छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
देवालय औरंगजेबाने पाडले. आणि त्या ठिकाणी मशीद उभारली. अशा
प्रकारच्या औरंगजेबांच्या ताठर धोरणामुळे उत्तर भारतात सर्वसामान्य हिंदूंमध्ये
अस्वस्थता पसरली. सुरतेमधील जवळ जवळ ८००० हिंदू बादशहाकडे दाद
मागण्यासाठी दिल्लीकडे गेले, असा उल्लेख एका समकालीन पत्रामध्ये
आढळतो.
दक्षिणेत दहशत निर्माण करण्यासाठी औरंगजेबाने मुअज्जमला असे
कळविले की, प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी या दोघांनाही कैद करावे.
मुअज्जमला मात्र बादशहाच्या या घातकी धोरणाबद्दल चीड आली होती. त्याने
कोणालाही कैद वगैरे केले नाही. उलट मराठ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या प्रदेशात
जाऊ दिले. वास्तविक पाहता शिवाजीची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर
सलोख्याचे राजकारण जर औरंगजेबाने केले असते तर शिवाजीनेही मुघलांबाबत
सामोपचाराचे धोरण स्वीकारले असते. संभाजीला मन्सब घेण्यासाठी पाठवून
शिवाजीने आपले सामोपचाराचे धोरण स्पष्ट केले होते. औरंगजेबाने हिंदूवर
जिझियाकर लादलेला ऐकून एक सविस्तर पत्र पाठवून सामान्य रयतेची
छळवणूक करू नये अशी तळमळीची विनंती शिवाजीने बादशहाला केली
होती. परंतु संपूर्ण दक्षिण आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मनसुबा
औरंगजेबाने रचलेला होता आणि म्हणून शिवाजीच्या सामोपचाराच्या धोरणाला
त्याने दाद दिली नाही.
शिवाजीची आक्रमक भूमिका
औरंगजेबाने सामोपचाराचे धोरण सोडून देऊन आपल्याविरुद्ध छुपे
राजकारण सुरू केले, आपले निष्ठावंत सरदार निराजी रावजी व प्रतापराव
गुजर यांना विश्वासघाताने कैद करण्याचा डाव रचला हे पाहून शिवाजीनेही
मुघलांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले आणि केवळ घाटावर व कोकणातच
नव्हे तर बागलाण, खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा इत्यादी मुघलांच्या ताब्यात
असलेल्या प्रदेशावर आक्रमक हल्ले करण्याचे धोरण आखले. पुरंदरच्या तहामुळे
जो प्रदेश गमावला आणि जे किल्ले गमावले आहेत ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी
शिवाजीने योजना आखली. पुण्याजवळ असलेला सिंहगड हा किल्ला स्वराज्याचे
प्रवेशद्वारच होते. तेव्हा तो किल्ला प्रथम जिंकून घेण्याचे शिवाजीने ठरविले
आणि त्याप्रमाणे ४ फेब्रुवारी १६७० रोजी शिवाजीने तानाजी मालुसरे याला
पाठवून सिंहगड जिंकून घेतला. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी तानाजीला
वीरमरण पत्करावे लागले. पुण्याजवळ घाटमाथ्याच्या तोंडाशी असलेला दुसरा
६० छत्रपती शिवाजी महाराज
किल्ला म्हणजे पुरंदर होय. हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याला पुणे
शहराची, विशेषतः स्वराज्याची नाकेबंदी करता येणे सहज शक्य होते. त्यामुळे
सिंहगड पाठोपाठ पुरंदरचा किल्ला ताब्यात घेण्याचे शिवाजीने ठरविले.
शिवाजीने निळोपंतांना पुरंदरचा किल्ला जिंकण्यास पाठविले. ८ मार्च १६७०
रोजी निळोपंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. अशा प्रकारे शिवाजीने अवघ्या
दोन महिन्यात दोन महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची झोप उडाली.
हे किल्ले जिंकण्यापूर्वीच वऱ्हाड प्रदेशात जानेवारी १६७० मध्ये मराठ्यांनी
धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर जुन्नर-नगर पासून थेट औरंगाबादपर्यंत
आणि तेथून मराठवाड्यात परिंडा-औसा पर्यंत आक्रमण करून मराठ्यांनी
मुघलांची दाणादाण केली. पुरंदरच्या तहाप्रमाणे जे २३ किल्ले मुघलांना देण्यात
आले होते ते एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरू केला.
३ मे १६७० रोजी लोहगड जिंकून घेतला, तर १६ जून रोजी माहुली जिंकून
घेतला. त्यानंतर एकाच आठवड्यात २२ जून रोजी कर्नाळा आणि २४ जून
रोजी रोहिडा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. अशा प्रकारे
१६७०च्या पावसाळ्यापर्यंत पराक्रमाची शर्थ करून मराठ्यांनी पुरंदरच्या तहाचा
कलंक धुवून काढला. केवळ किल्ले जिंकून मराठे थांबले नाहीत, तर मुघलांच्या
ताब्यात गेलेली महत्त्वाची ठाणीही त्याने एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा
उद्योग सुरू केला. कल्याण हे कोकणातील महत्त्वाचे ठाणे मराठ्यांनी जिंकून
घेतले. अशाप्रकारे शिवाजीचे हे आक्रमक धोरण पाहून औरंगजेबाला शिवाजीविरुद्ध
काहीतरी जालीम राजकारण केले पाहिजे असे वाटू लागल्यास नवल नाही.
आदिलशहाला आणि किनारपट्टीवर असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना आपल्या
बाजूस वळवून शिवाजीविरुद्ध डावपेच लढविण्यास त्याने सुरुवात केली.
त्यानुसार त्याने पाश्चात्य वखारवाल्यांना आणि आदिलशहा यांना फर्माने
पाठविली परंतु हे सर्व होईपर्यंत पावसाळा सुरू झाला. मराठ्यांनी आपले चढाईचे
राजकारण स्थगित केले आणि पावसाळ्याच्या दिवसात शिवाजीविरुद्ध हालचाली
करणे धोकादायक आहे हे मुघलांना माहित असल्यामुळे तेही स्वस्थ बसले.
सुरतेची दुसरी लूट
१६७०चा पावसाळा थांबला आणि शिवाजीने लगेच पुन्हा चढाईचे
राजकारण सुरू केले. मुघलांना नामोहरम करण्यासाठी अचानकपणे सुरतेवर
छापा घालण्याचे त्याने ठरविले. या सुरतेच्या स्वारीपाठीमागे शिवाजीचे प्रमुख
दोन उद्देश होते. एक म्हणजे सुरतेवर स्वारी केल्यामुळे औरंगजेबाला जबरदस्त
चढाईचे राजकारण ६१
धक्का देता येईल आणि मुघलांची नाचक्की होईल. दुसरा उद्देश म्हणजे
आपल्याविरुद्ध मुघलांना मदत करण्यास उद्युक्त असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना
धक्का बसेल. याशिवाय तिसरा उद्देश म्हणजे सुरतेची पुन्हा लूट करून संपत्ती
आणता येईल. या दुसऱ्या स्वारीच्या वेळी शिवाजीने किनारपट्टीचा मार्ग निवडला
होता. ३ व ४ ऑक्टोबर १६७० रोजी त्याने सुरतेवर अचानक हल्ला केला
आणि सुमारे ६६ लाख रुपयांची लूट केली. या लुटीच्या वेळी शिवाजीने
डच आणि इंग्रज यांना बहुधा अंतःस्थपणे कौल (संरक्षण) दिला असावा.
कारण इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये आणि डचांच्याही पत्रव्यवहारामध्ये ‘शिवाजीने
आम्हाला कसलाही त्रास दिला नाही' अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत.
