छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
यश मिळू शकले नाही. उलट मराठ्यांचे पराक्रम वाढत चालले. इ. स. १६७३
च्या ऑक्टोबर महिन्यात शिवाजीने पांडवगड जिंकून घेतला आणि तेथून थेट
त्याने कारवारपर्यंत धडक मारली. शिवाजीचे हे सर्व पराक्रम ऐकून औरंगजेबाची
चीड वाढत चालली. दिलेरखानावरचा त्याचा विश्वास उडाला. शाहजादा
मुअज्जम कडून कोणतीच कामगिरी होत नव्हती. त्यामुळे दक्षिणेचे राजकारण
हा औरंगजेबाच्या चिंतेचा विषय झाला होता. तेव्हा जानेवारी १६७३ मध्ये
बहादूरखान या विश्वासू सरदारास दक्षिणेच्या मोहिमेवर औरंगजेबाने पाठविले.
दिलेरखान व बहादूरखान दोघे एकत्र आले आणि मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण
करण्याची योजना त्यांनी मांडली. परंतु कोणत्या बाजूने आक्रमण करावे याचा
निर्णयच त्यांना लवकर घेता आला नाही दरम्यान एका चकमकीत शिवाजीने
मुघलांचे एक हजार सैन्य गारद केले. त्यामुळे तर बहादूरखानाचे धाबेच
दणाणले. दिलेरखानाला वारंवार अपयश आलेले पाहून औरंगजेबाने त्याला
उत्तरेत बोलाविले. त्यामुळे मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची जबाबदारी
एकट्या बहादूरखानांवर पडली. बहादूरखान लोभी वृत्तीचा असल्यामुळे त्याला
काहीतरी आमिष दाखविले की त्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तो गप्प
बसले अशी शिवाजीची खात्री होती. आणि म्हणून, “बहादूरखान पेंडीचे गुरू
आहेत, त्याचा गुमान काय?” असे मतप्रदर्शन शिवाजीने केल्याचे सभासदाने
नमूद करून ठेवलेले आहे.
बहलोलखानाला पराभूत केल्यानंतर शिवाजीने दिलेरखान व बहादूरखान
यांचीही वाट लावली. आदिलशाही दरबार व दिल्लीचा दरबार शिवाजीच्या
पराक्रमामुळे भयचकीत झाला. औरंगजेब अधिक अस्वस्थ झाला आणि
विजापूरच्या खवासखानाची झोप उडाली. पोतुगिजांनी तर केव्हाच नरमाईचे
धोरण स्वीकारले होते. डच, फ्रेंच आणि इंग्रज आपला व्यापार सांभाळण्यासाठी
शिवाजीला मान देऊ लागले होते. कुतुबशहाशी तर शिवाजीचे चांगले सख्य
होते. जंजिऱ्याचे सिद्दी काहीतरी कुरापत काढून मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी
करीत होते. परंतु किनारी प्रदेशात शिवाजीने एवढी चोख व्यवस्था केली होती
की सिद्दीही नामोहरम होऊन स्वस्थ बसले. थोडक्यात इ. स. १६७४ च्या
पूर्वार्धात शिवाजीचे सर्व शत्रू नामोहरम झाले होते आणि नरमले होते.
राज्याभिषेक करण्यासाठी हीच मोठी संधी आहे असा विचार करून शिवाजीने
गागाभट्टाशी विचारविनिमय करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित
केले.
□□□
मुघलांची पिछेहाट ७१
१०. शिवराज्याभिषेक
राज्याभिषेकाचे प्रयोजन
शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्या स्वतंत्र राज्याची
कोणतीही घोषणा केली नव्हती. १६३६ मध्ये आदिलशहाची नोकरी पत्करून
शहाजी जेव्हा कर्नाटकाकडे गेला त्यावेळी पुणे जहागिरीचा कारभार त्याने
बालशिवाजीकडे सोपविला होता. या मूळ जहागिरीच्या आधारे शिवाजी
महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली. शिवाजीच्या जहागिरीचा
म्हणजे राज्याचा विस्तार होत आहे हे पाहून आदिलशहा आणि मुघल
शिवाजीच्या हेतूविषयी साशंक झाले. शिवाजी केवळ जहागिरीचा विस्तार करीत
नसून स्वतंत्र राज्याचीच उभारणी करीत आहे याची खात्री १६६५ पर्यंत मुघल,
आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि इतर वखारवाले यांना पटली. विशेषतः
औरंगजेबाला शिवाजीचा हेतू धोकादायक असल्याचे लक्षात आले आणि म्हणून
मिर्झाराजे जयसिंगाला पाठवून त्याने शिवाजीचे राज्यच नष्टप्राय करण्याची
योजना आखली. ती यशस्वी झाली नाही, तेव्हा शिवाजीला उत्तरेत बोलावून
घेऊन त्याला कैदेत टाकण्याचा डाव औरंगजेबाने साधला. पण त्यातूनही
शिवाजी सहीसलामत निसटला आणि दक्षिणेत परत येऊन त्याने आपल्या
राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला.
पाश्चात्त्य वखारवाल्यांना नामोहरम केले. आदिलशहा व कुतुबशहा यांना आपले
वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. आपले राज्य आता निर्वेध झाले आहे
अशी खात्री पटल्यावर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले.
मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य स्थापन करणे शिवाजीला
आवश्यक होते. मोठ्या चतुराईने आणि कौशल्याने, तसेच अप्रतिम पराक्रमाने,
प्रसंगी जीवघेणे धाडस करून किंवा जीवाची बाजी लावून शिवाजीने स्वराज्याची
उभारणी केली होती. या कार्यासाठी साधुसंतांचे आशीर्वाद मिळवून देशावरील
व कोकणातील देसाई, देशमुखांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनाही
स्वराज्यकार्यात सहभागी करून घेतले. आपल्या राज्यातील रयतेला सुखी
७२
करण्यासाठी संकल्प शिवाजीने सोडला होता. परकीयांच्या राज्यात, विशेषतः
मुघलांच्या राज्यात गोरगरीब जनतेवर भयानक अन्याय होत होता. स्त्रियांची
विटंबना होत होती आणि सज्जन साधुसंतांची अवहेलना होत होती. हा सर्व
अन्याय निपटून काढण्यासाठी शिवाजीने स्वराज्य उभारण्याचा खटाटोप केलेला
होता. आता हे राज्य स्थिर झाल्यामुळे भावी काळात राज्याचा वारस निश्चित
होण्यासाठी शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून जाहिर करून घेणे अत्यंत आवश्यक
होते. त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग शिवाजीपुढे होता.
राजमाता जिजाबाई आणि शिवाजीचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून
मराठा राजवंश स्थापन करण्यासाठी शिवाजीला राज्याभिषेक करवून घेण्यासाठी
उद्युक्त केले असावे. मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये म्हटले आहे की,
‘महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणोन छत्र सिंहासन करावे,
राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय जाहाला.’ राज्याभिषेक करून
घेण्यामागे शिवाजीचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे स्वतंत्र राजा म्हणून
त्याला अभिषेकाने मान्यता मिळणार होती आणि त्यानंतर त्याच्या शत्रूंनाही
त्याला राजा म्हणून मानणे भाग पडणार होते. शिवाय जे अन्य शाही दरबारात
नोकरीला होते ते मराठे सरदार शिवाजीला आपल्या बरोबरीचे किंवा कमीप्रतीचे
मानत असत. अभिषेकानंतर त्यांनाही शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून मानणे
भाग पडणार होते. शिवाजीचा दुसरा उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील वतने,
इनामे, वृत्ती देण्याचा अधिकार त्याला अभिषेकाने प्राप्त होणार होता. शिवाय
मध्ययुगीन राज्यप्रशासन पद्धतीप्रमाणे शिवाजीचे राज्यही वंशपरंपरेने चालणार
होते. राज्याभिषेक करण्याचे निश्चित झाल्यावर किल्ले रायगड हे ठिकाण
राजधानीसाठी शिवाजीने निवडले. हिरोजी इंदुलकर या स्थापत्यविशारदाकडे
रायगडावर राजमहाल, राण्यांचे आणि राजपुत्रांचे महाल, मंत्र्यांचे वाडे आणि
इतर इमारती बांधण्याचे काम दिले. या मोठ्या इमारतींशिवाय पाण्यासाठी प्रशस्त
तलाव, लहानमोठ्या अधिकाऱ्यांसाठी घरे, बाजारपेठ, दारूची कोठारे, गजशाळा,
अंबरखाना इत्यादी इमारती उभारून राजधानीचे वैभव वाढविण्यात आले.
