सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 569, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 569

सार्थ तुकारामगाथा ५२३
११८२ कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार ।
मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा - सवदा-सौदा
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी सौदा विकत आहे. जे कोणी घेतील त्यांची देहबुद्धीच हरेल.
साधुसंत गोड आहेत व मूर्खांच्या डोक्यावर मात्र मार बसेल १
११८३ तुका दास तिनका रे । रामभजन निरास ।
क्या विचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा - तिनका-त्याचा.
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, मी निष्काम मनाने रामाचे भजन करतो, त्याचा मी सेवक आहे.
मोठे पंडित जरी असले तरी, त्या गरीबाचे काय करावयाचे आहे ? का ? तर ते आशेने ज्याच्या त्याच्या पुढे हात
पसरतात. १
११८४ तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी रास ।
पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- पतंग-टोळ.
अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे टोळ हा प्रेमाने दिव्यावर उडी घालून स्वतःस जाळून
घेतो, तसे उत्तम प्रेम रामाच्या ठिकाणी तू ठेव. १
११८५ कहे तुका जग भुला रे । कह्या न मानत कोय ।
हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- डोय-डोके.
अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जग विषयांच्या संगतीने भूलून गेले आहे किती सांगितले तरी
कोणी मानीत नाहीत ज्या वेळेस त्याच्यावर काळाचा हात पडेल त्या वेळेस तो इतका मार घेईल की, त्या योगाने
डोके फुटेल. १
११८६ तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये ॥
चोट साहे धनकि रे । हिरा नीबरे तोये ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- सुरा-शूर, धनकि-घणाचे, चोट-घाव, आघात
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, जे बोलण्याने आपल्याला शूर मानतात, त्यांनी जोपर्यंत शूरत्व गाजवले
नाही, तोपर्यंत मी त्यांना मानीत नाही घणाचे घाव सोसून न फुटता जो टिकतो, त्याची खऱ्या हिऱ्याप्रमाणे निवड
होते. १
११८७ तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये ।
एक पावे उंच पदवी । एक खोसां जोये ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- विरला-एखादाच
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, तोंडाने आपणाला शूर म्हणविणारे पुष्कळ आहेत, पण खऱ्या प्रसंगी
धैर्य धरून शूरत्वाने युद्ध करणारे असे थोडे; म्हणून असे जे कोणी आहेत ते मोठे अधिकारी होतात. पण कित्येक
जोडा खाणारे असे नीच पदवीचे राहतात १

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 569, कुल 611 में से · SarvaKosh