सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 166, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंहेचि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥ ३ ॥
तुका म्हणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वर्म-रहस्य, त्रिवाचा-तीन वेळा उच्चार करून.
अर्थ - संतांची सेवा हीच खऱ्या अर्थाने देवास पोचते. १ भक्त किंवा संत हा एक देवाचेच अंग
असल्यामुळे त्याच्या पूजनाने सर्व काही गोष्टी परिपूर्ण होतात २ धर्म म्हणून जो सांगितला जातो त्याचे हेच
एक रहस्य आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तीन वेळा उच्चार करून सांगत आहे हेच खरे आहे. ४
२८१ मार्गे नेणपणे घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥ १ ॥
परनारीचें जया घडलें गमन । दाखवितो वदन जननीरत ॥ २ ॥
उपदेशा वरी मन नाही हातीं । तो आम्हा पुढती पाहूं नये ॥ ३ ॥
तुका म्हणे साक्षी असो द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सीमा-मर्यादा
अर्थ :- मागे न जाणता जे काय घडले असेल ते असो त्याची तुम्हास क्षमा आहे. पण आता येथून पुढे
मात्र नीट रीत किंवा मर्यादा घालून देतो ती गोष्ट ऐका १ परस्त्रीगमन ज्यास घडले आहे व जो उजळ माथ्याने
वर तोंड दाखवीत आहे त्यास आईशी गमन करण्याचे पातक लागते २ मी हा उपदेश केल्यावरही ज्याचे मन
स्वाधीन राहात नाही, त्याच्या मुखाचे दर्शनही मला आता यापुढे नको ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही
घातलेली शपथ पाळण्यासाठी तुम्ही आपले मनच प्रथम साक्षी ठेवा ४
२८२ आणिकांच्या घातें । ज्याचीं निवतील चित्तें ॥ १ ॥
तेचि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ २ ॥
कान पसरूनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥ ३ ॥
तुका म्हणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- निरयवासी-नरकात राहणारे, भांड-भांडखोर.
अर्थ - दुसऱ्याचा घातपात केल्यामुळे ज्याच्या चित्ताला समाधान वाटते, १ तो पापी समजावा तो शीघ्र-
कोपी मानून त्याचा वास नरकात असतो असेच समजावे २ तो नेहमी कान टवकारून वाईट बोलणे ऐकत असतो;
स्वतः बोलत असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य नुसता भांडखोर असतो त्याच्या तोंडाला धरबंध
नसतो कधी. ४
हनुमंतस्तुति-अभंग ४
२८३ शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ॥ १ ॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ २ ॥
शूर आणि धीर । स्वामिकार्यीं तूं सादर ॥ ३ ॥
तुका म्हणे रुद्र । अंजनीचिया कुमरा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सुभटा-श्रेष्ठ वीरा, सादर-तत्पर, रुद्रा-शिवा, अंजनी-हनुमंताची आई
अर्थ :-मारुतीराया, हनुमंता, तुम्ही श्रीरामचंद्राचे सेवक आहात. म्हणून मी तुम्हास पुन: पुन वन्दन
करतो. १ हे श्रेष्ठ अशा वीर पुरुषा, भक्तीच्या ज्या वाटा आहेत त्या मला दाखवा ना. २ तुम्ही शूर व धैर्यवान
आहात, स्वामीच्या, रामचंद्राच्या कोणत्याही कामासाठी तुम्ही तत्पर असता. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
अंजनीमातेच्या कुमारा, हनुमंता, तुम्ही प्रत्यक्ष शिवाचेच रूप आहात. ४