सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 295, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 295

२६२ सार्थ तुकारामगाथा
देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥ ३ ॥
राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- फरकट-कटकट, उजगरा-जागरण.
अर्थ :- चला. आता देवाचे दार बंद झाले आहे. येथे उगाच कटकट करू नका. १ चला, आता आपण
आपापल्या घरी जाऊ. इथे उगीच जागरण करून गडबड नका करू. २ देवाला झोप लागली आहे. येथे उभे राहून
काय साधणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे करण्याने देवास राग येईल. मग तो आपली सेवा घेणार
नाही. तेव्हा चला सर्वजण घरी. ४
५१६ कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥ १ ॥
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारु भवनदीची ॥ २ ॥
कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥ ३ ॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- तारू-नाव, परता-वेगळा, निराळा
अर्थ :- हा श्रीकृष्ण माझी माता आहे. श्रीकृष्ण माझा पिता आहे. बहिण, भाऊ, चुलता, सर्व काही हा
श्रीकृष्णच आहे माझा. १ हा श्रीकृष्ण माझा गुरु असून संसारसागर तरून नेणारी नावही हाच आहे. २ कृष्णच
माझे मन व हाच माझे इष्टजन होय. माझे सोयरे वगैरे आप्तजन हाच श्रीकृष्ण आहे. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हा श्रीकृष्ण माझा एक विसावा आहे याच्यापासून जीव निराळा असे वाटत नाही. ४
विवरण:- श्रीकृष्णावर, विठ्ठलावर तुकोबांचा किती जीव होता याचा उत्कृष्ट पुरावा म्हणून या अभंगाचा
देता येईल. बुवांचे सर्व जीवनच विष्णुमय, कृष्णमय होऊन गेले होते माता, पिता, बंधू, मित्र, सोयरा, गुरू, चुलता,
बहीण इत्यादी सर्व नात्यांनी खरा असा एक श्रीकृष्णच होय या भावाचे अनेक अभंग मराठी संतांचे सापडतील.
'तूं आम्हां सोयरा सज्जन सांगाती । गण गोत मित्र तूं माझें जीवन', 'तूं माझी माउली तूं माझी साउली । तूं मज
एकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव', 'मायबापबंधू सोयरा सांगाती । तूंचि माझी प्रीति गणगोत'
या शब्दांतून तुकोबांनी श्रीकृष्णाचे व आपले नाते स्पष्ट केले आहे नामदेव-एकनाथ यांनीही परमेश्वरात आपली
सर्व नाती पाहिली आहेत. 'मातापिता बंधुभगिनी इष्टमित्र विठ्ठला तूं रे' या शब्दात नामदेवानी या देवाची स्तुती
केली आहे. ज्ञानेश्वरांनीही श्रीकृष्णास उद्देशून 'तू गुरु बंधू पिता । तू आमची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता ।
आपदों आमुतें' असे त्याचे स्तवन केले आहे. श्रीकृष्ण सर्व नात्यांनी आपला आहे हा भाव सर्वत्र उमटलेला दिसेल
या भावाचे तात्त्विक अधिष्ठान अभंग क्र ४८६ च्या विवरणात पाहावे
५१७ कृपा करावी भगवंते । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥ १ ॥
माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ २ ॥
व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥ ३ ॥
तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पालवी-प्रेम, कृपा, गुंडा-प्रमुख
अर्थ:- भगवंताने कृपा करावी व मला असा एक शिष्य द्यावा, १ की जो माझे हे हरिनामाचे व भक्तिप्रेमाचे
व्रत पुढे चालवील असा हा शिष्य असावा त्यावरच तू प्रेमपूर्वक कृपा करावीस. २ माझा शिष्य ब्रह्मज्ञानाच्या
बाबतीत प्रमुख असावा. तीनही लोकात त्याची कीर्ती पसरून राहावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा
रीतीने मी माझ्या विठोबाच्या दारात उभा राहून हाका मारीत आहे. ४