त्याचप्रमाणे जगदिश्वराचे मंदिर शिवाजीच्या आज्ञेप्रमाणे हिरोजी इंदुलकरने
उभारले. अशाप्रकारे राजधानी सजविली. राज्याभिषेकाचा मुहूर्त गागाभट्टाने
काढला. ‘राज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘तुलापुरुषदानविधी’ या दोन पोथ्या
गागाभट्टाने मुद्दाम तयार केल्या. १६७४च्या प्रारंभी राजधानी रायगडावर
राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू झाली.
शिवराज्याभिषेक ७३
काही दुर्दैवी घटना
राज्याभिषेकाची तयारी चालू असताना काही दुर्दैवी आणि दुःखद घटना
घडल्या. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या लढाईत प्रतापराव गुजर मारला
गेला. शिवाजीला त्यामुळे विलक्षण दुःख झाले. आपले शब्द प्रत्यक्षात
आणण्यासाठी प्रतापरावने प्राणाची आहुती दिली हे शिवाजीच्या मनास फार
लागले. या दुःखातून सावरतो न सावरतो तोच शिवाजीला आणखी एका
शोककारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. १६ मार्च १६७४ रोजी शिवाजीची
एक पत्नी काशीबाई हिचा रायगडावर मृत्यू झाला. अशा या घटनांमुळे
शिवाजीची मनःस्थिती विचलित झाली. परंतु राज्याभिषेकाचा विधी चातुर्मास
सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक होते. नाहीतर पुढे ५-६ महिने अभिषेकाला
मुहूर्त नव्हता. शेवटी ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ हा दिवस राज्याभिषेकासाठी
निश्चित करण्यात आला. तिथी निश्चित झाल्यावर समारंभाची तयारी जलद गतीने
सुरू झाली. एप्रिल १६७४ मध्ये कर्नाटकाची स्वारी उरकून शिवाजी रायगडला
परतला, त्यासुमारास राज्याभिषेकाची कडेकोट तयारी झाली होती. या भव्य
दिव्य प्रसंगाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून शिवाजीने सीमेवरील
सैनिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या. मे १६७४ मध्ये शिवाजीने
पुन्हा एकदा चिपळूणच्या लष्करी तळाची पहाणी केली. रायगडवरील समारंभ
निर्वेध पार पडण्यासाठी चिपळूणच्या लष्करी तळाकडे महत्त्वाची जबाबदारी
होती. यथासांग तयारी झाल्यानंतर १९ मे १६७४ रोजी शिवाजी प्रतापगडावर
गेला आणि आपली कुलदेवता तुळजाभवानी हिचे दर्शन घेऊन तिचे आशिर्वाद
मागितले. तुळजादेवीला सोन्याचे छत्र विधीपूर्वक अर्पण केले. त्यानंतर २१
मे रोजी शिवाजी रायगडला परतला.
राज्याभिषेकसोहळा
२९ मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला. अभिषेक होण्यापूर्वी
शिवाजीचा व्रतबंध होणे आवश्यक होते. म्हणून २९ मे रोजी शुक्रवारी
शिवाजीची मुंज करण्यात आली. प्रायश्चित विधी म्हणून तुलापुरुषदान करण्यात
आले. डच कागदपत्रांमध्ये या तुलादानाविषयी माहिती आढळते. शिवाजीचे
वजन १७,००० पगोडे म्हणजे सुमारे १६० पौंड भरले असा उल्लेख डचांनी
केलेला आहे. शिवाजीची प्रथम सुवर्णतुला करण्यात आली. त्यानंतर चांदीची
व तांब्याचीही तुला करण्यात आली. मौल्यवान धातूंच्या तुला संपल्यानंतर
विविधप्रकारची फळे, साखर इत्यादींचीही तुला करण्यात आली. अशाप्रकारे
७४ छत्रपती शिवाजी महाराज
हा तुलापुरुषदानविधी मोठ्या उत्साहाने पार पडला. या समारंभासाठी देशाच्या
वेगवेगळ्या भागातून सुमारे ११,००० लोक रायगडवर उपस्थित झाले होते.
अशी माहिती डच रेकॉर्डमध्ये मिळते.
३० मे शनिवार रोजी शिवाजीचे समंत्रक विवाह झाले. २९ला मुंज
झाल्यामुळे पूर्वीचे विवाह रद्दबातल झाले होते. त्यामुळे ३० तारखेस शिवाजीला
आपल्या स्त्रियांशी पुन्हा विवाह करावे लागले. हेन्री ऑक्झिंडेन हा इंग्रज
प्रतिनिधी या प्रसंगी रायगडावर हजर होता. त्याला या धार्मिक विधीचा नीटसा
अर्थ न कळल्यामुळे शिवाजीने राज्याभिषेकापूर्वी काही स्त्रियांशी विवाह केले
असे त्याने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेले आढळते. त्यामुळे अनेक
इतिहासकारांचाही गैरसमज झालेला होता. समंत्रक विवाहप्रसंगी पट्टराणी म्हणून
शिवाजीने सोयराबाई हिला स्थान दिले. या विधीमुळे अभिषेकासाठी लागणारे
सर्व हक्क शिवाजी व सोयराबाई यांना धर्मशास्त्रपद्धतीने प्राप्त झाले.
३१ मे रोजी रविवार होता. ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त यादिवशी होता. त्यासाठी
अग्निप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा करण्यात आली आणि अनुषंगिक
सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्वीज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
सोमवारी १ जून १६७४ रोजी ग्रहयज्ञ करण्यात आला. त्याचप्रमाणे नक्षत्रहोम
हा विधीही करण्यात आला. २ जून रोजी म्हणजे मंगळवारी कोणताही मुहूर्त
नसल्यामुळे कसलाही विधी यादिवशी झाला नाही. बुधवारी नक्षत्रयज्ञ करण्यात
आला. ४ जूनला म्हणजे गुरुवारी रात्री नित्रृतियाग यज्ञ झाला. त्याप्रसंगी मांस,
मत्स्य आणि मदिरा यांची आहुती देण्यात आली. त्यानंतर शिवाजी व सोयराबाई
स्नान करून पुण्याहवाचनासाठी बसले.
शुक्रवार ५ जून हा राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस
होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळापासून पहाटेपर्यंत
हा मंगलविधी मोठ्या थाटामाटात पार पडला. शिवाजीराजे सिंहासनावर बसले.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व आणि अलौकिक असा दिवस
उजाडला. शिवाजी राजे झाले आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारतखंड
धन्य झाला. या समारंभाचे वर्णन सभासदाने आपल्या बखरीत करून ठेवले
आहे. “...सर्वांस नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले.
अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके घेऊन सुवर्णकलशपात्री
अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळींस नमस्कार
करून सिंहासनावर बसले. या युगी सर्व पृथीवर म्लेंच्छ बादशाह मन्हाटा
शिवराज्याभिषेक ७५
पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.”
शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगी इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन हा
रायगडावर हजर होता. त्याने आपल्या रोजनिशीमध्ये राज्याभिषेक समारंभाचे
वर्णन लिहून ठेवले आहे. त्याचप्रमाणे रायगड किल्ला, गडाचा मार्ग याविषयी
त्याने नोंद करून ठेवली आहे. ६ जून रोजी झालेल्या समारंभाविषयी तो
लिहितो, 'या दिवशी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झाला. संभाजी राजे,
पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली एका ओट्यावर बसले
होते.' सिंहासनाचे वर्णन करताना तो लिहितो, 'सिंहासनाच्या दोन्ही बाजूंस
सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे
असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला २ मोठी मोठ्या दाताच्या मत्स्यांची
सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मुल्यवान
भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह
म्हणून तळपत होती.' या शुभचिन्हांचा अनेक प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयत्न
इतिहासकारांनी केलेला आढळतो. साधारणपणे असे मानले जाते की मत्स्यचिन्ह
हे समुद्रवर्चस्वाचे प्रतिक आहे. अश्वपुच्छ हे सर्वांगसज्ज अशा अश्वदलाचे प्रतिक
आहे आणि तराजू हे निःपक्षपाती न्यायव्यवस्थेचे प्रतिक आहे. या ३ प्रतिकांवरून
शिवाजीचे सामर्थ्य तर स्पष्ट होतेच पण त्याचबरोबर जनतेला न्याय देण्यासाठी
आपण सिंहासनरूढ आहोत याची जाणीवही शिवाजीने तराजूच्या चिन्हाद्वारे
करून दिली.
राज्यारोहणप्रसंगी शिवाजी महाराजांनी नव शक किंवा कालगणना सुरू
केली. या शकाला 'राज्याभिषेक शक' किंवा 'राजशक' असेही म्हणतात.
मध्ययुगातील शककर्ता राजा म्हणून शिवाजीचा गौरवाने उल्लेख केला जातो.
ही कालगणना शिवाजीचे सार्वभौमत्व सूचित करणारी आहे. शिवाजीराजे
सिंहासनावर बसले आणि नवे युग सुरू झाले. म्हणून या प्रसंगी महाराजांनी .
शिवराई होन हे सोन्याचे नाणे पाडले. तसेच शिवराई म्हणून तांब्याचे नाणेही
पाडले. या नाण्यावर 'श्री राजा शिवछत्रपति' अशी अक्षरे कोरलेली आढळतात.
राज्याभिषेक झाला त्या घटकेपासून शिवाजी महाराजांनी 'क्षत्रिय कुलावतंस श्री
राजा शिवछत्रपति' हे नवे बिरूद धारण केले.
शिवाजी महाराजांना केवळ नवे राज्य स्थापन करावयाचे नव्हते तर
रामचंद्रपंत अमात्य म्हणतात त्याप्रमाणे 'नूतन सृष्टी निर्माण करावयाची होती.'
शेकडो वर्षे राजभाषा फारसी किंवा उर्दू असल्यामुळे संस्कृत आणि मराठी
७६ छत्रपती शिवाजी महाराज
भाषेला अवकळा प्राप्त झालेली होती. राजकीय पत्रव्यवहारातून तर मराठी शब्द
जवळजवळ हद्दपार झालेले होते. व्यवहारातही मोठ्या प्रमाणात उर्दूमिश्रित मराठी
भाषा प्रचारामध्ये आलेली होती. अशाप्रकारे मराठी भाषा, संस्कृती यांना
अवकळा प्राप्त झालेली होती. संस्कृत भाषा समजेनाशी झाली होती. आपल्या
राज्यातील हे मरगळलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी
महाराजांनी विविध प्रकारच्या योजना कार्यवाहित आणण्याचा निश्चय केला.
परकीय संस्कृतीचे सावट दूर करण्यासाठी आणि फारसी भाषेचा प्रभाव कमी
करण्यासाठी रघुनाथ पंडीत या विद्वानास ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्याची
आज्ञा शिवाजीने दिली. परंपरागत पंचांगपद्धतीमध्ये कालपरत्वे अनेक दोष
शिरलेले होते. ते दूर करण्यासाठी ‘करणकौत्सुभ’ नावाचा ग्रंथ लिहिण्याची
आज्ञा शिवाजीने कृष्ण ज्योतिषी यांना केली. या प्रसंगी शिवाजीने मुलकी,
लष्करी त्याचप्रमाणे धर्मविषयक आणि न्यायविषयक नवे कायदे केले. त्यांना
‘प्रशस्ती’ असे म्हणत. राजकीय पत्रव्यवहार कसा करावा या पद्धतीला
‘लेखनप्रशस्ती’ असे म्हणत. शिवाजीने बाळाजी आवजी चिटणीस यांना नवी
लेखनप्रशस्ती तयार करण्यास सांगितली आणि राजकीय पत्रव्यवहारामध्ये मराठी
शब्दांचे प्रमाण अधिकाधिक वाढावे म्हणून या प्रशस्तीमध्ये अनेक प्रकारचे
मराठी तर्जुमे करण्यास सांगितले. बाळाजी आवजी चिटणीस यांची लेखनप्रशस्ती
अद्यापही उपलब्ध नाही. परंतु त्यांनी तयार केलेले फुटकळ तर्जुमे पहावयास
मिळतात. त्यावरून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न शिवाजीने
कसा केला याची माहिती मिळते.
राज्याभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी आपल्या प्रधानमंडळाची रचना
केली. मंत्र्यांची फारसी नावे रद्द करून संस्कृत नावे प्रचारात आणली. ८
मंत्र्यांच्या आपल्या मंडळाला अष्टप्रधानमंडळ असे नामाभिधान करण्यात आले.
हा भव्य राज्याभिषेक समारंभ पहाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक
साधुपुरुष, संन्यासी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम असे विविध प्रकारचे
उपासक जमलेले होते. त्यांना यथोचित दान देण्यात आले.
नवे युग सुरू झाले
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर
भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १७व्या शतकामध्ये
जवळजवळ संपूर्ण भारतात एकही देशी सार्वभौम सत्ता अस्तित्वात नव्हती.
दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटींना समर्थपणे
शिवराज्याभिषेक ७७
झुंज देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीत
शून्यातून स्वराज्य निर्माण करून केवळ शाही राजवटींनाच नव्हे तर दिल्लीतील
प्रबळ मुघल सत्तेलाही आव्हान केले. पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले
यांनाही नामोहरम केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून एक समर्थ सार्वभौम
मराठा राज्य उदयास आणले याची ग्वाही दिली. या घटनेमुळे शेकडो वर्षे
गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाल्या.
महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता बहरले,
कालांतराने मोठे झाले, त्याचा वृक्ष होऊन त्या वृक्षाच्या अनेकविध फांद्या
भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरल्या आणि मराठी राज्याचे रूपांतर मराठा
साम्राज्यात झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास मध्ययुगीन भारताच्या
इतिहासात शिवराज्याभिषेकाची घटना सुवर्णाक्षरांनी नमूद करण्यासारखी आहे.
एका वाक्यात सांगावयाचे झाले तर 'शिवराज्याभिषेकामुळे नवे युग अवतरले.'
दुसरा राज्याभिषेक
राज्याभिषेकाचा मोठा सोहळा पार पडल्यानंतर काही तंत्रमार्गी ब्राह्मणांच्या
आणि साधूंच्या आग्रहामुळे शिवाजीला दुसरा राज्याभिषेक करून घ्यावा लागला.
या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती इतर कोणत्याही साधनात उपलब्ध नाही.
ज्येष्ठ महिन्यात झालेल्या मोठ्या अभिषेकानंतर शिवाजीने दुसरा राज्याभिषेक
पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने आश्विन शुद्ध पंचमी २४ सप्टेंबर १६७४
रोजी करून घेतला अशी माहिती 'शिवराज्याभिषेक कल्पतरू' नावाच्या
समकालीन संस्कृत ग्रंथामध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ
लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपूरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा
संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'गागाभटाने
केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरित परिणाम
महाराजांना भोगावे लागत आहेत. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजराचा मृत्यू,
प्रतापगडावर वीज पडणे, शिवाजीची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू तसेच
राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे
राजमाता जिजाबाई हिचा झालेला मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून
असे अनुमान निघते की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज
गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार
करणारे पुरोहित वैदिक विधीपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि
म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांना पौराणिक किंवा तांत्रिक
७८ छत्रपती शिवाजी महाराज
अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.