ही लूट परत घेऊन जाताना किनारपट्टीच्या ऐवजी खानदेश-बागलाणच्या मार्गाने
जाण्याचे शिवाजीने ठरविले होते.
वणी-दिंडोरीची लढाई
सुरतेची स्वारी आटोपून आणि बरोबर लुटीची संपत्ती घेऊन शिवाजी
खानदेश-बागलाण मार्गाने स्वराज्याकडे मार्गाक्रमण करू लागला. यावेळी
खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान पन्नी हा होता. शिवाजीशी सामना
देण्यासाठी त्याने जय्यत तयारी केली. बागलाणातून मार्गाक्रमण करीत असताना
शिवाजीला वणी-दिंडोरीच्या परिसरात दाऊदखानाने अडविले. १७ ऑक्टोबर
१६७० रोजी कंचन-मंचनच्या घाटाजवळ मुघल आणि मराठे यांच्यामध्ये तुंबळ
युद्ध झाले. त्या युद्धामध्ये मराठ्यांनी मुघलांचा दणदणीत पराभव केला.
सभासदाने आपल्या बखरीमध्ये वणी-दिंडोरीच्या लढाईचे तपशिलाने वर्णन
दिलेले आहे. मराठ्यांनी या लढाईत शानदार विजय संपादन केला मात्र
औरंगजेबाचा दरबारी लेखक भीमसेन सक्सेना याने ‘या लढाईत मराठ्यांची
हार झाली व ते पळून गेले' असे लिहून ठेवले आहे. दरबारी लेखक
औरंगजेबाच्या समजुतीसाठी मुद्दाम खोटे लिहून ठेवत असावेत.
बऱ्हाणपूरपर्यंत मराठे
वणी-दिंडोरीची लढाई झाल्यानंतर शिवाजीने मुघलांबरोबरचे आक्रमक
धोरण अधिक तीव्र केले. दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या बऱ्हाणपूर पर्यंत मजल
मारून औरंगजेबाला आणखी एक धक्का देण्याचे शिवाजीने ठरविले. या
योजनेप्रमाणे डिसेंबर १६७० पर्यंत मराठ्यांनी थेट बऱ्हाणपूरपर्यंत मजल मारली.
तेथून साधारणपणे दोन मैल अंतरावर असलेली बहादरपूरा ही पेठ मराठ्यांनी
६२ छत्रपती शिवाजी महाराज
लुटली. खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान याला ती बातमी कळल्यानंतर
तो मोठ्या तयारीनिशी बऱ्हाणपूराकडे निघाला. परंतु मराठ्यांचा वेग एवढा
मोठा होता की बहादूरपूरा लुटून अतिशय शिघ्र गतीने ते बागलाणपर्यंत पोहचले
याचा अर्थ दाऊदखान बऱ्हाणपूरपर्यंत पोहचण्याअगोदरच त्याला झुकांडी देऊन
मराठे खानदेश सुभ्यामध्ये घुसले आणि बागलाणमधील मुल्हेर किल्ल्याजवळची
पेठ त्यांनी लुटली. ही बातमी कळल्यावर दाऊदखान अधिकच चवताळला
आणि मोठ्या शिघ्र गतीने तो बागलाणकडे परतला. परंतु दरम्यान ५ जानेवारी
१६७१ रोजी मराठ्यांनी मुल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. या सगळ्या बातम्या
समजल्यामुळे औरंगजेब अतिशय बेचैन झालेला होता. शिवाजीचा पुढचा
बंदोबस्त करण्यासाठी महाबतखान नावाच्या पराक्रमी सरदारास त्याने दक्षिणेच्या
मोहिमेवर पाठविले.
महाबतखानाची मोहीम
जानेवारी १६७१ मध्ये बऱ्हाणपूर ओलांडून महाबतखान दक्षिणेत आला.
औरंगाबादकडे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान याच्या बरोबर मोहिमेच्या
आखणीबाबत त्याने चर्चा केली. नंतर औरंगाबादेत जाऊन शाहजादा मुअज्जम
याला तो भेटला. आपल्या मोहिमेमध्ये बागलाण प्रदेशावर प्रथम वर्चस्व निर्माण
करण्याचे धोरण त्याने आखले. त्याच्याबरोबर नव्या दमाचे सैन्य होते.
त्याचप्रमाणे दिलेरखानही त्याच्या मदतीसाठी मोठे सैन्य घेऊन आला. शिवाय
दाऊदखान पन्नी याचेही सैन्य त्याच्या दिमतीस होते. दाऊदखानच्या सैन्यास
बागलाणमधील किल्ले लढविण्याचा अनुभव होता. अशाप्रकारे मोठी तयारी
झाल्यावर महाबतखानाने वेगवेगळ्या तुकड्या बागलाणातील किल्ले जिंकून
घेण्यासाठी पाठविल्या. अहिवंत, हातगड आणि मार्कंडा हे किल्ले अल्पावधीत
जिंकून घेऊन मुघलांनी बागलाणमध्ये पुन्हा प्रभाव निर्माण केला. बागलाणमधील
कण्हेरागड या किल्ल्याच्या पायथ्याशी मराठे व मुघल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध
झाले. या युद्धात रामजी पांगेरा या मराठी सरदाराने पराक्रमाची शर्थ केली.
सभासद लिहितो, 'एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे
भांडिले'. त्याचा पराक्रम पाहून दिलेरखानही चकीत झाला असा उल्लेख
सभासदाने आपल्या बखरीत केलेला आहे. बागलाणमधील महत्त्वाचे किल्ले
ताब्यात आल्यानंतर महाबतखानाने आपल्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला.
या योजनेप्रमाणे मराठ्यांना बागलाणच्या प्रदेशात गुंतवून ठेवायचे आणि
दिलेरखानाने शिवाजीचे प्रमुख केंद्र असलेल्या पुणे शहरावर हल्ला करायचा
चढाईचे राजकारण ६३
असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे जानेवारी १६७२ च्या सुमारास दिलेरखानाच्या
फौजा पुण्याकडे मार्गक्रमण करू लागल्या. परंतु यावेळी मराठ्यांनी आत्मसंरक्षणाची
कडेकोट तयारी केलेली होती आणि बागलाणमधून मुघलांना माघार घेण्यास
भाग पाडण्यासाठी चौफेर हल्ले करण्याची योजना मराठ्यांनी आखली होती.
प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य बागलाणमध्ये
उतरले. अटीतटीचा प्रसंग आला तर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी बागलाणात
जाऊन किल्ले जिंकण्यास मदत करावी असे ठरविण्यात आले. दरम्यान
मुघलांतर्फे इखलासखान याने साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. यावेळी
रोमहर्षक युद्ध झाले. मराठ्यांतर्फे सूर्यराव काकडे याने एवढा पराक्रम गाजविला
की मुघलांना माघार घेण्याशिवाय इलाज उरला नाही. तथापि अचानकपणे
तोफेचा एक गोळा सुर्यराव काकड्यास लागला आणि तो धारातिर्थी पतन
पावला. परंतु मराठ्यांनी धीर सोडला नाही. ठरल्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे
कोकणातून प्रतापराव गुजराच्या मदतीसाठी बागलाणात आले. आणि या सर्वांनी
मिळून मुघलांचा वेढा मोडून काढला. साल्हेरचा वेढा सोडून मुघलांनी माघार
घेतली. फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरचा किल्ला जिंकून घेऊन संपूर्ण
बागलाणवर मराठ्यांनी पुन्हा पकड निर्माण केली. मराठ्यांच्या चौफेर पराक्रमाच्या
वार्ता ऐकून दिलेरखानालाही पेचात सापडल्यासारखे वाटले. पुण्यापेक्षा बागलाणवरच
प्रभाव निर्माण केला पाहिजे कारण तो प्रदेश आपल्या हातचा गेला तर
दक्षिणेतील मुघल सत्ता धोक्यात येईल असा विचार करून दिलेरखानाने पुण्याची
मोहिम सोडली आणि बागलाणकडे तो परतला. मुघलांची ही पिछेहाट झालेली
पाहून औरंगजेब अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने मुअज्जम व महाबतखान
यांना उत्तरेत परत बोलाविले. दिलेरखानाबाबतही तो नाराज झाला होता. मुघल
फौजेतील अनेक मराठे सरदार शिवाजीच्या आश्रयाला येऊ लागले होते. सिद्दी
हिलाल, जाधवराव इत्यादी सरदार आपापल्या फौजा घेऊन शिवाजीच्या
आश्रयास आले. अशाप्रकारे १६७२ च्या प्रारंभी शिवाजीने मुघलांच्याच प्रदेशात
विशेषतः बागलाण भागात आपले प्रभुत्व निर्माण केले आणि बागलाणातील
किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची खानदेश बागलाणमार्गे पुण्याकडे होणारी
आक्रमणे थोपविणे मराठ्यांना सहजशक्य झाले.
