सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 326, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२९२ सार्थ तुकारामगाथा
देहाचा होम वगैरे करून शुद्ध झालो. ३ जीव व शिव यांची अज्ञानामुळे ताटातूट झाली होती. पण त्यांचे ऐक्य
जाणून हा तुकाराम एकरूप झाला. ४
६०२ त्रैलोक्य पालितां उगला नाहीं । आमचें त्या काई असे ओझें ॥ १ ॥
पाषाणाचे पोटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चार कोण घाली ॥ २ ॥
पक्षी अजगर न करी संचित । तयास अनंत प्रतिपाळी ॥ ३ ॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उबगला-त्रासला, दर्दुर-बेडूक, संचित-संचय, साठा.
अर्थ - हा माझा देव त्रैलोक्याचा सांभाळ करतो; तरी तो कधी त्रासता नाही. त्याला आमच्या सारख्याचे
ओझे असे मोठेसे काय आहे ? १ पाषाणाच्या पोटात बेडूक वस्ती करून असतो. त्याच्या मुखात अन्न नेऊन या
नारायणाशिवाय कोण घालतो ? २ पक्षी किंवा आळशी असणारे अजगर यांनी कशाचा साठा केलेला असतो ?
तरी तो प्रभू त्याचा सांभाळ करतोच ना ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या ईश्वरावर भार घालावा सर्व. मग
तो दयेचा सिंधू कधी आपल्या भक्ताची उपेक्षा करणार नाही. ४
६०३ बोली मंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥ १ ॥
कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ २ ॥
टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घाटी ॥ ३ ॥
तुका म्हणे तो केवळ पुंड । त्यावरि वाजती यमदंड ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मंद-कपटी, ढोंगी, घाटी-गळा
अर्थ - ढोंगी किंवा कपटी माणसाचे बोलणे वरवर मोठे गोड वाटते. पण फांसे टाकून पकडण्याचेच साधन
त्याने मनात धरले असावे असे वाटते. १ वरवर तो कसा चांगला दिसतो; पण तो त्यामुळे काही भाविक नसतो,
केवळ मांगाचेच गुण त्याच्यात असतात. २ कपाळावर गंधाचा टिळा, डोक्यावर टोपी, गळ्यात माळा, असा वरवरचा
वेष असला तरी, मनातून अंधारात नेऊन एखाद्याचा गळा दाबावा अशी त्याची वासना असते. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, असा मनुष्य केवळ पुंडाई करणारा गुंडच समजावा. त्याच्यावर यमाचा दंड सारखा फिरत असतो. ४
६०४ दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामसंकीर्तनें ॥ १ ॥
हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ २ ॥
तुम्ही पापा भीतां । आम्हां उपजायया चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणे सेवा । कळीकाळा जिंकी देवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपजावयाची-जन्म घेण्याची
अर्थ - देवा, तुमच्या नामसंकीर्तनामुळे सर्व दोष नाहीसे होतात. १ अशा अर्थाचे आपलेच वचन पुराणातून
आहे. तरी देवा, तुम्ही आपल्याच वचनाला खोटे का ठरविता ? २ आमच्या पापाला देवा, तुम्ही भिता की काय ?
आम्हाला पुनः पुनः जन्म घेण्याची भीती असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची सेवा प्रत्यक्ष यमासही
जिंकणारी आहे. ४
६०५ करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥ १ ॥
वृत्ति राखा पायांपाशीं । वस्ती धरूनी मानसीं ॥ २ ॥
पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥ ३ ॥
तुका म्हणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा- खंडणा-नाश, मानसीं-मनात.