सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 517, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४७३
उपभोग काहीच होत नाही. आणि त्याच्या बरोबर असणारास ही त्याच प्रकारचे भोग भोगायला लागतात. ३
तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला खरोखरच एखाद्या गोष्टीचे मर्म माहीत नाही, त्याला हे असे कर्मगतीचे फळ
भोगावे लागते. ४
१०५५ समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥ १ ॥
अवगुणी जरी जालें तें घोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥ २ ॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि १ मुद्रांकित जालों तुझा ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- जन-लोक, घोंगळ-वाईट, मुद्रांकित-कृपेने, स्वाधीन.
अर्थ :- देवा, एखाद्या समर्थ असणाऱ्या श्रीमंत माणसाचे मूल जर दीनवाणे अथवा केविलवाणे दिसत असेल
तर, त्याकडे पाहताच लोक कुणाला हसतील? त्याच्या आईबापासच बोल देतील, नाही का? याचा विचार तुम्ही
केला आहे? १ ते मूल कितीही अवगुणी असेल व कितीही वाईट असेल, तरी त्यांना त्याचा सांभाळ करावा
लागतोच. २ तुकाराम महाराज म्हणतात, तसा मी एक पतित असून देवा, त्याची चिंता तुला असावी, कारण मी
तुमच्या पतितपावन या मुद्रेने अंकित झालो आहे. तुमच्याच स्वाधीन आहे ३
१०५६ गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवें २ भेटी केली तेणें ॥ १ ॥
सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ २ ॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥ ३ ॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मणि-रत्न, खळा-दुष्टास
अर्थ :- एखाद्या गाढवाच्या अंगाला चांगली चंदनाची उटी लावली तरी त्याचा त्याला काय उपयोग ? ते
लागलीच नेहमीच्या स्वभावाप्रमाणे राखेत जाऊन लोळणारच. १ ज्याचे जे सहज स्वभावातील गुण असतील ते
काही बदलत नाहीत. २ एखाद्या माकडाच्या गळ्यात जर किंमतवान रत्न बांधले तर त्याचा त्याला काय उपयोग?
ते त्याचे तुकडे तुकडे करून चघळूनच टाकणार ना? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे दुष्ट माणसास
फार हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या त्याला आवडत नाहीत. आपल्याच मताने ते अज्ञानाची गोष्ट वाढवितात ४
१०५७ नेणे सुनैं चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥ १ ॥
शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेलें वांयां बोल जातो ॥ २ ॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥ ३ ॥
वंदूं निंदूं काय दुराचार ३ । खळाचा विचार तुका म्हणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सुनैं-कुत्रे, ढाळ-खोड, वागण्याची रीत
अर्थ :- दारात बांधलेले कुत्रे चोर कोण, पाहुणा कोण, हे न ओळखता सर्वावरच भुंकत राहते ? त्याला
कितीही शिकविले तरी त्याचा काही उपयोग त्याला कधी होत नाही. त्याला शिकविले ते सर्व वायाच जाते. २
त्याला जरी चांगले दूध पाजले तरी, ते ओकून टाकून अमंगळ अशा घाणेरड्या पदार्थाकडेच त्याचे लक्ष जाणार.
ते आपली खोड काही सोडायला तयार नसते. ३ त्याचप्रमाणे एखाद्या दुष्टाला कितीही वंदा अथवा निंदा, त्याच्या
स्वभावात काही कधी फरक होणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४
१०५८ जन मानवलें वरी बाह्यात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥ १ ॥
म्हणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ २ ॥
१ दास, २ राख तया तेणे केलीसे भेटी, ३ दुराचारी थोर.
तु. गा -.६०