दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
| ४२६ | श्रीदासबोध. | [ दशक |
|---|
वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काय वेंचे । जाणते पुरुष
प्रचीतींचे । ते तों मानीतना ॥ २७ ॥ उगीच बोलणें अनुमानाचें । अनु-
मानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २८ ॥ स-
गट विचार तो अविचार । किती एक म्हणती एकंकार । एकंकार भ्रष्टाकार ।
करूं नये ॥ २९ ॥ कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं एक शुद्ध घ्यावें । जाण-
जाणोनि निवडावें । सारासार ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विंशतिदशके आत्मनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. देहक्षेत्र.
श्रीगणेशाय नमः ॥ विधिप्रपंचतरु¹ वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण
झाला । फळें येतां विश्रांति पावला । बहुत प्राणी ॥ १ ॥ नाना फळें रसाळें
लागलीं । नानाजिन्नसें² गोडीस आलीं । गोडी पाहावया निर्माण केलीं ।
नाना शरीरें ॥ २ ॥ निर्माण जाहले उत्तम विषय । शरीराविणें भोगितां
न ये । म्हणोनि निर्मिला उपाय । नाना शरीरें ॥ ३ ॥ ज्ञानेंद्रियें निर्माण
केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं । एका शरीरास लागलीं । परी वेगळालीं
॥ ४ ॥ श्रोत्रेंद्रियीं शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला । ऐसा उपाय
निर्माण केला । इंद्रियांमध्यें ॥ ५ ॥ त्वचेंद्रियें शीतोष्ण भासे । चक्षुरिंद्रियें
सकळ दिसे । इंद्रियांमध्यें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥ जिव्हेमध्यें रस चाखणें ।
घ्राणामध्यें परिमळ घेणें । इंद्रियांमध्यें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥ वायु-
पंचकीं अंतःकरणपंचक । मिसळोन फिरे निःशंक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें सक-
ळिक । सावकाश पाहे ॥ ८ ॥ कर्मेंद्रियें लागवेगें³ । जीव भोगी विषयां-
लागीं । ऐसा हा उपाय जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥ विषय निर्माण झाले
बरवे । शरीराविण कैसे भोगावे । नाना शरीरांचे गोवे । याच कारणें ॥ १० ॥
अस्थिमांसांचीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं । लहान थोर
निर्माण झालीं । येणें प्रकारें ॥ ११ ॥ अस्थिमांसांचीं शरीरें । निर्माण केलीं
जगदीश्वरें । विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १२ ॥ अस्थिमांसांचा पुतळा ।
जाणे ज्ञानें सकळ कळा । शरीरभेद वेगळा । ठायीं ठायीं ॥ १३ ॥ तो भेद
तळटीपा :
१. ब्रह्मदेवाचा संसार हाच कोणी एक वृक्ष.
२. अनेक प्रकारें.
३. उत्कंठेनें.
२० वा. ] सूक्ष्म ब्रह्म. ४२७
कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण । सकळ तीक्ष्णबुद्धीविण । काय कळे
॥ १४ ॥ सकळ करणें ईश्वराला । म्हणोनि भेद निर्माण केला । ऊर्ध्वमुख होतां
भेदाला । ठाव कैंचा ॥ १५ ॥ सृष्टिकर्मीं अगत्य भेद । संहारें सहजचि
अभेद । भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १६ ॥ मायेमध्यें अंतरात्मा ।
न कळे तयाचा महिमा । झाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १७॥
पीळ पेंच कडोविकर्डीं । तर्क तीक्ष्ण घडीनें घडी । मनासि होय तांतडी ।
विवरण करितां ॥ १८ ॥ आत्मत्वीं लागलें सकळ कांहीं । निरंजनीं हें
कांहींच नाहीं । एकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ १९ ॥ देह-
सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदीश्वर । थोर सामर्थ्यं अवतार । बोलि-
जेती ॥ २० ॥ शेष कूर्म वराह झाले । येव्हढे देह विशाल धरिले । तेणें-
करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २१ ॥ ईश्वरें केव्हडें यंत्र केलें । सूर्य-
बिंब धांवाया लाविलें । धुक्टाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २२ ॥
पर्वता ऐसें ढग उचलती । सूर्यबिंबास आच्छादिती । तेथें सर्वैचि वायूची गती ।
प्रगट होय ॥ २३ ॥ झिडझिडकूं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियांरा ।
ढग मारून दिनकरा । मोकळें करी ॥ २४ ॥ बैसती विजांचे तडाखे ।
प्राणिमात्र अवचितां धाके । गगन कडकडून तडके । स्थळांतरीं ॥ २५ ॥
एकासि एक वर्म केलें । महद्भूतें महद्भूत आलिलें । सकळ समभागें चालि-
लें । सृष्टिरचनेसी ॥ २६ ॥ ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसें
कैंचे । विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २७ ॥ ऐसी माझी उपा-
सना । उपासकीं आणावी मना । अगाध महिमा चतुरानना । काय कळे
॥ २८ ॥ आवाहनविसर्जन । हेंचि भजनाचें लक्षण । सकळ जाणती सजन ।
मी काय सांगों ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके
देहक्षेत्रनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. सूक्ष्मब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ मृत्तिकापूजन करावें । आणि सर्वैचि विसर्जावें ।
१. आत्मरूपासन्निध. २. युक्तिप्रयुक्तीनें. ३. धुराचे मेघ बनविले, असा भाव.