गागाभट्टाच्या अभिषेकाने काही तांत्रिक चुका दर्शविल्या. त्यामुळे दुर्दैवी घटना
घडत आहेत असा निष्कर्ष या पुरोहितांनी काढला असावा. धार्मिक विधीविषयी
अशा प्रकारचे मतभेद नसावेत म्हणून शिवाजी महाराजांनी दुसऱ्या राज्याभिषेकाला
मान्यता दिली असली पाहिजे. त्याप्रमाणे २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी
महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. परंतु या राज्याभिषेकाचा
समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्य वखारवाल्यांनी
किंवा फारसी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाचा ओझरताही उल्लेख
केलेला आढळत नाही. विशेष म्हणजे विश्वसनीय अशा सभासद बखरीमध्ये
किंवा ९१ कलमी बखरीतही या दुसऱ्या राज्याभिषेकाचे वर्णन नाही. शिवचरित्रातील
अनेक घटना अचूक पद्धतीने जेथे शकावलीमध्ये नोंदविलेल्या आढळतात.
त्यातही या दुसऱ्या राज्याभिषेकाची तिथी दिलेली नाही किंवा ओझरता उल्लेखही
नाही. थोडक्यात हा दुसरा राज्याभिषेक तंत्रमार्गी पुरोहितांच्या समाधानासाठी
शिवाजी महाराजांनी करवून घेतला ही गोष्ट स्पष्ट होते. आपल्या मुलाने -
शिवाजीने शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून
आपले राज्य हे सार्वभौम राज्य आहे हे सिद्ध केले या गोष्टीचा सर्वात मोठा
आनंद राजमाता जिजाबाईला होणे साहजिक आहे. या सुमारास जिजामातेचे
वय ७०च्या घरात होते. आपल्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा पाहिल्यानंतर
या माऊलीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल यात शंका नाही.
राज्याभिषेकानंतर केवळ १२च दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी
जिजाबाईचा पाचाड येथे रहात्या घरी मृत्यू झाला. या शोककारक घटनेमुळे
रायगडवरील उत्साहाचे वातावरण संपुष्टात झाले. संभाजी राजांची मुंज पुढे
ढकलण्यात आली.
राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर शिवाजी महाराजांना मातृवियोगामुळे दुःख
झाले. पण थोर पुरुषाला आपले मन घट्ट करून कठीण प्रसंगांना सामोरे जावे
लागते. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि आपण
स्वतंत्र, सार्वभौम राजे आहोत असे जाहिर केले ही गोष्ट महाराजांच्या शत्रूंना
सहन होण्यासारखी नव्हती. मुघल, आदिलशहा आणि इतर शत्रूंनी महाराजांविरोधी
कारवाया सुरू केल्या. अर्थात या गोष्टींची शिवाजी महाराजांना कल्पना होतीच.
म्हणून १६७४च्या भर पावसाळ्यात त्यांनी आपल्या शत्रूविरुद्ध मोहिमा
आखण्यास प्रारंभ केला.
☐☐☐
शिवराज्याभिषेक ७९
११. कर्नाटक स्वारी
शिवाजीने ६ जून १६७४ रोजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला.
आणि आपण स्वतंत्र सार्वभौम राजे आहोत असे त्यांनी निःसंदिग्धपणे जाहिर
केले. महाराजांच्या या कृतीचा मुघलांना राग येणे स्वाभाविक होते. औरंगजेब
तर अतिशय प्रक्षुब्ध झाला. दक्षिणेत असलेल्या आपल्या सरदाराला - बहादूरखानला-
शिवाजीविरुद्ध आक्रमक धोरण अंगिकारण्याचा त्याने इशारा दिला. बहादूरखान
पेडगाव येथे छावणी करून राहिलेला होता. तो स्वतः ऐषारामी वृत्तीचा
असल्यामुळे शिवाजीविरुद्ध मोहिम काढण्यामध्ये दिरंगाई करीत होता. औरंगजेबाकडून
निर्वाणीचा इशारा मिळाल्यानंतर बहादूरखानाने आक्रमणाची जय्यत तयारी सुरू
केली. परंतु ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी
अश्वदलाचे एक पथक पाठवून बहादूरखानाची छावणी लुटली. त्या लुटीमध्ये
सुमारे १ कोटीचा खजिना मराठ्यांच्या हाती आला. या लुटीच्या प्रकारामुळे
बहादूरखान चांगलाच हबकला. दरम्यान मराठ्यांनी खानदेशपर्यंत स्वारी करून
धरणगाव लुटले आणि मराठ्यांचे हे पथक थेट बऱ्हाणपूरपर्यंत गेले. अशा
प्रकारची दहशत मुघली प्रदेशात निर्माण होत असताना शिवाजी महाराजांनी
सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. दुसऱ्या बाजूने शिवाजीच्या
आदेशानुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी रामनगरपर्यंत मजल मारली आणि
वसईच्या पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. थोडक्यात राज्याभिषेकाचा
सोहळा संपतो न संपतो तोच मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशात चांगलीच दहशत
निर्माण केली.
फोंड्याची लढाई
औरंगजेबाच्या चिथावणीमुळे आदिलशाही दरबारातील सरदारही शिवाजीविरुद्ध
लहानमोठ्या कारवाया करीतच होते. फोंड्याच्या सुभेदाराने शिवाजीच्या राज्यातील
एका व्यापाऱ्याला पकडले आणि विनाकारण मराठ्यांना डिवचले. शिवाजीने
आपला विश्वासू सरदार दत्ताजी पंडित याला दोन हजार अश्वदळ देऊन
८०
फोंड्याकडे पाठविले. दत्ताजी पंडित फोंड्यापर्यंत जाऊन पोहोचतो न पोहोचतो
तोच खुद्द शिवाजी महाराज वायुगतीने निवडक सैन्यदल घेऊन फोंड्यापर्यंत
आले आणि त्यांनी फोंड्याला वेढा घातला. हा वेढा चालू असताना शिवाजी
महाराजांनी एक पथक कर्नाटक प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले.
त्यामुळे दोन आघाड्यांवर तोंड देण्याची पाळी आदिलशहावर आली. फोंड्याचा
किल्ला दुर्गम असल्यामुळे आणि किल्ल्याचा खंदक पार करण्यास अवघड
असल्यामुळे फोंड्याचा वेढा प्रदीर्घ काळ चालू ठेवावा लागला. खंदक भरून
काढण्यात आला. किल्ल्याच्या तटावर चढण्यासाठी ५०० शिड्या तयार
करण्यात आल्या. अशी तयारी पूर्ण झाल्यानंतर १७ एप्रिल १६७५ रोजी
किल्ल्याच्या तटबंदीला सुरुंग लावून शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकला. हा
महत्त्वाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर कुठलीही विश्रांती न घेता शिवाजी
महाराजांनी कर्नाटकात घोडदौड सुरू केली व केवळ १५ दिवसात अंकोला,
शिवेश्वर इत्यादी किल्ले जिंकून घेतले.
बहलोल विरुद्ध बहादूर
औरंगजेबाने शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी बहादूरखानला दक्षिणेत
पाठविले तसेच शिवाजीला धडा शिकविण्याची प्रतिज्ञा करून विजापूरी सरदार
बहलोलखान याने कोल्हापूर भागात मराठ्यांची नाकेबंदी सुरू केली. बहादूरखानाने
बहलोलखानाची मदत घेऊन शिवाजीविरुद्ध आक्रमण करावे अशी औरंगजेबाची
इच्छा होती. दरम्यान जानेवारी १६७५ मध्ये विजापूर दरबारात एक रक्तरंजित
क्रांती घडली. बहलोलखानाने खवासखानाला ठार मारून विजापूर दरबारची
राजकीय सूत्रे आपल्या हाती घेतली. बहादूरखानाने पूर्वी शिवाजीविरुद्ध हालचाली
करण्यासाठी औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे खवासखानाशी सख्य जोडले होते
त्यामुळे या दोघात मैत्रीची भावना निर्माण झाली होती. परंतु बहलोलखानाने
खवासखानाला ठार मारल्याबरोबर बहादूरखानाला त्याच्याविषयी चीड निर्माण
झाली. दोघांमधील वैमनस्य वाढत चालले. याचा परिणाम असा झाला की
बहलोलखानाने बहादूरखानाविरुद्ध शिवाजीकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांच्या
दृष्टीने मुघलसत्ता ही पहिल्या क्रमांकाची शत्रू असून आदिलशाही आणि
कुतूबशाही या शाही राजवटी दक्षिणेतील असल्यामुळे त्यांच्याशी सख्य जोडणे
अधिक सोयीचे होते. म्हणून बहलोलखानाचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला.
