सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 581, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ५३५
या शरीराचा खरा मालक गीतेच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे नित्य, अविनाशी असा आत्माच असून त्याला
ओळखणे, त्याचे स्वरूप जाणणे, त्याचा व मूळ स्वरूपाचा सबंध ओळखणे हे खरे ज्ञान होय. हा आत्मा कधी मारला
जात नाही, नष्ट होत नाही. हा कधी जन्मत नाही, कधी मरत नाही. हा नित्य अज, शाश्वत व पुरात आहे. या
शरीराचा नाश झाला तरीही याला धक्का पोचत नाही. खरे म्हणजे हा देह म्हणजे 'काळाचें भातुकें'च होय. पण
या देहाच्या नाशाने 'जीव न देखे मरण' हे गीतेमधील तत्त्वच बुवा सांगत आहेत. 'घरी नवी जीर्ण सांडी' हे शब्द
म्हणजे गीतेमधील 'वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि' या तत्त्वस्पर्शी ओळीचाच सुबोध
मराठी अनुवाद होय. गीतेच्या तत्त्वाप्रमाणे या आत्मतत्त्वास कधी मरणच नाही. याला अग्नी जाळीत नाही, पाणी
भिजवीत नाही, वायू सुकवीत नाही. हा कधीही न तुटणारा, न जळणारा, न भिजणारा, न सुकणारा असा आत्मा
नित्य सर्वत्र भरलेला, स्थिर, अचल व सनातन म्हणजे चिरंतन आहे. देहान्तर झाले म्हणून काय झाले ? • जैसीं जीर्ण
वस्त्रे सांडिजे । मग नूतनें आणिके घेइजे । तैंसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यायें' असे थोडक्यात वर्णन ज्ञानेश्वरांनी
केले आहे. सुखदुःखादी इच्छांची वेल वाढत असलेल्या या शरीराचे खरे महत्त्व ओळखून, ते कमी महत्त्वाचे मानून
जे शुद्ध आत्मतत्त्व आहे, त्याचाच विचार केला तरच खरे ज्ञान होईल, असा तुकारामबुवांच्या म्हणण्याचा भावार्थ.
१२१७ पुसावेसें हेंचि वाटे । जें जें भेटे तयासी ॥ १ ॥
देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ २ ॥
अवघियांचा विसर जाला । हा राहिला उद्योग ॥ ३ ॥
तुका म्हणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अवधियांचा-सर्व विषयाचा.
अर्थ :- मला जे कुणी भेटतील त्यांना हेच एक विचारावेसे वाटते की, १ देव माझ्यावर कृपा करून
माझी लज्जा रक्षण करील काय ? २ मला सर्व विषयांचा विसर पडलेला असून हाच एक चिंतनाचा उद्योग
राहिलेला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या एकाच गोष्टीची मला चिंता वाटत आहे. या प्रश्नाचे उत्तर
कुणी देईल असे मला भेटेल काय ? ४
१२१८ जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥ १ ॥
खादलें पचे तरिच तें हित । ओकलिया थीत पिंड पीडि ॥ २ ॥
तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें १ जीवनासी ॥ ३ ॥
तुका म्हणे मज तारों गा विठ्ठला । नेणतांचि भला दास तुझा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- खुण-घात, खून, थीत-व्यर्थ, खाने-दरोडा.
अर्थ :- देवा, हा जाणतेपणाचा अभिमान माझाच घात करीत असल्यामुळे तुम्ही तो जाळून टाका. १ जे
खाल्लेले आहे, ते नीट पचले तर ठीक आहे. पण तेच जर न पचल्यामुळे ओकले गेले तर मग शरीराला व्यर्थच पीडा
आहे. २ जे धन मिळविले त्याचा प्रपंचास नीट उपयोग झाला तरच ठीक आहे, पण ते जर दरोड्यात नष्ट होईल
तर त्याचा जीवनात काहीच उपयोग न होता उलटा घात मात्र होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला,
तूच आता मला या संकटांतून तार. मी नेणता असून तुझाच दास आहे. ४
१२१९ याती मतिहीन रूपें लीन दीन । आणिक अवगुण जाणोनियां ॥ १ ॥
केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ २ ॥
जें कांहीं करितों तें माझें स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥ ३ ॥
१ खाण.