें पोकळ आहे. १९. ज्या
अग्नींत लाकूड टाकलें त्यांत तें जळत नसेल तर अशा अग्नीला अग्नि असें
म्हणताच येणार नाहीं. २०.
प्रकरण सातवें ६७
आंधारु कोंडूनि घरीं । घरा पडसाई न करी ॥ तैं अंधारु
इहीं अक्षरीं । न म्हणावा कीं ॥ २१ ॥ वोजावों नेदी जागणें ।
तिये निदेतें नीद कोण म्हणे ॥ दिवसा नाणी उणें । तैं रात्र
कैची ॥ २२ ॥ तैसें आत्मा अज्ञान असिके । असता तो न
मुके ॥ तैं अज्ञानशब्द लटके । आलेंचि कीं ॥ २३ ॥ येन्हवीं तरी
आत्मया । माजीं अज्ञान असावया ॥ कारण म्हणतां न्याया ।
चुकी येईल कीं ॥ २४ ॥ अज्ञान तममेळणी । आत्मा प्रकाशाची
खाणी ॥ आतां दोहीं मिळणी । एकी कैशी ॥ २५ ॥ स्वप्न
आणि जागरु । आठवू आणि विसरु ॥ हे युग्मे एका हारु ।
चालती जरी ॥ २६ ॥ शीता तापा एकवट । वाहे वस्तीची
वाट ॥ कां तमें बांधिजे मोट । सूर्यरश्मींची ॥ २७ ॥ नाना
राती आणि दीवो । येती एकेठायीं राहो । तैं आत्मा जीवें जीवो ।
अज्ञानाचेनि ॥ २८ ॥
अंधार घरांत कोंडून भरलेला आहे, पण तो अंधकाराचें काम करीत
नसेल तर त्याला अंधकार असें तरी कसें म्हणावें ? २१. जागृतींतील
'ओ' देण्याचें काम थांबलेलें नाहीं, तर मग निद्रा आली असें म्हटल्यास
अशा निद्रेला कोणी निद्रा म्हणेल का ? किंवा दिवसाला उणेपणा न
येतां रात्र आहे हें म्हणणें संभवत नाहीं. २२. आत्म्याच्या ठिकाणीं संपूर्ण
अज्ञान असतांना आत्म्याचें ज्ञान तर कमी होत नाहीं, यावरून अज्ञान
हा शब्दच लटका ठरतो. २३. आत्म्याच्या ठिकाणीं अज्ञान आहे हें
म्हणणें संयुक्तिक धरून नाहीं. २४. कारण अज्ञान तर घनीभूत अंधकार-
रूप. आत्मा तर प्रकाशाची खाणच, मग हे दोघे एके ठिकाणीं कसे
असतील ? २५. असें पाहा, स्वप्न व जागृति, स्मरण व विस्मरण दोन्ही
जर एके ठिकाणीं राहूं शकतील; २६. थंडी व उष्णता एका ठिकाणीं
असतील किंवा अंधकारानें सूर्यकिरणांची मोट बांधली असेल, २७. आणि
जर रात्र आणि दिवस एकत्र राहतील; तर आत्मा अज्ञानाच्या जिवावर
जगतो असें म्हणतां येईल. २८.