सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 436, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 436

जपून ठेवू. २ हा जो लाभ आम्हांला झाला आहे, त्याला उपमा द्यायला जावे तर तो पद्मासारखा आहे म्हणून
सांगावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी या संतांच्या पायावर डोके ठेविले आहे, ते काही वर उचलत नाही. ४
८४८ आपुलाला लाहो करूं । फेणें भरूं हा विठ्ठल ॥ १ ॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ २ ॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥ ३ ॥
तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंबें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- लाहो-लाभ, फेणे-माल, जिन्नस.
अर्थ :- आता आपला आपण लाभ करून घेण्यासाठी हा विठ्ठलरूपी माल भरून ठेवू. १ माझे मोठे भाग्य
म्हणूनच मी या स्थानास प्राप्त झालो आहे. आता मी माझा जीव याच्यावरून ओवाळून टाकीन. २ असा हा लाभ,
यापुढे घडेल असे नाही. फार दिवसांनी या लाभाची प्राप्ती मला झालेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात
श्रीहरीचा हा जो लाभ मला झाला आहे, तो समजून मी याचे चरण एक क्षणही सोडणार नाही. ४
८४९ उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥ १ ॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ २ ॥
संपुट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥ ३ ॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:-वारली-दूर झाली, संपुट-देवाला ठेवण्याचे पात्र.
अर्थ:-आज माझे भाग्य किती उजळून आले आहे पाहा. या श्रीहरीच्या प्राप्तीमुळे माझी सर्व चिंता दूर
झाली. १ संतांच्या दर्शनाने हा लाभ मला झाला, हा पद्मनाभ मला भेटला. २ याला आता माझ्या हृदयपेटीचे
संपुट करून मी जपून ठेवीन, साठवून ठेवीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा जो श्रेष्ठ प्रकारचा साठा होता,
तो मला भक्तिभावामुळे सापडला आहे. ४
८५० आम्हां आपुलें नायडे संचित । खरफडे चित्त कळवळ्यानें ॥ १ ॥
न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ २ ॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥ ३ ॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संचित-साठलेले कर्म
अर्थ:- ईश्वरा, आम्हांला आमचे कर्म आवडत नाही. यासाठी रात्रंदिवस आमचे चित्त एकसारखे तळमळत
असते. १ खरोखर या परमार्थामागचे खरे मर्म न समजल्यामुळे आमचा खोळंबाच झाला असून या जगात लोकांच्या
दृष्टीने मी नाना सोंगे आणणारा बहुरूपीच बनलो आहे. २ पण या सर्व गोष्टी आता मला समजून आल्या आहेत
हे एक बरे झाले. आता माझे डोळे उघडले आहेत. आता या मार्गात एखादा मार्गदर्शक कर्णधार मिळेल तर बरे. ३
तुकाराम महाराज म्हणतात, आमची करुणा तुम्हांस येत असेल तर, नारायणा, आमच्या संरक्षणासाठी उडी घ्या ना ४
८५१ वरगासाठीं लावलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥ १ ॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥ २ ॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥ ३ ॥
तुका फजीत करी बुच्या¹ । विसरे कुच्या खोडी तेणें ॥ ४ ॥
१ बुका.