सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 147, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १११
२४२ धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शहाणियां ॥ १ ॥
ऐसें जाणपणें पडलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ २ ॥
दोन्ही उभयतां आपणचि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥ ३ ॥
तुका म्हणे अंगापासुनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- जाणपणे-शहाणपणामुळे,
अर्थ:- जे दुर्बळ आहे, नेणते आहे त्याची आवड देवास किती असते हे तुकोबांनी या अभंगात फार मार्मिक
व वेचक शब्दांत सांगताना म्हटले आहे, जो वयाने लहान असतो त्याच्या मुखात आई प्रेमाने घास घालते व त्यास
भरविते व जो मोठ्या वयाचा व शहाणा झालेला असतो त्यास नाना प्रकारची कामे सांगून ती त्याच्यावर सत्ता
गाजविते. १ असे केवळ वय व शहाणपण वाढल्यामुळे आईच्या प्रीतीत अंतर पडते. जो जो ही जाणीव वाढते
तो तो प्रेमात उणीव निर्माण होते; फरक पडतो. २ लहान मुलास व मोठ्या मुलास तीच प्रसवित्ये; तीच त्या
दोघांचीही आई असते; पण तिच्या प्रीतीच्या रीतीत मात्र याप्रमाणे फरक पडून त्या निरनिराळ्या होतात. ३
तुकाराम महाराज म्हणतात, ती जाणत्या व शहाण्या मुलास आपल्या अंगापासून दूर लोटते व जे तान्हे मूल
पाळण्यात रडत असते त्यास मोठ्या प्रेमाने जवळ घेऊन स्तनास लावीत असते. तेव्हां आपण नेणतेच राहणे बरे
असा भावार्थ. ४
२४३ देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥ १ ॥
आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ २ ॥
त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥ ३ ॥
तुका म्हणे आळस करुनियां साहे । बळें कैसे पाहें यांयां जाती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- येरा-इतर सामान्य जनास, सांटा-साठा, साहे-साह्य.
अर्थ:- केवळ आम्ही ईश्वराचे दास किंवा भक्त म्हणूनच हे लोक देवाच्या ठिकाणी अनादराची भावना
दर्शवितात याचे मला मोठे आश्चर्य वाटते. १ मग आता ज्यांच्या शिरावर संसाराचे खरोखरीच मोठे ओझे आहे
त्यांना, इतर सामान्य लोकांना काय म्हणायचे ? २ हे भक्त लोकही संसाराचा त्याग करून अभिमानाचा साठा
वाढवितात हा मोठा जुलूमच म्हणावयास हवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे लोक आळसाच्या साह्यामुळे
वाया जातात, त्यांचे आयुष्य व्यर्थ होते. ४
२४४ उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥ १ ॥
नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ २ ॥
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥ ३ ॥
तुका म्हणे रत्नसार । परि उपकार¹ चिंधीचे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- कवटी-नारळाचे बाहेरचे कवच, सारी-चांगली, सार-मुख्य गोष्ट, बंदीजन-दासदासी.
अर्थ:- कोणताही उपदेश तो जरी भलत्या माणसाने केलेला असला तरी तो ध्यानात ठेवावा; मनात वाग-
वावा. १ वरवर दिसणाऱ्या भांड्याच्या रूपावर जाऊ नये. नारळाची कवटी वरवर खडबडीत असली तरी आतील
वस्तुमुळे चांगलीच मानतो ना आपण ती ? २ स्त्री, पुत्र, दासदासी यांचा त्याग करायला नको; कारण त्यांच्यामुळेच
नारायणाचे स्मरण होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, रत्न हे प्रमुख होय; पण ते एखाद्या साध्या चिंधीत
बांधले असले म्हणून काय झाले ? तेवढ्यापुरते चिंधीचेही उपकार मानायला हवेतच. ४
१ परी आधार चिंधीचा.