सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 415, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 415

सार्थ तुकारामगाथा ३७९
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥ ४ ॥
पडदा लावूनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥ ५ ॥
नैवेद्यासी म्हणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥ ६ ॥
जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥ ७ ॥
पाषांड करोनी मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥ ८ ॥
कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥ ९ ॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥ १० ॥
विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥ ११ ॥
योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्याद्रिक ॥ १२ ॥
वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंटें ॥ १३ ॥
तुका म्हणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥ १४ ॥
शब्दार्थ व टीपा :- झगमग-चमक, झकविती-फसवितात, सांजरात्रीमाजी-संध्याकाळी, रात्रीच्या वेळेस,
वोजा-सहज, परवडी-नाना प्रकारची, पाषांड-नास्तिक, गुखाडी-नरकात जाणारे.
अर्थ :- शाक्त मार्गामधील हे गुरू कसे असतात ? तर शिष्यावर डोळे वटारून त्याच्यापुढे नाना रंगांची
चमक दिसेल असे करतात. १ आणि डोळ्यांस एक प्रकारची अंधारी आली म्हणजे शिष्याला सांगतात की, तुझी
समाधी लागली आहे. अशा प्रकारे लबाडी करून शिष्याला हे लोक फसवितात २ दिव्याच्या ज्योतीने घरामध्ये
तेज कोंदले आहे असे मानून हे गुरू संध्याकाळी व रात्री शिष्यांना उपदेश देतात. ३ भोवती रांगोळ्या वगैरे
काढून धान्याने चौक भरून सहज असा शृंगार करतात व त्रिकोणी यंत्राची पूजा करतात. ४ समोवती पडदे लावून
आत चहूबाजूंनी दिवे लावतात व आपण स्वतः आसनावर बसून मुद्रा लावतात. ५ शिष्याला नैवेद्यासाठी पक्वान्ने
करावया सांगतात व नाना प्रकारची ही पक्वान्ने पात्रांत वाढून देवापुढे ठेवल्याचा देखावा करतात. ६ मग शिष्यांस
म्हणतात, झाला आता उपदेश. आता तोंडांत एकेक घास घ्या आपोशन घेण्याची यांना काही जरूरी वाटत नाही ७
अशा प्रकारे हे गुरू नास्तिक्य पसरवून पोट भरण्याचा उद्योग जीविकात आरंभतात व लोकांना फसवितात. ८
काया, वाचा, मन गुरूला अर्पण करण्याचा संकल्प सोडवून गुरूच्या नामाचा जप वारंवार करायला सांगतात. ९
खराखुरा परमार्थ यानी बुडविलेला असून गुरुपणाच्या भूषणाने हे केवळ ऐश्वर्य भोगत असतात. १० वेदात
असलेला सर्व शास्त्रविधीचा यांनी लोप केलेला असून सर्व शास्त्रांचाही बोध नाहीसा केलेला असतो. ११ यांना
योगयाग व ध्यानधारणा यांची नीट माहिती नसते; कारण नित्यकर्म व यमनियमादी साधने यांचा यांनी त्यागच
केलेला असतो. १२ यांच्या वैराग्याचा लोपच झालेला असून यांना श्रीहरीच्या भजनाविषयी त्रास वाटतो अशा
या नास्तिकांनी जगात मुद्दामच पाप वाढविलेले असते. १३ तुकाराम महाराज म्हणतात, असा याचा गुरुपणा
नरकात जावो कारण हे त्यांचे कृत्य त्यांच्या पूर्वजांसहही नरकात धाडणारे आहे. १४