सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 113, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 113

सार्थ तुकारामगाथा ८५
१६८ गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥ १ ॥
आम्ही न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ २ ॥
न साहावे भार । बहु लागतो उशीर ॥ ३ ॥
तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- रडी-चिडून राहिले.
अर्थ :- पुष्कळ वेळ यमुनेच्या तीरावर खेळ खेळल्यावर मग गोपाळ रडकुंडीस आले, चिडूनही गेले व म्हणू
लागले, कान्होबा, तू आमचा डाव चढूच देत नाहीस, तूच नेहमी जिंकतोस. १ आम्ही काही आता तुझ्याशी
खेळणार नाही, तुझी लबाडीची भावना आता आमच्या ध्यानात आली आहे. २ आम्हाला आता या तुझ्या डावाचे
ओझे सहन होत नाही व आम्हाला आता उशीरही झाला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणत एक
गोपाळ रागारागाने मागे निघून गेला. हरीला त्याने आपल्या मागे येऊनसुद्धा दिले नाही. ४
हाल-अभंग २
१६९ यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियासि ॥ १ ॥
हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ २ ॥
नांवें ठेवूनि बांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥ ३ ॥
तुका म्हणे कान्हो तिळतांदळाचा । जिंके तो करी आपुला खेळचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हाल-डाव, न वजे-चालणार नाही
अर्थ :- श्रीकृष्णाने यमुनेच्या तीरावर खेळ सुरु करुन आपल्या सवंगड्यांना तो म्हणाला, १ चला आपण
मोठा खेळ खेळू. डाव मांडू. उगाच व्यर्थ काळ घालवू नका. २ नावे ठेवून गडी वाटून घ्या; म्हणजे मग नंतर
कुणाला रडी करायला जागा सापडणार नाही. कुणाची तक्रार चालणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या
कान्होबाने कामक्रोधरूपी तिळातांदुळाची बोलीसुकी करुन त्याने डाव जिंकला व त्याने आपला खेळ सुरु केला. ४
१७० बळें डांईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥ १ ॥
मोकलें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडाव्या ॥ २ ॥
येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥ ३ ॥
तुका म्हणे घरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कळा-युक्ती.
अर्थ :- मोठ्या बळाने श्रीहरीला पकडण्याचा प्रयत्न करावा तर तो सापडत नाही. म्हणून बुद्धिकौशल्य
वापरुन जो त्याला पकडील तोच शहाणा ठरेल १ या श्रीकृष्णाला मोकळेपणाने खेळू द्यावे व समत्वभावाने
त्यास पकडून ठेवावे. २ तो अनेक वेळा हातात सापडतो, अनेक वेळा निसटून जातो; तो कायमचा सापडेल, हाती
राहील अशी काय युक्ती आहे हे समजत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याला जागच्या जागीच पकडून
ठेवा. त्याच्या पायांशीच जीवाने मिठी घालून राहिले पाहिजे. ४
सुतुतू-अभंग १
१७१ जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥ १ ॥
घाली सुतुतू फिरोनि पाही आपणासि ।
पाही बळिया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ २ ॥