मराठ्यांची मदत घेऊन जून १६७६ मध्ये बहलोलखानाने बहादूरखानाचा पराभव
केला. या विजयानंतर लगेच जुलै १६७६ मध्ये बहलोलखानाने शिवाजीशी
कर्नाटक स्वारी ८१
तह केला. या तहाप्रमाणे शिवाजी महाराजांचे राज्य आणि आदिलशाही राज्य
यांची सीमा कृष्णा नदीपर्यंत निश्चित केली. कृष्णा नदीच्या उत्तरेकडील मुलूख
शिवाजीस मिळाला. अशाप्रकारे शिवाजी आणि आदिलशाही यांच्यामध्ये सख्य
निर्माण झाले. आता कुतूबशहाशी सख्य जोडून संपूर्ण दक्षिण देश मुघली
वर्चस्वातून मुक्त करण्याचा शिवाजी महाराजांनी निर्धार केला.
कर्नाटक स्वारीची तयारी
आपल्या स्वराज्याचा विस्तार कर्नाटकापर्यंत करावा अशी महत्त्वाकांक्षा
शिवाजी महाराज बाळगून होते. पूर्वी समुद्रमार्गे त्यांनी बसनूरपर्यंत स्वारी केली
होती. त्यांच्या उत्तेजनामुळे मराठ्यांनी कारवारपर्यंत धडक मारली होती.
महाराजांचे पिताजी शहाजी राजे यांची बंगलोर ही जहागिरी होती. त्यांच्या
पश्चात महाराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हा बंगलोरच्या जहागिरीचा मालक
होता. त्याने तंजावरपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून आपले मुख्य ठाणे
तंजावर हेच केले. व्यंकोजी राजे विजापूरच्या आदिलशहाशी एकनिष्ठ असल्याचे
भासवत होते. शिवाजी महाराजांना आपल्या सावत्र भावाचा पराक्रम माहित
होता. त्याला स्वराज्यकार्यात सामील करून घेतले तर संपूर्ण दक्षिण भागात
स्वराज्याचा विस्तार होईल आणि मुघल किंवा आदिलशहा नामोहरम होतील
अशी महाराजांची अपेक्षा होती.
मुघल हे पहिल्या क्रमांकाचे शत्रू आहेत याची खूणगाठ महाराजांनी मनाशी
बांधली होती. म्हणून बहादूरखानाविरुद्ध विजापूरचा सरदार बहलोलखान याला
महाराजांनी मदत केली होती. बहलोलखानाने वरकरणी मराठ्यांशी सलोखा
जरी जोडलेला होता, तरी विजापूरच्या दरबारात पठाणांचे वर्चस्व वाढविण्यास
त्याने सुरुवात केली. अनेक पठाण सरदार बहलोलखानाच्या प्रेरणेने आदिलशाहीत
दाखल झाले. त्यामुळे विजापूरदरबारात पठाणांचे वर्चस्व वाढू लागले. आदिलशहा
काय किंवा कुतुबशहा काय यांच्या राजवटी पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून
दक्षिण भारतामध्ये होत्या आणि या राजवटीत दख्खनी लोकांचाच वर्षानुवर्षे
प्रभाव होता. परंतु जानेवारी १६७५ मध्ये जी रक्तरंजित क्रांती विजापूर
दरबारामध्ये झाली, तेव्हापासून पठाणांचा भरणा आदिलशाहीच्या प्रशासनामध्ये
मोठ्या प्रमाणात होऊ लागला. विजापूर दरबारातील पठाणांचे वाढते वर्चस्व
शिवाजी महाराजांना धोक्याचे वाटत होते. कुतुबशहाच्या दरबारात पठाणांचे
वर्चस्व नव्हते. कुतुबशहाच्या वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशात दख्खनी मुसलमान
आणि हिंदू अधिकारी यांचे वर्चस्व होते. प्रत्यक्ष कुतुबशहाच्या दरबारात हिंदूंनाही
८२ छत्रपती शिवाजी महाराज
मानाच्या जागा दिल्या जात होत्या. मादण्णा आणि अकण्णा नावाचे दोन हिंदू
मुत्सद्दी कुतुबशहाचे दोन प्रमुख सल्लागार होते. दक्षिणेचे राजकारण करताना
शिवाजी महाराजांनी कुतुबशहाशी मित्रत्वाचे संबंध राखले होते. विजापूर
दरबाराची सूत्रे हाती आल्यावर बहलोलखानाने आक्रमक धोरण स्वीकारले.
कुतुबशहाच्या प्रदेशात धुडगूस घालण्यासाठी पठाणांची तुकडी पाठविली.
चंदीचंदावरकडे कुतुबशाही प्रदेशात पठाणांनी बंडखोरी सुरू केली होती तेव्हा
दक्षिणेत आदिलशाहीबरोबर कुतुबशाहीलाही पठाणांच्या घुसखोरीचा धोका
निर्माण झाला होता. अर्थात हा धोका शिवाजी महाराजांच्या स्वराज्यालाही निर्माण
झाला होता. हा धोका नाहीसा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एका नव्या
राजकीय सूत्राची मांडणी केली. ते सूत्र म्हणजे दक्षिण देश दक्षिण्यांच्याच
स्वामित्वाखाली असला पाहिजे. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे सूत्र त्यांनी आपल्या
भावी राजकारणासाठी निश्चित केले. 'दक्षिण पातशाही तो राखली पाहिजे' हे
शिवाजीच्या मुघलविषयक धोरणाचे आता मुख्य सूत्र झाले होते. मार्च १६७७
मध्ये शिवाजी महाराजांनी मालोजी घोरपड्यास जे पत्र लिहिले त्या पत्रात या
सूत्राचे स्पष्टीकरण महाराजांनी केलेले आहे. 'दक्षणचे पादशाहीस पठाण जाला,
ही गोष्ट बरी नव्हे! ...आपली पातशाही जितकी वाढवू ये तितकी वाढवणे,
पठाणांची नेस्तनाबूद करणे; दक्षणची पादशाही आम्हा दक्षिण्यांच्या हाती राहे
ते करावे.' शिवाजी महाराजांचे नेमके धोरण या पत्रावरून स्पष्ट होते आणि
या धोरणाला अनुसरून मार्च १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी गोवळकोंड्यास
जाऊन कुतुबशहाची भेट घेतली. प्रत्यक्ष भेटीमध्ये दक्षिण भागात पठाणांचा
धोका कसा निर्माण झाला आहे याची जाणीव महाराजांनी कुतुबशहास आणि
मादण्णा प्रधानास करून दिली. त्यानंतर कर्नाटक मोहिमेची कडेकोट तयारी
करण्याचे त्यांनी ठरविले. तंजावरचा राजा व्यंकोजी भोसले हा आपला सावत्र
भाऊ असून शक्य झाल्यास त्यालाही स्वराज्यकार्यात ओढून घ्यावयाचे; शक्य
न झाल्यास आपल्या पित्याच्या कर्नाटकातील जहागिरीचा वाटा त्याच्याकडे
मागावयाचा म्हणजे काहीतरी युक्तीप्रयुक्ती होऊन व्यंकोजीला आपल्याकडे
वळवायचे असाही एक हेतू शिवाजी महाराजांनी मनात बाळगला होता.