छत्रसाल आणि शिवाजी
शिवाजी आग्र्याहून परत आल्यानंतर त्याच्या पराक्रमाविषयी उत्तर भारतातील
लोकांना मोठे कुतूहल वाटू लागले. विशेषतः रजपूतांना शिवाजीच्या धाडसी
६४ छत्रपती शिवाजी महाराज
आणि आक्रमक प्रवृत्तीचे विशेष कौतुक वाटले. चंपतराय बुंदेले याचा मुलगा
छत्रसाल हा औरंगजेबाच्या प्रशासनामध्ये काम करीत होता. शिवाजीचे बाणेदार
वर्तन पाहून तो बेहद खूष झाला. शिवाजीने दक्षिणेत ज्याप्रमाणे एक स्वतंत्र
राज्य स्थापन केले, त्याप्रमाणे आपल्याला उत्तर भारतात करता येईल का असा
एक महत्त्वाकांक्षी विचार त्याच्या मनामध्ये आला. या विचाराने तो एवढा भारला
की त्याने मुघलांची मनसबदारी सोडून दिली आणि दक्षिणेत शिवाजीच्या
भेटीसाठी तो आला. भीमसेन सक्सेना याने ‘तारिखे दिलकशा’ या ग्रंथामध्ये
छत्रसाल आणि शिवाजी यांच्या भेटीचा तपशील दिलेला आहे. छत्रसालाने
शिवाजीकडून प्रेरणा घेतली आणि उत्तर भारतात जाऊन संधी येताच स्वतंत्र
राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला.
१६७२ पर्यंत शिवाजीने दक्षिणेतील आपल्या सर्व शत्रूंना नामोहरम करून
सोडले. मुघलांशी शिवाजीचा सामना चालू असतांना आदिलशहा, कुतूबशहा,
पोर्तुगीज आणि अन्य वखारवाले शिवाजीच्या विरोधात गेले नाहीत. आपले
स्वराज्य चारी बाजूंनी सुरक्षित करण्यासाठी शिवाजी कसोशीने प्रयत्न करीत
होता. कारण आपली सत्ता निर्वेध झाल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करवून
घेण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागला होता.
🞎🞎🞎
चढाईचे राजकारण
६५
९. मुघलांची पिछेहाट
रयतेला कौल
आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजीने प्रथम आपल्या जवळच्या शत्रूंना
सामोपचाराने आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मागील प्रकरणात
सांगितल्याप्रमाणे आदिलशहा आणि कुतुबशहा यांनी शिवाजीबरोबर तह करून
सलोखा जोडला होता. बारदेशच्या स्वारीनंतर पोर्तुगीजही नरमले होते. त्यांनी
शिवाजीला आशिया खंडातील श्रेष्ठ राजा मानून त्याच्याशी सलोख्याचा तह
केला. इंग्रज, डच, आणि फ्रेंच यांनी तर नरमाईचेच धोरण स्वीकारले होते.
फक्त मुघलांचा शिवाजीला प्रखर विरोध होता. तरीपण आग्र्याहून सुटून शिवाजी
दक्षिणेत आल्यानंतर औरंगजेबाने शिवाजीशी वरकरणी सलोखा प्रस्थापित केला.
शाहजादा मुअज्जम हा इ.स. १६६७च्या प्रारंभी दक्षिणेचा सुभेदार म्हणून
औरंगाबादेस रूजू झाला. तो ऐषारामी प्रवृत्तीचा होता. आणि मराठ्यांबरोबर
त्याला संघर्षही नको होता. एकूण शिवाजीच्या दृष्टीने इ.स. १६६७-६८ हे
वर्ष बऱ्याच प्रमाणात शांततेचे गेले. सतत लढाया आणि पेचप्रसंग सुरू
असल्यामुळे स्वराज्यात सुधारणा करण्याइतकी सवड शिवाजीला मिळाली
नव्हती. विशेषतः शायिस्तेखानाच्या स्वारीनंतर आणि त्यानंतर जयसिंग-
दिलेरखान यांच्या स्वारीमुळे स्वराज्यातील बराच मुलूख उध्वस्त झाला होता.
शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली होती. मुघलांनी काही गावेच्या गावे
जाळून-पोळून भस्म केल्यामुळे लोक परागंदा झाले होते. गावेच्या गावे ओस
पडली होती. लोकांची परिस्थिती शोचनीय झाल्यामुळे महसूलाचे उत्पन्न खूप
घटले होते. अशाप्रकारे स्वराज्यामध्ये बिकट संकट निर्माण झाले होते. आपल्या
स्वराज्याचा विस्तार करण्यापूर्वी आपल्या ताब्यात असलेल्या राज्याची घडी
बसविणे, रयतेला कौल देऊन त्यांचे पुनर्वसन करणे आणि स्वराज्याच्या
परिसरात शांतता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे याची शिवाजीला पूर्ण
कल्पना होती. परंतु जयसिंगच्या स्वारीनंतर मुघलांशी राजकारण करण्यामुळे
शिवाजीला स्वराज्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अवसर सापडला नाही. आग्र्याहून
परतल्यानंतर १६६७ च्या अखेरपर्यंत बरेच स्थीरस्थावर झाले आणि शिवाजीला
स्वराज्यात सुधारणा करण्यासाठी उसंत मिळाली.
६६
आपल्या सहकाऱ्यांपैकी मोरोपंत पिंगळे आणि अण्णाजी दत्तो यांना शेती
सुधारणा आणि पुनर्वसन याकडे लक्ष देण्यास सांगितले. शिवाजीने रयतेला
अभय दिले. परागंदा झालेल्या रयतेला आपापल्या गावी परत बोलावून ज्याच्या
त्याच्या जमिनी ज्याला त्याला परत केल्या. लावणी-संचणीसाठी लोकांना उत्तेजन
दिले. पडीत जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना सवलती जाहीर
केल्या. स्वराज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतसारा निश्चित करण्याचे काम
अण्णाजी दत्तो यांचेकडे सोपविले. जे शेतकरी गरीब असतील त्यांना बी-
बियाणे, नांगर पुरविणे, नांगरणीच्या कामासाठी बैल मिळवून देणे, इ.
शेतकऱ्यांच्या हिताची कामे करून शिवाजीने रयतेचा विश्वास संपादन केला.