४. चाकर. ५. ठिकऱ्या ठिकऱ्या. ६. मायेची उभारणी आणि संहारणी.
३२८ श्रीदासबोध. [ दशक
हें मानेना स्वभावें । अंतःकरणासी ॥ १ ॥ देव पूजावा आणि टाकावा ।
हें प्रशस्त न वाटे जीवा । याचा विचार पहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव
करिंजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोन याचा कांहीं । विचार
पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरूनि मागुती सोडितो । तरी
तो देव कैसा आहे तो । विवेकें ओळखावा ॥४॥ नाना साधनें निरूपणें ।
देव शोधायाकारणें । सकळ आपुल्या अंतःकरणें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥
ब्रह्मज्ञानाचा उपाय । समजल्याविण देतां न ये । पदार्थ आहे मा घे जाय ।
ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा
देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहतां
तगेना । त्यास देव ऐसें म्हणवेना । परंतु जन राहेना । काय करावें ॥८॥
थोर लोक मरौन जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहती । तैशीच आहे ही
गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली
रखतवानी । राज्यसंपदा तयाचेनी । प्राप्त कैंची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका
भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पा-
विजेल कैंचा ॥ ११ ॥ अज्ञानासि ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न
माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणे । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून
मुळासि जावें । तरीच समाधान पावावें। ऐसें न होतां भरंगळावें । भलती-
कडे ॥१३॥ माया उल्लंघायाकारणें । देवासि नाना उपाय करणें । अध्यात्म-
श्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लौकिकीं । अवघीच
होते चुकाचुकी । स्थिति खरी आणि लटिकी । ऐशी ओळखावी ॥ १५ ॥
खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगति धरूं नये । खोटें संग्रहीं करूं
नये । कांहीं एक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खऱ्यासि तगेना तें
बालटें । मन अधोमुख तें उफरटें । केलें पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत
जावें । म्हणजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती
॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसें मन उगवावें । मानत मानत घा-
लावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळांचें सकळ
जाहलें । शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥२०॥ काय तें येथेंचि पाहावें ।
१. तसविरी. २. मजूरकाम. ३. प्रवृत्तिमार्गात असलेले. ४. निवृत्त.
कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥
निर्गुण निर्विकार एक । तें सर्वां ठायीं व्यापक । देहामध्यें तें निष्कलंका ।
आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकरणाचें स्वरूप ।
जड चेतवी चैतन्यरूप । तेंहि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समान गुण गुणसाम्य ।
सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाण ते प्रणम्ये¹। तयां समस्तांसी
॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांगें दक्षिणांग² विचार । तोचि अर्धनारी
नटेश्वर । पिंडीं ओळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृति पुरुष जाणिजे । शिव-श-
क्ति बोलिजे । षड्गुणेश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच
म्हणिजे महत्तत्त्व । मीपणें तयास अहंतत्त्व । निश्चयें बुद्धितत्व । तयासीच
म्हणती ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रत्यक्ष दिसे विचार । मुळींच्या
कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जाणीव । हाहि
दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राय । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड
पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहतें । शाश्वत समजोन मग तें । दृढ
धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्म-
ब्रह्मनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. विमल ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ धरूं जातां धरितां नये । टाकूं जातां टाकितां नये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें ।
विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ २ ॥
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे ।
पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें ।
तिकडे आकाशाचि भोंवतें । बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥४॥ जि-
कडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे ।
मध्यान्हीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे एकदेशी । दृष्टांत न घडे व-
स्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थे ना-
ना देशीं । कष्टत जावें पाहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं
१. प्रणाम, नमस्कार. २. डावा व उजवा भाग.
॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें
तत्वतां । समागमें ॥ ८ ॥ पक्षी अंतराळीं गेला । भोवतें आकाशाचि तया-
ला । तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ९ ॥ परब्रह्म पोकळ घनदाट ।
परब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासि त्यासि ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥१०॥ दृश्य
सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास
यावी ॥ ११ ॥ वैकुंठ कैलास स्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । प-
न्नागादि पाताळलोकीं । तेथेंहि आहे ॥१२॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें
अपार । पाहतां पाहतां पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें एकलें ।
एकदाचि सकळांस व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं
॥ १४ ॥ परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामध्ये परी
वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ एकसरें सन्मुख । वाम १ सव्य २ दोहोंकडे
एक । अधोर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो
भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे
॥ १७ ॥ एकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्य भास । भासेंविण
निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ संत साधु महानुभावां । देव दानव
मानवां । परब्रह्म सकळांस विसांवा । विश्रांति ठाव ॥ १९ ॥ कोणीकडे
शेवटास जावें । कोणीकडे काय पाहावें । असंभाव्य तें मानावें । काय म्ह-
णोनी ॥ २० ॥ स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एक सारिखें नव्हे । ज्ञान-
दृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांड निरास । मग तें ब्रह्म निरा-
भास । येथून तेथवरी आकाश । भकासरूपें ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक हें तों
खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापाविण कोण्या प्रकारें । व्या-
पक म्हणावें ॥ २३ ॥ ब्रह्मासि शब्दाचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ४ ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें ओळखावें ॥ २४ ॥ शुद्ध सार श्रवण । शुद्ध
प्रत्ययाचें मनन । विज्ञानीं पावत उन्मन ३ । सहजाचि होतें ॥ २५ ॥ झालें
साधनाचें फळ । संसार झाला सकळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं
बिंबलें ॥ २६ ॥ हिशेब झाला मायेचा । झाला निवाडा तत्वांचा । साध्यें
होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृ-
१. डावें. २. उजवें. ३. संकल्पविकल्परहित स्थिति. ४. ब्रह्मरूप.
२० वा.] विमल ब्रह्म. ४३१
तीस उडालें । सहजाचि अनिर्वाच्यें झालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ ऐसें हें
विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसि बाणावें । जन्ममृत्यूंच्या नांवें । शून्याकार
॥ २९ ॥ भक्तांचेनी साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं
वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां
शोध । मननकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥ वीस दशक दोन-
शें समास । साधकें पाहावे सावकाश । विवरतां विशेषाविशेष । कळों
लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन । येथें प्रत्य-
यास कारण । प्रत्यय पाहावा ॥ ३३ ॥ देह तंव पांचां भूतांचा । कर्ता
आत्मा तेथींचा । आणि कवित्वप्रकार मनुष्यांचा । कशावरुनी ॥ ३४ ॥
सकळ करणें जगदीशाचें । आणि कवित्व मनुष्यांचें । ऐशा अप्रमाण बोल-
ण्याचें । काय घ्यावें ॥ ३५ ॥ सकळ देहांचा झाडा केला । तत्वसमुदाय
उडाला । तेथें कोणत्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥ ऐसीं हीं वि-
चाराचीं कामें । उगीच भ्रमो नये भ्रमें । जगदीशेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें
॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके विमलब्रह्मनिरू-
पणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३०८.
एकूण ओंवीसख्या ७७५०.
समाप्त.
१. बोलून दाखविण्यास कठीण. २. रघुवीरानें.
॥ श्री ॥
दासबोधाची आरती.
जय जय दासबोधा ग्रन्थराज प्रसिद्धा ।
आरती वोवाळीन विमळज्ञान बाळबोधा ॥ ध्रु० ॥
वेदांतसंमतीचा काव्यसिंधु भरला ।
श्रुति शास्त्रग्रन्थ गीता साक्ष संगम केला ।
महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला ।
अज्ञान जड जीवां मार्ग सुगम जाला ॥ १ ॥
नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी ।
चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी ।
हरिहरहृदयींचें गुह्य प्रगट दावी ।
बद्धाचि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥ २ ॥
वीसही दशकींचा अनुभव जो पाहे ।
नित्यनेमें विवरितां स्वयें ब्रह्मचि होय ।
अपार पुण्य गांठीं तरी श्रवण लाहे ।
कल्याणलेखकाचे भावगर्भ हृदयीं ॥ ३ ॥