कर्नाटकसारख्या दूरवरच्या प्रदेशात मोहीम काढावयाची असल्यामुळे समर्थ
शत्रूंना काहीकाळ तरी स्वस्थ बसवावे म्हणजे त्यांच्याकडून आक्रमण होणार
नाही असा दूरगामी विचार शिवाजी महाराजांनी केला. विशेषतः मुघलांचा धोका
उद्भवण्याची अधिक शक्यता होती. म्हणून डिसेंबर १६७६ मध्ये शिवाजी
महाराजांनी मुघल सरदार बहादूरखान याचेबरोबर सलोख्याचा तह केला. कर्नाटक
कर्नाटक स्वारी ८३
मोहीम प्रदिर्घ काळ चालणार असल्यामुळे स्वराज्याची कडेकोट व्यवस्था
महाराजांनी लावली. मोरोपंत पेशवे, अण्णाजी दत्तो, दत्ताजी त्रिंबक आणि
युवराज संभाजी यांच्यावर स्वराज्यामध्ये सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी
सोपविली. अशी सर्व तयारी झाल्यानंतर बिनीचे सरदार, खास अश्वदल, प्रभावी
पायदळ बरोबर घेऊन इ. स. १६७७च्या प्रारंभी महाराजांनी कर्नाटक मोहीम
हाती घेतली. प्रथम भागानगरला जाऊन कुतूबशहाची भेट घेतली आणि आपल्या
मोहिमेस त्याचा पाठिंबा मिळविला. कुतूबशहाचा सेनापती मिर्झा महंमद हाही
ससैन्य महाराजांच्या मोहिमेत सामील झाला. कर्नाटककडे जाताना श्रीशैल
याठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे महाराजांनी दर्शन
घेतले. त्यानंतर अनंतपूर, मंदियाळ, कडप्पा, तिरूपती या मार्गाने मे १६७७च्या
पहिल्या आठवड्यात शिवाजी महाराज मद्रासजवळ पोहोचले. तेथून त्यांनी
जिंजीचा किल्ला जिंकण्यासाठी सैन्याचे एक पथक पाठविले. वास्तविक पाहता
जिंजीचा किल्ला अतिशय अभेद्य असून सहजासहजी जिंकण्यासारखा नाही.
परंतु जिंजीचा किल्लेदार नसीर महंमदखान याने ५०,००० रुपयांच्या
जहागिरीच्या मोबदल्यात १३ मे १६७७ रोजी जिंजीचा किल्ला मराठ्यांना
देऊन टाकला. जिंजी जिंकल्यानंतर वेलोरचा किल्ला शिवाजीने जिंकण्याचे
ठरविले. हा किल्लाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होता. किल्ल्याच्या खंदकात खोलवर
पाणी असून त्या पाण्यात सुसरी आणि इतर जलचर प्राणी फिरत होते.
सभासदाने म्हटले आहे की, ‘या तोडीचा गड पृथ्वीवर दुसरा नाही.’ अशा
या अवघड किल्ल्याला मराठ्यांनी चिवटपणे वेढा घातला. परंतु किल्ला लवकर
हाती येण्याची शक्यता वाटेना. तेव्हा या वेढ्याची जबाबदारी महाराजांनी
रघुनाथराव व आनंदराव यांच्यावर सोपविली आणि स्वतः शेरखान लोदी या
सरदाराच्या पाठलागावर निघाले. २६ जून १६७७ रोजी शेरखानाचा सर्व
सरंजाम मराठ्यांच्या हाती लागला. स्वतः शेरखान शिवाजी महाराजांना शरण
गेला. त्यानंतर महाराजांनी मदुरेपर्यंत जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
व्यंकोजीचा प्रश्न
व्यंकोजीला आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी करून घेण्याची शिवाजी
महाराजांची इच्छा होती. परंतु महाराज कर्नाटक मोहिमेवर निघाल्यापासून
व्यंकोजीला त्यांच्या हेतूविषयी शंका वाटत होती. मोहिमेत ज्यावेळी तंजावरपासून
नऊ मैल अंतरावर कावेरीच्या काठी महाराजांचा मुक्काम होता, तेव्हा त्यांनी
व्यंकोजीला मुद्दाम भेटीसाठी बोलावले. महाराजांच्या मुक्कामापासून तंजावर
८४ छत्रपती शिवाजी महाराज
केवळ ८-९ मैल दूर होते. तेव्हा आपल्या राजधानीपासून सुरक्षित अंतर
असलेल्या महाराजांच्या तळापर्यंत जाणे व्यंकोजीला अवघड नव्हते. व्यंकोजीने
शिवाजी महाराजांची भेट घेतली. महाराजांनी त्याच्याशी दिलखुलासपणे बातचीत
केली. शहाजीच्या कर्नाटक जहागिरीतील वाटाही मागितला. त्यापूर्वीही वकीलामार्फत
व्यंकोजीशी महाराजांचे बोलणे झाले होते. ही सर्व बोलणी सामोपचारपद्धतीने
झाली होती. पाँडेचरी येथील फ्रेंच अधिकारी मार्टिन याने आपल्या डायरीमध्ये
शिवाजी आणि व्यंकोजी यांच्या भेटीचा तपशील लिहून ठेवला आहे. बोलणी
चालू असताना अचानकपणे महाराजांना न सांगताच व्यंकोजी पळून गेला.
याचे दुःख महाराजांना किती झाले याची कल्पना सभासदाच्या लिखाणावरून
येण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांचे उद्गार सभासदाने नमूद करून ठेवले
आहे. 'व्यंकोजीला पकडण्याचा किंवा त्याची बिरूदे हिसकावून घेण्याचा आपला
कोणताही हेतू नव्हता असे असताना न सांगता व्यंकोजी राजे का पळाले?'
अशी खंत महाराजांनी व्यक्त केलेली आढळते. व्यंकोजीच्या पलायनाविषयी
शिवाजी महाराजांनी जे मत व्यक्त केले ते सभासदाने लिहून ठेवले आहे.
'उगी उठून पळून गेले. अति धाकटे ते धाकटे, बुद्धीही धाकटेपणास योग्य
केली.'
व्यंकोजी पळून गेल्याचे दुःख शिवाजी महाराजांना अतोनात झाले. परंतु
स्वतः व्यंकोजीने मात्र मराठ्यांविरुद्ध लढा देण्याची तयारी केली. कावेरीच्या
परिसरात संताजी भोसले याचे लष्कर होते. त्याच्यावर १५ नोव्हेंबर १६७७
रोजी व्यंकोजीने हल्ला केला आणि त्याला पळवून लावले. संताजी त्यावेळी
बेसावध होता. यशस्वी माघार घेतल्यानंतर त्याने पुन्हा तयारी केली आणि
वलीगंडपूर येथे झालेल्या लढाईत व्यंकोजीचा पराभव केला. अशाप्रकारे
व्यंकोजीचा पराभव झालेला असला तरी शिवाजीला त्याचेबद्दल माया वाटत
होती आणि म्हणून एक सविस्तर पत्र लिहून शिवाजीने व्यंकोजीला लिहिले,
'दुर्योधनासारखी बुद्धी करून, तुम्ही युद्ध केले...... झाले ते झाले आता हट्ट
न करणे' दरम्यान मराठ्यांनी व्यंकोजीची अनेक ठाणी जिंकून घेतली. शेवटी
व्यंकोजीने रघुनाथपंत हणमंते यांचेमार्फत शिवाजीबरोबर तह केला.
ऐन पावसाळ्यातही शिवाजीची कर्नाटक मोहिम चालू होती. जुलै
१६७७च्या सुमारास शिवाजीने तिरूमलवाडीतून वृद्धाचलम् या मार्गाने पोर्टोनोव्हा
या ठिकाणी शिवाजी महाराज आले. ते स्थळ काबीज करून दक्षिण अर्काटवर
महाराजांनी प्रभुत्व संपादन केले. पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर १६७७
मध्ये आरणी, होसकोट, शीरे, बाळापूर इत्यादी पश्चिम-दक्षिण जोडणारी स्थळे
कर्नाटक स्वारी ८५
ताब्यात घेऊन नोव्हेंबर १६७७ मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहिमेची
सांगता केली.
जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था
शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे एक खास वैशिष्ट्य दिसून येते. जो
प्रदेश जिंकला आहे किंवा जे किल्ले जिंकले आहे त्यांची उत्तम व्यवस्था लावून
दिल्याशिवाय शिवाजी महाराज पुढे जात नसत. कर्नाटक मोहिमेवर असताना
जो प्रदेश आपल्या ताब्यात आला त्याची चोख व्यवस्था लावण्याचे कार्य
शिवाजीने प्रथम केले. संताजी भोसले याला कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशावर
सुभेदार म्हणून नेमले आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी रघुनाथपंत हणमंते
यांची निवड केली जिंकलेल्या किल्ल्यांची शिवाजीने कशी व्यवस्था लावली
याची माहिती मद्रासमधील समकालीन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी दिलेली आढळते.
जिंजी किल्ला जिंकताना काही बुरूज कोसळले होते, तटांना खिंडारे पडली
होती, परंतु महाराजांनी कारागीर लावून किल्ल्याची उत्तम डागडूजी केली.
एवढेच नव्हे तर पहिल्यापेक्षा किल्ला अधिक भक्कम केला. मिशनऱ्यांनी असेही
लिहून ठेवले आहे की, 'अनेक, नवे भुईकोट व डोंगरी किल्ले शिवाजी
महाराजांनी बांधले.' 'केवळ किल्ल्यांची डागडुजी आणि प्रशासन व्यवस्था
एवढ्या कार्यावरच महाराज संतुष्ट राहत नाहीत. रयतेचा किंवा सर्वसामान्य
जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना, सैनिकांना ते
सूचना देत असत, निष्पाप लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घेण्यास
सांगत.
जानेवारी १६७८ मध्ये म्हैसूरमार्गे महाराष्ट्राकडे परत येताना बेळगाव
जिल्ह्यात महाराजांनी प्रवेश केला. तेथून संपगावमार्गे पुढे जात असताना
बेलवाडी येथील सावित्रीबाई देसाई हिने शिवाजीविरुद्ध युद्ध पुकारले. ही देसाई
स्त्री एवढी पराक्रमी होती की बेलवाडीचा छोटासा किल्ला तिने २७ दिवस
लढविला. शेवटी शिवाजीपुढे तिला माघार घ्यावी लागली. शिवाजीने या देसाई
स्त्रीचे मोठे कौतुक केले. या प्रसंगाचे शिल्पांकन बेलवाडीच्या परिसरात अनेक
ठिकाणी झालेले आढळते. एप्रिल १६७८ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळगडांवर
आले आणि तेथून मे महिन्यात रायगडावर गेले. अशाप्रकारे शिवाजी महाराजांची
कर्नाटक मोहीम जवळजवळ दीड वर्षे सुरू होती असे म्हणावे लागते. ही
मोहीम यशस्वी झाल्याने शिवाजीचा दरारा दक्षिणेत सर्वदूर निर्माण झाला.
पाश्चात्य वखारवाले अधिक सावध झाले. एका समकालीन इंग्रजीपत्रात तर
८६ छत्रपती शिवाजी महाराज
असा उल्लेख आहे की, 'अल्पकाळातच सुरतेपासून कन्याकुमारीपर्यंतच्या
प्रदेशाचा शिवाजी स्वामी होईल यात शंका वाटत नाही.' कर्नाटक मोहिमेबाबत
आणखी एका इंग्रजी पत्रातील उल्लेख पहा, 'स्पेनमध्ये सिझर ज्याप्रमाणे आला,
त्याने पाहिले आणि जिंकले त्याप्रमाणे कर्नाटकात शिवाजी आला, त्याने पाहिले
आणि जिंकले' थोडक्यात राज्याभिषेकानंतर दक्षिण हिंदुस्थानात मोठा विस्तार
करून शिवाजीने आपल्या स्वराज्याची इमारत पक्की केली.
संभाजी मुघलांना मिळाला
कर्नाटक स्वारीवर निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी संभाजीला संगमेश्वरास
पाठविले होते. महाराज स्वारीहून परत येईपर्यंत तो संगमेश्वरलाच राहिला होता.
शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले होते
असे समकालीन मराठी व फारसी साधनांवरून दिसून येते. शिवाजी महाराज
कर्नाटक मोहिमेवर निघण्यापूर्वीच दोघांमध्ये वितुष्ट आले असावे असे वाटते.
संभाजी संगमेश्वरला स्वतःच्या इच्छेनुसार गेला होता असे दिसते. युवराज
संभाजीवर शिवाजी महाराजांचा विश्वासही होता कारण कर्नाटक स्वारीवर
निघण्यापूर्वी इंग्रज वखारवाल्यांशी बोलणी करण्याची जबाबदारी महाराजांनी
संभाजीवर सोपविली होती. साधारणपणे असे दिसून येते की, कर्नाटक मोहिम
आटोपून शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले आणि तेव्हापासून त्यांचे
मन संभाजीविषयी कलुषीत झाले. रायगडावर असताना प्रधानांचे आणि
संभाजीचे काही कारणामुळे बिनसले होते. कदाचित कर्नाटक मोहिमेहून परत
आल्यावर प्रधानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी महाराजांजवळ संभाजीविषयी
कागाळ्या केल्या असाव्यात. अर्थात अशा कागळ्यांमुळे गैरसमज करून
घेण्याचा शिवाजी महाराजांचा स्वभाव नव्हता. स्वतः संभाजीच्याही काही तक्रारी
होत्या. परंतु या तक्रारींना विशेष महत्त्व शिवाजी महाराजांनी दिले नाही.
थोडक्यात शिवाजी आणि संभाजी यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते, हे
मात्र निश्चित, कर्नाटक मोहिमेहून परत आल्यावर महाराजांनी संभाजीला
सज्जनगडाकडे पाठविले तेथे समर्थ रामदासांच्या सहवासात संभाजीची चित्तवृत्ती
शांत होईल असा शिवाजी महाराजांचा कयास असावा. परंतु संभाजी जेव्हा
सज्जनगडाकडे गेला तेव्हा समर्थ रामदास तेथे नव्हतेच. अगोदरच उद्विग्न
झालेल्या संभाजीचे सज्जनगडावर मन रमेना. संभाजीच्या या मनःस्थितीचा
अंदाज मुघलसरदार दिलेरखान याला आला होता आणि म्हणून आपले हस्तक
संभाजीकडे पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न दिलेरखानने चालू केला.
कर्नाटक स्वारी ८७
शिवाजी महाराज आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा समज झाल्यामुळे
संभाजीने मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिम
आटोपून १६७८ च्या पावसाळ्यापूर्वी स्वराज्यात आले संभाजी १६७९च्या
प्रारंभी केव्हातरी मुघलांना जाऊन मिळाला.
संभाजी आपल्याकडे आल्यानंतर दिलेरखानाला विलक्षण आनंद झाला.
त्याने ताबडतोब मराठ्यांविरुद्ध मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. पण याच
वेळेला मुघल आणि आदिलशहा यांच्यातही संघर्ष चालू होता. तरीपण
आदिलशाहीविरुद्ध मोहीम चालू असताना मराठ्यांना डिवचण्यासाठी दिलेरखानाने
१७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड किल्ल्याला वेढा दिला. यावेळी भूपाळगडावर
फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता. याच किल्लेदाराने चाकणचा किल्ला
मोठ्या हिकमतीने लढवून शायिस्तेखानास जेरीस आणले होते. परंतु यावेळी
दिलेरखान संभाजीस बरोबर घेऊन आल्यामुळे त्याने किल्ला खानाच्या स्वाधीन
केला. ही बेइमानी केल्याबद्दल शिवाजी महाराजांनी फिरंगोजीला तोफेच्या तोंडी
दिले अशी हकिकत ९१ कलमी बखरीत आलेली आहे. भूपाळगड ताब्यात
आल्यानंतर दिलेरखानाने आदिलशाहीविरुद्ध चाललेली मोहिम अधिक तीव्र
केली. मंगळवेढा वगैरे प्रदेश जिंकून घेऊन ऑक्टोबर १६७९ पर्यंत दिलेरखानाने
थेट विजापूरपर्यंत धडक मारली. या सर्व मोहिमेत संभाजी दिलेरखानाबरोबर
होता अथणी शहर लुटण्यामध्ये दिलेरखानास संभाजीने मदत केली. या सर्व
वार्ता शिवाजी महाराजांस समजत होत्या. संभाजी आपणास सोडून गेला याचे
त्यांना विलक्षण दुःख झाले होते. परंतु संभाजीच्या मानी स्वभावास मुघलांची
चाकरी परवडणार नाही याची महाराजांना पूर्ण खात्री होती. काही दिवसांनी
दिलेरखानाचे उत्तान वागणे संभाजीला पटेनासे झाले. कोणत्यातरी दिलेरखान
आणि संभाजी यांच्यात झगडा झाला. याच काळात औरंगजेबाने संभाजीस
कैद करण्याचाही घाट घातला होता. मुघलांच्या या राजकारणात संभाजी पूर्णपणे
विटला. शिवाजी महाराजांनी काही माणसे संभाजीच्या मागावर ठेवलेली होती.