आपल्या लष्कराला शिवाजीने असे आदेश दिले की शेतकऱ्यांना उपद्रव देऊ
नये, त्यांच्या उभ्या पिकांची हानी करू नये, कोणी उपसर्ग केला तर राजे
सहन करणार नाही, महसूल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, 'रयतेचा वाटा
रयतेला मिळालाच पाहिजे', अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या भाजीच्या
देठाचाही मोह धरता कामा नये. अशा प्रकारे स्वराज्यातील रयतेला संपूर्ण
दिलासा देऊन शिवाजीने लोकांचा विश्वास तर संपादन केलाच, पण त्याचबरोबर
हे राज्य रयतेचे राज्य आहे अशी भावना लोकांच्या मनात त्याने निर्माण केली.
परिणाम असा झाला की, गावागावातून मावळे आणि इतर लोक स्वराज्यासाठी
वाटेल तो त्याग करण्यास तयार झाले.
कोकण भागात प्रभाव
बागलाण भागात मुघलांची पिछेहाट शिवाजीने केली होती. परंतु याच
काळात कोकणामध्ये शिवाजीच्या लहानसहान शत्रूंनी शिवाजीच्या प्रदेशात
घुसखोरी सुरू केली. विशेषतः जव्हार आणि रामनगर येथील राजे शिवाजीच्या
प्रदेशात अधिक्षेप करू लागले. जंजिऱ्याचे सिद्दी हे तर शिवाजीच्या दृष्टीने
अस्तनीतील शत्रू होते. त्यांनी किनाऱ्यावरच्या प्रदेशात मोठा उपद्रव सुरू केला
होता. सिद्दींची चढाई पाहून पोर्तुगिजांनाही नवे अवसान आले आणि त्यांनीही
कोकणात उपद्व्याप सुरू केले. या शत्रूंचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी
शिवाजीने मोरोपंतावर सोपविली होती. मोरोपंत खास सैन्यदल घेऊन कोकणात
उतरले. प्रथम त्यांनी चौल आणि वसई ही पोर्तुगिजांची ठाणी आपल्या
प्रभावाखाली आणली. त्यानंतर इ.स.१६७२ च्या पावसाळ्याच्या प्रारंभी जव्हार
जिंकून घेतले आणि पाठोपाठ रामनगरही ताब्यात घेतले. जव्हारचा राजा
मुघलांच्या आश्रयाला गेला तर रामनगरचा राजा पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेला.
मुघलांची पिछेहाट ६७
अशाप्रकारे कोकणात आपला प्रभाव निर्माण करून मोरोपंतांनी मोहीम यशस्वी
केली.
दोन शाही राजवटी
आग्याहून परत आल्यानंतर शिवाजीने गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि
विजापूरचा आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. इ.स. १६७२
पर्यंत या संबंधामध्ये कोणताही बिघाड झाला नाही. पण या वर्षी म्हणजे १६७२
मध्ये दोन्ही शाही राजवटींचे सुलतान मरण पावले आणि राजकारणाचे रंग
पालटू लागले. २१ एप्रिल १६७२ रोजी गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्ला
कुतुबशहा मृत्यू पावला. त्यानंतर सात महिन्यांनी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७२
रोजी विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मृत्यू पावला. या दोन्ही सुलतानांनी
शिवाजीशी सलोख्याचे संबंध जोडलेले होते. नवीन येणाऱ्या सुलतानाबरोबरही
सलोखा कायम ठेवावा असे शिवाजीचे धोरण होते. त्याचप्रमाणे सुलतानपदासाठी
होणाऱ्या संघर्षापासून आपण अलिप्त रहावे आणि कोणाचीही बाजू घेऊ नये
असे तटस्थ धोरण शिवाजीने स्वीकारले होते. गोवळकोंड्याच्या सुलतानपदावर
अब्दुल्ला कुतुबशहाचा जावई तानाशहा हा अब्दुल हसन हे नाव धारण करून
विराजमान झाला. त्याचे अभिनंदन करण्यासाठी शिवाजीने निराजी पंतास
गोवळकोंड्यास पाठविले. अब्दुल हसनने निराजीपंताचे स्वागत करून मराठ्यांशी
सलोख्याचे संबंध यापुढेही अबाधित राहतील असे अभिवचन दिले आणि दरवर्षी
एक लाख होन खंडणी देण्याचेही त्याने मान्य केले.
विजापूरच्या आदिलशहाबाबत मात्र सलोख्याच्या संबंधाला उजाळा मिळू
शकला नाही. कारण विजापूरच्या सुलतान पदावर सिकंदरशहा विराजमान झाला
पण तो अल्पवयी असल्यामुळे राजकारणाची सुत्रे विजापूर दरबारातील
खवासखान नावाच्या सरदाराकडे गेली. खवासखान हा शिवाजीचा पक्का
विरोधक होता. अली आदिलशहाने शिवाजीबरोबर जे सलोख्याचे संबंध
प्रस्थापित केले होते ते त्याला अजिबात मान्य नव्हते. म्हणून दरबारची सूत्रे
आपल्या हाती आल्यानंतर त्याने शिवाजीविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले.
मुघलांची मदत घेऊन शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करता येईल असे त्याला
वाटत होते. शिवाजीविरुद्ध उठाव करून प्रथम औरंगजेबाची कृपा संपादन
करावी म्हणजे मुघल फौजा आपल्या मदतीला येतीलच असा सल्ला दियानत
पंडीत या हस्तकाने त्याला दिला होता. खवासखानाने मराठ्यांच्या प्रदेशावर
स्वारी करण्याचे ठरविले. अर्थात त्यामुळे सलोखा संपला आणि संघर्ष सुरू
झाला.
६८ छत्रपती शिवाजी महाराज
बहलोल खानाची स्वारी
विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात
आहे हे कळल्याबरोबर शिवाजीने आक्रमक भूमिका घेतली. प्रतापराव गुजर
आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान
अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजीने
पाठविले. मोठ्या हिकमतीने कोंडाजी फर्जंदने ६ मार्च १६७३ रोजी पन्हाळा
किल्ला जिंकून घेतला. या स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या
'पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला
हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. खवासखानाने
बहलोलखान नावाच्या सरदारास मोठ्या तयारीनिशी शिवाजीविरुद्ध पाठविले.
मुघल सरदार दिलेरखान याची मदत बहलोल खानाला मिळावी म्हणून
खवासखानाने प्रयत्न सुरू केले. बहलोल खानची स्वारी येत आहे हे
समजल्यावर शिवाजीने प्रतापरावाला बहलोल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी
पाठविले आणि त्याला निर्वाणीची आज्ञा केली की, 'बहलोलखान स्वराज्यामध्ये
उपद्व्याप करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा निर्णायक पराभव करावा. आणि
त्याला ठार मारून कायमचा बंदोबस्त करावा. शिवाजी महाराजांचा हा निर्वाणीचा
इशारा मिळाल्यावर प्रतापराव गुजर आणि आनंदराव मोठ्या तयारीनिशी
विजापूरी प्रदेशात घुसले. एप्रिल १६७३ मध्ये प्रतापरावाने बहलोलखानास
उमराणीजवळ गाठले. याठिकाणी घनघोर युद्ध होऊन बहलोल खानाचा
दणदणीत पराभव झाला. खान पकडला गेला. त्याने प्रतापरावची मनधरणी
करून क्षमा मागितली. 'या उपरी त्रास देणार नाही, आम्ही तुमचे आहोत'
अशा शब्दात खानाने विनविण्या केल्या. उदार अंतःकरणाच्या प्रतापराव गुजरने
बहलोल खनाला सोडून दिले. ही गोष्ट समजताच शिवाजी संतप्त झाला. तुम्ही
खानाला का सोडून दिले? म्हणून प्रतापरावाला दोष दिला.
