सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 25, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 25

... एकतीस ...
तुकाराम महाराजांनी ईश्वराची जवळीक सर्वांच्या घरीच आणून उभी केली. कारण 'कथा देवाचें हें
ध्यान । कथा साधन मंडण ॥ कथे ऐसें पुण्य । आणिक नाहीं सर्वथा ॥ ऐसा साच खरा भाव । कथे-
माजी उभा देव ।।' एवढी महती कथाकीर्तनाची त्यांनी सांगितली आहे. या हरिरूपेत देव, भक्त
आणि नाम असा त्रिवेणीसंगम असतो. 'तीर्थे तया ठायां । येती पुनीत व्हावया' इतका या कथेचा
महिमा तुकारामांच्या मते मोठा आहे. या कीर्तनातील सुख किती मोठे आहे ?
सोपें धर्म आम्हां सांगितलें संतों । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ॥
समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसा या कीर्तनीं ब्रह्मरस ॥
कथा ज्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी आपल्या दूतांनी जाऊ नये, अशी यमाची त्यांना
आज्ञा असल्याचे तुकोबांनी सांगितले आहे. कीर्तन ही खरीखुरी व थोर दर्जाची समाधी असून सर्व
प्रकारची सुखे या कीर्तनात प्राप्त होतात
जप तप ध्यान नलगे धारणा । विठ्ठल कीर्तनामाजी उभा ॥
राहे माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥
कीर्तनीं समाधि, साधन तें मूळ । राहतील धारा धरोनियां ॥
तुका म्हणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी रिद्धीसिद्धी ॥
'उरलों उपकारापुरतां'
अशा प्रकारे तुकोबांची अभंगवाणी विठ्ठलप्रीतीने रंगलेली आहे. तीच स्वानुभूतीचे तेज आहे.
भक्तीचा जिव्हाळा आहे नामसंकीर्तनाचा, संतमाहात्म्याचा, विठ्ठलरूपाचा, व भक्तितत्त्वाचा जयजयकार
आहे या अतिशय पावन व परम मंगल अशा वाणीने समकालीन नव्हे, तर पुढेही अनेक शतके उपयुक्त
होईल, अशा उपदेशामृताचा वर्षाव केला आहे. आपली वाणी ही ईश्वराची वाणी असून आपण त्याचेच
कार्य करावयास आलो आहोत, असा सार्थ अभिमान व विश्वास त्यांना वाटत असे. त्यांच्या उपदेशात
ईश्वरी शक्तीचे तेज व स्वजनाविषयी तळमळ असल्यामुळेच त्याचा प्रभाव आजही पडण्यासारखा आहे.
'धर्मचें पाळण । करणे पाषांड खंडण ॥ हेंच आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥' या एका
कार्यासाठी आपला अवतार आहे असे त्यांनी म्हटले आहे 'आम्ही वैकुंठनवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ झाडूं संतांचे मारग । आदरानीं भरले जग । उच्छिष्टाचा भाग ।
शेष उरला तो सेवूं ॥ अर्थ लोपलीं पुराणे । नाश केला शब्द ज्ञानें ॥ विषयलोभी मनें । साधनें बुडविलीं ॥
पिटूं भक्तीचा डांगोरा । कळी काळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥' या एकाच
कार्यासाठी तुकारामबुवा स्वतःस साक्षात्कार झाल्यानंतरही उरले होते 'तुका म्हणे आतां उरलों उप-
कारापुरता ॥' असे त्यांनीच म्हटले आहे. 'आपण जेवुनी जेववी लोकां । संतर्पण करी तुका' ही
त्यांची भूमिका होती. लोकांना सन्मार्गास लावून त्याचे सर्वतोपरी कल्याण साधणे, एवढेच कार्य त्यांना
आता उरले होते. या साठी 'तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे । नाहीं भीड भार । तुका म्हणे
सांगा थोर' अशी आपली भूमिका निर्माण करावी, या साठी ते 'कांस घालोनि बळकट । आलो कळि-
काळाशीं नीट' अशा भूमिकेवरून लोकांना म्हणत आहेत; 'या रे या रे लहान थोर । याती भलते
नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी' कुणासही चिंता उरू नये, या भूमिकेवरून त्यांनी
लोकांना उपदेश केला. तो आजही कितीतरी अधिक अर्थाने उपयुक्त आहे. पराकोटीची निवृत्ती कोण-
त्याही संताने शिकविली नाही. पण केवळ धनदौलत व स्वतःची बायकामुळे, यातच रमणाऱ्या माणसाची
गयही त्यांनी केलेली नाही. माणसाच्या जन्मास येऊन काय मिळवायचे, हे फक्त तुकाराम महाराजांसारखे
सद्गुरुच सांगू शकतात.