गुपचूपपणे संभाजीला ती भेटतही होती. त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत
होती. अशी माहिती भीमसेन सक्सेना या औरंगजेबाच्या दरबारी लेखकाने लिहून
ठेवलेली आहे. अथणीजवळ छावणी असताना एके दिवशी संभाजी महाराजांच्या
माणसांबरोबर गुपचूपपणे दिलेरखानास सोडून बाहेर पडला आणि पन्हाळ्यास
परत आला. त्याला भेटण्यासाठी शिवाजी राजे पुरंदरहून पन्हाळ्यास आले.
१३ जानेवारी १६८० रोजी पिता-पुत्रांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी
पूर्वीप्रमाणे पाश्चात्य वखारवाल्यांशी बोलणी करण्याचा संभाजीला अधिकार दिला.
८८ छत्रपती शिवाजी महाराज
मुघलांविरूद्ध आघाडी
कर्नाटकाची मोहीम हाती घेण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी 'दक्षिण देश
दक्षिणेतील सत्ताधिशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे' असे धोरण निश्चित केले
होते. 'दक्षिण्यांची दक्षिण' हे त्यांच्या नव्या राजकारणाचे सूत्र होते. त्या अनुषंगाने
मुघलांविरूद्ध कुतुबशहा आणि आदिलशहा यांना मदत करण्याचे धोरण
महाराजांनी स्विकारले होते. संभाजी राजे मध्यंतरी मुघलांना जाऊन मिळाल्यामुळे
विलक्षण पेच महाराजांपुढे निर्माण झाला होता. परंतु संभाजी मुघलांकडे फार
काळ राहू शकला नाही. तो परत येताच शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध
नवी आघाडी उभारली. आदिलशहाला मदत करण्यासाठी थेट विजापूरपर्यंत
जाऊन मुघली फौजांची दाणादाण उडवली. त्यानंतर मराठवाड्यात थेट
जालन्यापर्यंत जाऊन तेथील पेठ लुटली. आणि मुघलांमध्ये दहशत निर्माण
केली. याच काळात शिवाजीच्या आज्ञेप्रमाणे मोरोपंत पेशव्याने खानदेशात
शिरून धरणगाव, चोपडा ही शहरे लुटली. मलकापूर पर्यंतचा प्रदेश काबीज
करून बागलाणामध्ये मुघलांचा पुरता बिमोड केला. अहिवंतसारखे किल्ले जिंकून
घेतले आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशावर हुकूमत निर्माण केली. या
नव्या मोहिमेमुळे दिलेरखान मोठ्या पेचात सापडला होता. कारण मराठ्यांनी
त्याची रसद तोडून पूर्ण नाकेबंदी केलेली होती. औरंगजेबाच्या आदेशानुसार
रणमस्तखान हा सरदार मोठी फौज घेऊन दिलेरखानाच्या मदतीसाठी निघाला
होता. परंतु वाटेतच मराठ्यांनी रणमस्तखानास गाठले आणि त्याच्या फौजेवर
असाकाही चौफेर हल्ला केली की त्यामुळे त्याला औरंगाबादकडे पळून जावे
लागले अशाप्रकारे मुघलांच्या पदरात नामुष्की आली. शेवटी मुघलांनी
आदिलशाहीविरुद्ध मोहिम थांबविली आणि फेब्रुवारी १६८० मध्ये विजापूरचा
वेढा उठविला. मुघलांसारख्या जबरदस्त शत्रूचा बंदोबस्त केल्यानंतर शिवाजी
महाराज रायगडकडे परतले. काही घरगुती मंगलकार्ये त्यांना उरकायची होती
म्हणून राजधानी रायगडवरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आदिलशहा
आणि कुतुबशहा यांच्याशी तर महाराजांचे सख्य झाले होते. १६८० च्या
प्रारंभी क्रमांक एकचा शत्रू मुघल नामोहरम झाला होता आणि १६८० च्या
प्रारंभापर्यंत पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले यांनाही शिवाजी
महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले होते.
□□□
कर्नाटक स्वारी ८९
५. आगरा पलायन, तानाजी सिंहगढ़ विजय व राज्याभिषेक
१२. सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज
१७ व्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये केंद्रस्थानी असलेली मुघल सत्ता
अत्यंत प्रभावशाली होती. विशेषतः संपूर्ण उत्तर भारतामध्ये मुघलांचे वर्चस्व
प्रस्थापित झालेले होते. राजस्थान किंवा बुंदेलखंड येथील राजपूत राजांनी
मुघलांचे मांडलीकत्व पत्करले होते. एवढेच नव्हे तर अनेक शूर राजपूत सरदार
मुघलांच्या राज्यविस्तारासाठी मोठ्या निष्ठेने पराक्रम गाजवत होते. दक्षिण
भारतामध्ये बहमनी राज्याच्या विभाजनानंतर जी पातशाही राज्ये निर्माण झाली
होती त्यापैकी निजामशाही, कुतूबशाही आणि आदिलशाही ही तीन शाही राज्ये
सतराव्या शतकामध्ये अस्तित्वात होती. या शतकाच्या प्रारंभी मुघल सम्राट
अकबराने दक्षिणेत आक्रमण करून खानदेशातील फारुकी सत्ता नष्ट केली
आणि मुघल सत्तेचा दक्षिणेत विस्तार सुरू केला. त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत
आक्रमण करून निजामशाहीला आव्हान दिले. अशाप्रकारे दक्षिणेतील शाही
राज्यकर्त्यांपुढे मुघलांचे आक्रमण ही एक मोठी समस्या निर्माण झाली. सम्राट
अकबरानंतर शहाजहानने १६३६ मध्ये दक्षिणेची स्वारी काढली आणि
आदिलशहाबरोबर तात्पुरता तह करून त्याच्या मदतीने निजामशाही नष्ट केली.
निजामशाहीचा प्रदेश शहाजहान आणि आदिलशहा यांनी आपापसात वाटून
घेतला. निजामशाही नष्ट झाल्यामुळे आदिलशाही व कुतुबशाही ही दोन शाही
राज्ये दक्षिणेमध्ये शिल्लक राहिली. शहाजहाननंतर मुघल सत्ताधीश बनलेल्या
औरंगजेबाने दक्षिणेतील दोन्ही शाही राज्ये नष्ट करण्याची महत्वाकांक्षा प्रथमपासून
बाळगली. अशाप्रकारे दक्षिण भारतात मुघलांचा प्रभाव वाढत होता. विजयनगरचे
साम्राज्य १६ व्या शतकाच्या मध्यात म्हणजे १५६५ मध्ये दक्षिणेतील शाही
राजवटींनी तालीकोटच्या लढाईत निर्णायक विजय मिळवून नष्ट केले. त्यामुळे
प्रभावशाली स्थानिक सत्ता एकही शिल्लक राहिली नाही. अशा या राजकीय
दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवाजी
महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अत्यंत सामर्थ्यशाली अशा
मुघलसत्तेला तसेच आदिलशाहीला टक्कर देऊन आपल्या राज्याला बळकटी
९०