सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 411, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३७५
तरि खंडे येरझार । निघे भार देहाचा ॥ ३ ॥
तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गळित व्हावे-संपावा, व्यापार-व्यवहार.
अर्थ :- आपला सर्व अभिमान संपावा. याच स्थितीचे नाव योग व तप असे आहे. १ जे काही तुम्हांस,
करावचे असेल ते हेच करा, की सत्याला धरून सर्व व्यवहार असावा. २ तरच तुमची जन्ममृत्यूची येजा संपेल व
देहबुद्धीचा भार कमी होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मानापमानाचेही ओझे आपणावर कधी घेऊ नये. ४
७८० करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥ १ ॥
तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं १ ॥ २ ॥
मजुराचें धन । विळा दोरचि जतन ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वारी-व्यर्थ घालवितो, आदा-जमा, वेंचा-खर्च.
अर्थ :- हा स्नानसंध्या वेळच्या वेळी करतो, पण दुसऱ्याचे अन्न खाऊन सारे व्यर्थ घालवितो. १ त्याला
मग कसलाच लाभ किंवा तोटा होत नाही. त्याच्या जमेचा व खर्चाचा हिशेब सारखाच राहतो. २ मजुराचे शेवटी
धन कोणते? तर त्याने आपल्या विळ्याचे किंवा दोराचे जतन केले असते तेच. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
अधीर होणाऱ्या माणसांस देव कसा भेटणार ? ४
७८१ वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेनें हालें ॥ १ ॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ २ ॥
अंगुलिया मोडी । त्यासी काय सिलें घोडीं ॥ ३ ॥
नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाखर-वस्तरा, अंगुलिया-बोटाच्या दावाने, सिलें-हत्यार, शस्त्र, जेठी-पहिलवान.
अर्थ :- कोणी एक मनुष्य हातातील वस्तारा घेऊनच धावून आला, तर त्यास तरवार घेऊन मारण्यास
जाण्याची काय जरूरी आहे ? १ 'हे काही ठीक नव्हे' असे म्हणूनही त्याला फजित करता येते. २ नुसत्या
बोटांच्या दाबानेच ज्याचा मोड होईल त्याच्यासाठी हत्यारांची किंवा घोडेस्वारांची काय जरूरी आहे ? ३
नपुंसकाच्या, नामर्दाच्या पराभवासाठी पहिलवानाची काय जरूरी आहे ? ४
७८२ वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥ १ ॥
तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगेंचि ब्रह्म व्हावें ॥ २ ॥
जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दांचें पांडित्य ॥ ३ ॥
गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥ ४ ॥
जाणसील तूं स्वतंत्र । आगमोक्त पूजामंत्र ॥ ५ ॥
साधनाच्या ओढी । डोलियांच्या मोडामोडी ॥ ६ ॥
तुका म्हणे देहीं । संत जाहाले विदेही ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- वर्णाश्रम-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व
सन्यासी हे चार आश्रम.
अर्थ :-धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तू वर्णाधर्मांचे धर्म पाळशील तर तू उत्तम लोकांस पावशील एवढेच. १
पण स्वतःच्या देहानेच ब्रह्मपदाचा अनुभव कसा घ्याया हे मात्र तुला समजणार नाही. २ तू जरी मोठा पंडित
१ मनीं