खानाचा पराभव केल्यानंतर प्रतापरावाने हुबळीपर्यंत मजल मारून इंग्रजांची
वखार लुटली. प्रतापरावाचे कर्नाटकात पराक्रम चालू असतांना देशावरचे
मोक्याच्या ठिकाणचे किल्ले घेण्याचे सत्र मराठ्यांनी सुरूच ठेवले होते. १६७३
च्या पावसाळ्यापर्यंत परळी आणि सातारा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी
जिंकून घेतले. मराठ्यांचे हे सारे पराक्रम ऐकून आदिलशहाचा सुत्रधार
खवासखान अतिशय संतप्त झाला. बहलोल खानाची त्याने निर्भत्सना केली.
तेव्हा पन्हाळा जिंकून घेण्याचा निर्धार बहलोल खानाने केला. त्यासाठी त्याने
कोल्हापूरजवळ छावणी केली. ही बातमी समजताच शिवाजीने प्रतापरावाला
मुघलांची पिछेहाट ६९
४. शाइस्ताखान पराभव, सुरत विजय व पुरन्दर सन्धि
बोलविले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की ‘बहलोलखानाला बुडवून फत्ते
करणे, नाहीतर तोंड न दाखविणे’ शिवाजीने निर्वाणीचा संदेश दिल्यानंतर
प्रतापराव बहलोलखानाचा निकाल लावण्याचा मनसुबा रचून कोल्हापूरकडे
निघाला. ज्याला आपण क्षमा केली होती तोच आपल्यावर उलटलेला आहे
हे पाहून प्रतापराव उद्विग्न झालेला होता. संतापाने तो बेभान झालेला होता.
कोल्हापूरच्या दक्षिणेस चाळीस मैलावर असलेल्या नेसरीच्या खिंडीत प्रतापरावाने
बहलोल खानाला गाठले. या दिवशी तारीख होती २४ फेब्रुवारी १६७४.
नेसरीच्या खिंडीपर्यंत पोहचल्यावर आपल्या सैन्याची पाहणी करीत असलेल्या
बहलोल खानाला त्याने पाहिले. खान दिसल्यावर प्रतापराव बेभान झाला. आणि
कोणताही विचार न करता बरोबर असलेल्या केवळ ६ सैनिकांना घेऊन तो
बहलोल खानाच्या सैन्यात मोठ्या त्वेषाने घुसला. हे ७ मराठे वीर कापाकापी
करत बरेच अंतर चालून गेले. पण बहलोल खानाचे सैन्य प्रचंड होते. हे
६ वीर आणि प्रतापराव लढता लढता धारातिर्थी पतन पावले. नारायण शेणवी
याने मुंबईकर इंग्रजांना ४ एप्रिल १६७४ रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये
प्रतापरावाच्या साहसाची माहिती कळवलेली आढळते. प्रतापरावला मारल्यामुळे
बहलोल खानाला मोठा हर्ष झाला परंतु त्याचा हा आनंद फार वेळ टिकू
शकला नाही. कारण आनंदरावाने मोठ्या त्वेषाने खानाच्या फौजेवर हल्ला
केला त्याने बहलोल खानास माघार घेण्यास भाग पाडले. दरम्यान दिलेरखान
बहलोलखानाच्या मदतीस धावून आला. आदिलशाही आणि मुघली फौज एकत्र
आल्या. तेव्हा गनिमी कावा लढवून आनंदरावाने आपला मार्ग बदलला व
तो थेट बंकापूरपर्यंत गेला. बंकापूरजवळ असलेले संपगाव आनंदरावाने लुटले.
हे संपगाव बहलोल खानाच्या जहागिरीत मोडत असल्याने आनंदरावाने लुटले.
बंकापूरजवळ झालेल्या लढाईत आदिलशाही सैन्याचा संपूर्ण पराभव झाला.
विजय संपादन करून आणि मोठी लूट घेऊन आनंदराव जेव्हा शिवाजीकडे
आला तेव्हा त्याची पाठ थोपटून शिवाजीने त्याला हंबीरराव हा किताब दिला
आणि त्याला सेनापती पदावर नेमले. प्रतापराव पडल्याचे दुःख शिवाजीला
फार झाले. प्रतापराव गेल्यामुळे आपली एक बाजू गेली असे उद्गार शिवाजीने
काढल्याचे सभासद बखरीत नमूद केलेले आहे.
बहादुरखानाची स्वारी
दिलेरखान बहलोलखानाच्या मदतीला धावून आला याचा उल्लेख वर
केलेला आहे. परंतु बहलोल व दिलेर एकत्र येऊनही मराठ्यांविरुद्ध त्यांना
७० छत्रपती शिवाजी महाराज
यश मिळू शकले नाही. उलट मराठ्यांचे पराक्रम वाढत चालले. इ. स. १६७३
च्या ऑक्टोबर महिन्यात शिवाजीने पांडवगड जिंकून घेतला आणि तेथून थेट
त्याने कारवारपर्यंत धडक मारली. शिवाजीचे हे सर्व पराक्रम ऐकून औरंगजेबाची
चीड वाढत चालली. दिलेरखानावरचा त्याचा विश्वास उडाला. शाहजादा
मुअज्जम कडून कोणतीच कामगिरी होत नव्हती. त्यामुळे दक्षिणेचे राजकारण
हा औरंगजेबाच्या चिंतेचा विषय झाला होता. तेव्हा जानेवारी १६७३ मध्ये
बहादूरखान या विश्वासू सरदारास दक्षिणेच्या मोहिमेवर औरंगजेबाने पाठविले.
दिलेरखान व बहादूरखान दोघे एकत्र आले आणि मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण
करण्याची योजना त्यांनी मांडली. परंतु कोणत्या बाजूने आक्रमण करावे याचा
निर्णयच त्यांना लवकर घेता आला नाही दरम्यान एका चकमकीत शिवाजीने
मुघलांचे एक हजार सैन्य गारद केले. त्यामुळे तर बहादूरखानाचे धाबेच
दणाणले. दिलेरखानाला वारंवार अपयश आलेले पाहून औरंगजेबाने त्याला
उत्तरेत बोलाविले. त्यामुळे मराठ्यांच्या प्रदेशावर आक्रमण करण्याची जबाबदारी
एकट्या बहादूरखानांवर पडली. बहादूरखान लोभी वृत्तीचा असल्यामुळे त्याला
काहीतरी आमिष दाखविले की त्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तो गप्प
बसले अशी शिवाजीची खात्री होती. आणि म्हणून, “बहादूरखान पेंडीचे गुरू
आहेत, त्याचा गुमान काय?” असे मतप्रदर्शन शिवाजीने केल्याचे सभासदाने
नमूद करून ठेवलेले आहे.
बहलोलखानाला पराभूत केल्यानंतर शिवाजीने दिलेरखान व बहादूरखान
यांचीही वाट लावली. आदिलशाही दरबार व दिल्लीचा दरबार शिवाजीच्या
पराक्रमामुळे भयचकीत झाला. औरंगजेब अधिक अस्वस्थ झाला आणि
विजापूरच्या खवासखानाची झोप उडाली. पोतुगिजांनी तर केव्हाच नरमाईचे
धोरण स्वीकारले होते. डच, फ्रेंच आणि इंग्रज आपला व्यापार सांभाळण्यासाठी
शिवाजीला मान देऊ लागले होते. कुतुबशहाशी तर शिवाजीचे चांगले सख्य
होते. जंजिऱ्याचे सिद्दी काहीतरी कुरापत काढून मराठ्यांच्या प्रदेशात घुसखोरी
करीत होते. परंतु किनारी प्रदेशात शिवाजीने एवढी चोख व्यवस्था केली होती
की सिद्दीही नामोहरम होऊन स्वस्थ बसले. थोडक्यात इ. स. १६७४ च्या
पूर्वार्धात शिवाजीचे सर्व शत्रू नामोहरम झाले होते आणि नरमले होते.
राज्याभिषेक करण्यासाठी हीच मोठी संधी आहे असा विचार करून शिवाजीने
गागाभट्टाशी विचारविनिमय करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे निश्चित
केले.
□□□
मुघलांची पिछेहाट ७१
१०. शिवराज्याभिषेक
राज्याभिषेकाचे प्रयोजन
शिवाजीने स्वराज्याची स्थापना केली तेव्हा आपल्या स्वतंत्र राज्याची
कोणतीही घोषणा केली नव्हती. १६३६ मध्ये आदिलशहाची नोकरी पत्करून
शहाजी जेव्हा कर्नाटकाकडे गेला त्यावेळी पुणे जहागिरीचा कारभार त्याने
बालशिवाजीकडे सोपविला होता. या मूळ जहागिरीच्या आधारे शिवाजी
महाराजांनी स्वराज्याच्या बांधणीला सुरुवात केली. शिवाजीच्या जहागिरीचा
म्हणजे राज्याचा विस्तार होत आहे हे पाहून आदिलशहा आणि मुघल
शिवाजीच्या हेतूविषयी साशंक झाले. शिवाजी केवळ जहागिरीचा विस्तार करीत
नसून स्वतंत्र राज्याचीच उभारणी करीत आहे याची खात्री १६६५ पर्यंत मुघल,
आदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज आणि इतर वखारवाले यांना पटली. विशेषतः
औरंगजेबाला शिवाजीचा हेतू धोकादायक असल्याचे लक्षात आले आणि म्हणून
मिर्झाराजे जयसिंगाला पाठवून त्याने शिवाजीचे राज्यच नष्टप्राय करण्याची
योजना आखली. ती यशस्वी झाली नाही, तेव्हा शिवाजीला उत्तरेत बोलावून
घेऊन त्याला कैदेत टाकण्याचा डाव औरंगजेबाने साधला. पण त्यातूनही
शिवाजी सहीसलामत निसटला आणि दक्षिणेत परत येऊन त्याने आपल्या
राज्याचा चौफेर विस्तार केला. मुघलांसहित सर्व शत्रूंचा यथेच्छ समाचार घेतला.
पाश्चात्त्य वखारवाल्यांना नामोहरम केले. आदिलशहा व कुतुबशहा यांना आपले
वर्चस्व मान्य करण्यास भाग पाडले. आपले राज्य आता निर्वेध झाले आहे
अशी खात्री पटल्यावर शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले.
मध्ययुगीन राज्यपद्धतीप्रमाणे वंशपरंपरा चालणारे राज्य स्थापन करणे शिवाजीला
आवश्यक होते. मोठ्या चतुराईने आणि कौशल्याने, तसेच अप्रतिम पराक्रमाने,
प्रसंगी जीवघेणे धाडस करून किंवा जीवाची बाजी लावून शिवाजीने स्वराज्याची
उभारणी केली होती. या कार्यासाठी साधुसंतांचे आशीर्वाद मिळवून देशावरील
व कोकणातील देसाई, देशमुखांचा विश्वास संपादन केला होता. त्यांनाही
स्वराज्यकार्यात सहभागी करून घेतले. आपल्या राज्यातील रयतेला सुखी
७२
करण्यासाठी संकल्प शिवाजीने सोडला होता. परकीयांच्या राज्यात, विशेषतः
मुघलांच्या राज्यात गोरगरीब जनतेवर भयानक अन्याय होत होता. स्त्रियांची
विटंबना होत होती आणि सज्जन साधुसंतांची अवहेलना होत होती. हा सर्व
अन्याय निपटून काढण्यासाठी शिवाजीने स्वराज्य उभारण्याचा खटाटोप केलेला
होता. आता हे राज्य स्थिर झाल्यामुळे भावी काळात राज्याचा वारस निश्चित
होण्यासाठी शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून जाहिर करून घेणे अत्यंत आवश्यक
होते. त्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याचा एकमेव मार्ग शिवाजीपुढे होता.
राजमाता जिजाबाई आणि शिवाजीचे सर्व सहकारी या सर्वांनी मिळून
मराठा राजवंश स्थापन करण्यासाठी शिवाजीला राज्याभिषेक करवून घेण्यासाठी
उद्युक्त केले असावे. मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीमध्ये म्हटले आहे की,
‘महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणोन छत्र सिंहासन करावे,
राज्याभिषेक करावा असा सर्वांचा मनोदय जाहाला.’ राज्याभिषेक करून
घेण्यामागे शिवाजीचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे स्वतंत्र राजा म्हणून
त्याला अभिषेकाने मान्यता मिळणार होती आणि त्यानंतर त्याच्या शत्रूंनाही
त्याला राजा म्हणून मानणे भाग पडणार होते. शिवाय जे अन्य शाही दरबारात
नोकरीला होते ते मराठे सरदार शिवाजीला आपल्या बरोबरीचे किंवा कमीप्रतीचे
मानत असत. अभिषेकानंतर त्यांनाही शिवाजीला स्वतंत्र राजा म्हणून मानणे
भाग पडणार होते. शिवाजीचा दुसरा उद्देश म्हणजे आपल्या राज्यातील वतने,
इनामे, वृत्ती देण्याचा अधिकार त्याला अभिषेकाने प्राप्त होणार होता. शिवाय
मध्ययुगीन राज्यप्रशासन पद्धतीप्रमाणे शिवाजीचे राज्यही वंशपरंपरेने चालणार
होते. राज्याभिषेक करण्याचे निश्चित झाल्यावर किल्ले रायगड हे ठिकाण
राजधानीसाठी शिवाजीने निवडले. हिरोजी इंदुलकर या स्थापत्यविशारदाकडे
रायगडावर राजमहाल, राण्यांचे आणि राजपुत्रांचे महाल, मंत्र्यांचे वाडे आणि
इतर इमारती बांधण्याचे काम दिले. या मोठ्या इमारतींशिवाय पाण्यासाठी प्रशस्त
तलाव, लहानमोठ्या अधिकाऱ्यांसाठी घरे, बाजारपेठ, दारूची कोठारे, गजशाळा,
अंबरखाना इत्यादी इमारती उभारून राजधानीचे वैभव वाढविण्यात आले.
त्याचप्रमाणे जगदिश्वराचे मंदिर शिवाजीच्या आज्ञेप्रमाणे हिरोजी इंदुलकरने
उभारले. अशाप्रकारे राजधानी सजविली. राज्याभिषेकाचा मुहूर्त गागाभट्टाने
काढला. ‘राज्याभिषेक प्रयोग’ आणि ‘तुलापुरुषदानविधी’ या दोन पोथ्या
गागाभट्टाने मुद्दाम तयार केल्या. १६७४च्या प्रारंभी राजधानी रायगडावर
राज्याभिषेकाची जय्यत तयारी सुरू झाली.
शिवराज्याभिषेक ७३
काही दुर्दैवी घटना
राज्याभिषेकाची तयारी चालू असताना काही दुर्दैवी आणि दुःखद घटना
घडल्या. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या लढाईत प्रतापराव गुजर मारला
गेला. शिवाजीला त्यामुळे विलक्षण दुःख झाले. आपले शब्द प्रत्यक्षात
आणण्यासाठी प्रतापरावने प्राणाची आहुती दिली हे शिवाजीच्या मनास फार
लागले. या दुःखातून सावरतो न सावरतो तोच शिवाजीला आणखी एका
शोककारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. १६ मार्च १६७४ रोजी शिवाजीची
एक पत्नी काशीबाई हिचा रायगडावर मृत्यू झाला. अशा या घटनांमुळे
शिवाजीची मनःस्थिती विचलित झाली. परंतु राज्याभिषेकाचा विधी चातुर्मास
सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक होते. नाहीतर पुढे ५-६ महिने अभिषेकाला
मुहूर्त नव्हता. शेवटी ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ हा दिवस राज्याभिषेकासाठी
निश्चित करण्यात आला. तिथी निश्चित झाल्यावर समारंभाची तयारी जलद गतीने
सुरू झाली. एप्रिल १६७४ मध्ये कर्नाटकाची स्वारी उरकून शिवाजी रायगडला
परतला, त्यासुमारास राज्याभिषेकाची कडेकोट तयारी झाली होती. या भव्य
दिव्य प्रसंगाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून शिवाजीने सीमेवरील
सैनिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या. मे १६७४ मध्ये शिवाजीने
पुन्हा एकदा चिपळूणच्या लष्करी तळाची पहाणी केली. रायगडवरील समारंभ
निर्वेध पार पडण्यासाठी चिपळूणच्या लष्करी तळाकडे महत्त्वाची जबाबदारी
होती. यथासांग तयारी झाल्यानंतर १९ मे १६७४ रोजी शिवाजी प्रतापगडावर
गेला आणि आपली कुलदेवता तुळजाभवानी हिचे दर्शन घेऊन तिचे आशिर्वाद
मागितले. तुळजादेवीला सोन्याचे छत्र विधीपूर्वक अर्पण केले. त्यानंतर २१
मे रोजी शिवाजी रायगडला परतला.
राज्याभिषेकसोहळा
२९ मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला. अभिषेक होण्यापूर्वी
शिवाजीचा व्रतबंध होणे आवश्यक होते. म्हणून २९ मे रोजी शुक्रवारी
शिवाजीची मुंज करण्यात आली. प्रायश्चित विधी म्हणून तुलापुरुषदान करण्यात
आले. डच कागदपत्रांमध्ये या तुलादानाविषयी माहिती आढळते. शिवाजीचे
वजन १७,००० पगोडे म्हणजे सुमारे १६० पौंड भरले असा उल्लेख डचांनी
केलेला आहे. शिवाजीची प्रथम सुवर्णतुला करण्यात आली. त्यानंतर चांदीची
व तांब्याचीही तुला करण्यात आली. मौल्यवान धातूंच्या तुला संपल्यानंतर
विविधप्रकारची फळे, साखर इत्यादींचीही तुला करण्यात आली. अशाप्रकारे
७४ छत्रपती शिवाजी महाराज
हा तुलापुरुषदानविधी मोठ्या उत्साहाने पार पडला. या समारंभासाठी देशाच्या
वेगवेगळ्या भागातून सुमारे ११,००० लोक रायगडवर उपस्थित झाले होते.
अशी माहिती डच रेकॉर्डमध्ये मिळते.
३० मे शनिवार रोजी शिवाजीचे समंत्रक विवाह झाले. २९ला मुंज
झाल्यामुळे पूर्वीचे विवाह रद्दबातल झाले होते. त्यामुळे ३० तारखेस शिवाजीला
आपल्या स्त्रियांशी पुन्हा विवाह करावे लागले. हेन्री ऑक्झिंडेन हा इंग्रज
प्रतिनिधी या प्रसंगी रायगडावर हजर होता. त्याला या धार्मिक विधीचा नीटसा
अर्थ न कळल्यामुळे शिवाजीने राज्याभिषेकापूर्वी काही स्त्रियांशी विवाह केले
असे त्याने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेले आढळते. त्यामुळे अनेक
इतिहासकारांचाही गैरसमज झालेला होता. समंत्रक विवाहप्रसंगी पट्टराणी म्हणून
शिवाजीने सोयराबाई हिला स्थान दिले. या विधीमुळे अभिषेकासाठी लागणारे
सर्व हक्क शिवाजी व सोयराबाई यांना धर्मशास्त्रपद्धतीने प्राप्त झाले.
३१ मे रोजी रविवार होता. ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त यादिवशी होता. त्यासाठी
अग्निप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा करण्यात आली आणि अनुषंगिक
सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्वीज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
सोमवारी १ जून १६७४ रोजी ग्रहयज्ञ करण्यात आला. त्याचप्रमाणे नक्षत्रहोम
हा विधीही करण्यात आला. २ जून रोजी म्हणजे मंगळवारी कोणताही मुहूर्त
नसल्यामुळे कसलाही विधी यादिवशी झाला नाही. बुधवारी नक्षत्रयज्ञ करण्यात
आला. ४ जूनला म्हणजे गुरुवारी रात्री नित्रृतियाग यज्ञ झाला. त्याप्रसंगी मांस,
मत्स्य आणि मदिरा यांची आहुती देण्यात आली. त्यानंतर शिवाजी व सोयराबाई
स्नान करून पुण्याहवाचनासाठी बसले.
शुक्रवार ५ जून हा राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस
होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळापासून पहाटेपर्यंत
हा मंगलविधी मोठ्या थाटामाटात पार पडला. शिवाजीराजे सिंहासनावर बसले.
मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व आणि अलौकिक असा दिवस
उजाडला. शिवाजी राजे झाले आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारतखंड
धन्य झाला. या समारंभाचे वर्णन सभासदाने आपल्या बखरीत करून ठेवले
आहे. “...सर्वांस नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले.
अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके घेऊन सुवर्णकलशपात्री
अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळींस नमस्कार
करून सिंहासनावर बसले. या युगी सर्व पृथीवर म्लेंच्छ बादशाह मन्हाटा
शिवराज्याभिषेक ७५
पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.”
शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगी इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन हा
रायगडावर हजर होता. त्याने आपल्या रोजनिशीमध्ये राज्याभिषेक समारंभाचे
वर्णन लिहून ठेवले आहे. त्याचप्रमाणे रायगड किल्ला, गडाचा मार्ग याविषयी
त्याने नोंद करून ठेवली आहे. ६ जून रोजी झालेल्या समारंभाविषयी तो
लिहितो, 'या दिवशी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झाला. संभाजी राजे,
पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली एका ओट्यावर बसले
होते.' सिंहासनाचे वर्णन करताना तो लिहितो, 'सिंहासनाच्या दोन्ही बाजूंस
सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे
असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला २ मोठी मोठ्या दाताच्या मत्स्यांची
सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मुल्यवान
भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह
म्हणून तळपत होती.' या शुभचिन्हांचा अनेक प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयत्न
इतिहासकारांनी केलेला आढळतो. साधारणपणे असे मानले जाते की मत्स्यचिन्ह
हे समुद्रवर्चस्वाचे प्रतिक आहे. अश्वपुच्छ हे सर्वांगसज्ज अशा अश्वदलाचे प्रतिक
आहे आणि तराजू हे निःपक्षपाती न्यायव्यवस्थेचे प्रतिक आहे. या ३ प्रतिकांवरून
शिवाजीचे सामर्थ्य तर स्पष्ट होतेच पण त्याचबरोबर जनतेला न्याय देण्यासाठी
आपण सिंहासनरूढ आहोत याची जाणीवही शिवाजीने तराजूच्या चिन्हाद्वारे
करून दिली.
राज्यारोहणप्रसंगी शिवाजी महाराजांनी नव शक किंवा कालगणना सुरू
केली. या शकाला 'राज्याभिषेक शक' किंवा 'राजशक' असेही म्हणतात.
मध्ययुगातील शककर्ता राजा म्हणून शिवाजीचा गौरवाने उल्लेख केला जातो.
ही कालगणना शिवाजीचे सार्वभौमत्व सूचित करणारी आहे. शिवाजीराजे
सिंहासनावर बसले आणि नवे युग सुरू झाले. म्हणून या प्रसंगी महाराजांनी .
शिवराई होन हे सोन्याचे नाणे पाडले. तसेच शिवराई म्हणून तांब्याचे नाणेही
पाडले. या नाण्यावर 'श्री राजा शिवछत्रपति' अशी अक्षरे कोरलेली आढळतात.
राज्याभिषेक झाला त्या घटकेपासून शिवाजी महाराजांनी 'क्षत्रिय कुलावतंस श्री
राजा शिवछत्रपति' हे नवे बिरूद धारण केले.
शिवाजी महाराजांना केवळ नवे राज्य स्थापन करावयाचे नव्हते तर
रामचंद्रपंत अमात्य म्हणतात त्याप्रमाणे 'नूतन सृष्टी निर्माण करावयाची होती.'
शेकडो वर्षे राजभाषा फारसी किंवा उर्दू असल्यामुळे संस्कृत आणि मराठी
७६ छत्रपती शिवाजी महाराज
भाषेला अवकळा प्राप्त झालेली होती. राजकीय पत्रव्यवहारातून तर मराठी शब्द
जवळजवळ हद्दपार झालेले होते. व्यवहारातही मोठ्या प्रमाणात उर्दूमिश्रित मराठी
भाषा प्रचारामध्ये आलेली होती. अशाप्रकारे मराठी भाषा, संस्कृती यांना
अवकळा प्राप्त झालेली होती. संस्कृत भाषा समजेनाशी झाली होती. आपल्या
राज्यातील हे मरगळलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी
महाराजांनी विविध प्रकारच्या योजना कार्यवाहित आणण्याचा निश्चय केला.
परकीय संस्कृतीचे सावट दूर करण्यासाठी आणि फारसी भाषेचा प्रभाव कमी
करण्यासाठी रघुनाथ पंडीत या विद्वानास ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्याची
आज्ञा शिवाजीने दिली. परंपरागत पंचांगपद्धतीमध्ये कालपरत्वे अनेक दोष
शिरलेले होते. ते दूर करण्यासाठी ‘करणकौत्सुभ’ नावाचा ग्रंथ लिहिण्याची
आज्ञा शिवाजीने कृष्ण ज्योतिषी यांना केली. या प्रसंगी शिवाजीने मुलकी,
लष्करी त्याचप्रमाणे धर्मविषयक आणि न्यायविषयक नवे कायदे केले. त्यांना
‘प्रशस्ती’ असे म्हणत. राजकीय पत्रव्यवहार कसा करावा या पद्धतीला
‘लेखनप्रशस्ती’ असे म्हणत. शिवाजीने बाळाजी आवजी चिटणीस यांना नवी
लेखनप्रशस्ती तयार करण्यास सांगितली आणि राजकीय पत्रव्यवहारामध्ये मराठी
शब्दांचे प्रमाण अधिकाधिक वाढावे म्हणून या प्रशस्तीमध्ये अनेक प्रकारचे
मराठी तर्जुमे करण्यास सांगितले. बाळाजी आवजी चिटणीस यांची लेखनप्रशस्ती
अद्यापही उपलब्ध नाही. परंतु त्यांनी तयार केलेले फुटकळ तर्जुमे पहावयास
मिळतात. त्यावरून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न शिवाजीने
कसा केला याची माहिती मिळते.
राज्याभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी आपल्या प्रधानमंडळाची रचना
केली. मंत्र्यांची फारसी नावे रद्द करून संस्कृत नावे प्रचारात आणली. ८
मंत्र्यांच्या आपल्या मंडळाला अष्टप्रधानमंडळ असे नामाभिधान करण्यात आले.
हा भव्य राज्याभिषेक समारंभ पहाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक
साधुपुरुष, संन्यासी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम असे विविध प्रकारचे
उपासक जमलेले होते. त्यांना यथोचित दान देण्यात आले.
नवे युग सुरू झाले
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर
भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १७व्या शतकामध्ये
जवळजवळ संपूर्ण भारतात एकही देशी सार्वभौम सत्ता अस्तित्वात नव्हती.
दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटींना समर्थपणे
शिवराज्याभिषेक ७७
झुंज देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. अशा परिस्थितीत
शून्यातून स्वराज्य निर्माण करून केवळ शाही राजवटींनाच नव्हे तर दिल्लीतील
प्रबळ मुघल सत्तेलाही आव्हान केले. पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले
यांनाही नामोहरम केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून एक समर्थ सार्वभौम
मराठा राज्य उदयास आणले याची ग्वाही दिली. या घटनेमुळे शेकडो वर्षे
गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना मिळाल्या.
महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात लावलेले हे स्वराज्याचे रोपटे पहाता पहाता बहरले,
कालांतराने मोठे झाले, त्याचा वृक्ष होऊन त्या वृक्षाच्या अनेकविध फांद्या
भारताच्या वेगवेगळ्या भागात पसरल्या आणि मराठी राज्याचे रूपांतर मराठा
साम्राज्यात झाले. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास मध्ययुगीन भारताच्या
इतिहासात शिवराज्याभिषेकाची घटना सुवर्णाक्षरांनी नमूद करण्यासारखी आहे.
एका वाक्यात सांगावयाचे झाले तर 'शिवराज्याभिषेकामुळे नवे युग अवतरले.'
दुसरा राज्याभिषेक
राज्याभिषेकाचा मोठा सोहळा पार पडल्यानंतर काही तंत्रमार्गी ब्राह्मणांच्या
आणि साधूंच्या आग्रहामुळे शिवाजीला दुसरा राज्याभिषेक करून घ्यावा लागला.
या दुसऱ्या राज्याभिषेकाची माहिती इतर कोणत्याही साधनात उपलब्ध नाही.
ज्येष्ठ महिन्यात झालेल्या मोठ्या अभिषेकानंतर शिवाजीने दुसरा राज्याभिषेक
पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने आश्विन शुद्ध पंचमी २४ सप्टेंबर १६७४
रोजी करून घेतला अशी माहिती 'शिवराज्याभिषेक कल्पतरू' नावाच्या
समकालीन संस्कृत ग्रंथामध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ
लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपूरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा
संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की, 'गागाभटाने
केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरित परिणाम
महाराजांना भोगावे लागत आहेत. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजराचा मृत्यू,
प्रतापगडावर वीज पडणे, शिवाजीची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू तसेच
राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे
राजमाता जिजाबाई हिचा झालेला मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून
असे अनुमान निघते की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज
गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार
करणारे पुरोहित वैदिक विधीपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि
म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांना पौराणिक किंवा तांत्रिक
७८ छत्रपती शिवाजी महाराज
अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.
गागाभट्टाच्या अभिषेकाने काही तांत्रिक चुका दर्शविल्या. त्यामुळे दुर्दैवी घटना
घडत आहेत असा निष्कर्ष या पुरोहितांनी काढला असावा. धार्मिक विधीविषयी
अशा प्रकारचे मतभेद नसावेत म्हणून शिवाजी महाराजांनी दुसऱ्या राज्याभिषेकाला
मान्यता दिली असली पाहिजे. त्याप्रमाणे २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी
महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. परंतु या राज्याभिषेकाचा
समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्य वखारवाल्यांनी
किंवा फारसी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाचा ओझरताही उल्लेख
केलेला आढळत नाही. विशेष म्हणजे विश्वसनीय अशा सभासद बखरीमध्ये
किंवा ९१ कलमी बखरीतही या दुसऱ्या राज्याभिषेकाचे वर्णन नाही. शिवचरित्रातील
अनेक घटना अचूक पद्धतीने जेथे शकावलीमध्ये नोंदविलेल्या आढळतात.
त्यातही या दुसऱ्या राज्याभिषेकाची तिथी दिलेली नाही किंवा ओझरता उल्लेखही
नाही. थोडक्यात हा दुसरा राज्याभिषेक तंत्रमार्गी पुरोहितांच्या समाधानासाठी
शिवाजी महाराजांनी करवून घेतला ही गोष्ट स्पष्ट होते. आपल्या मुलाने -
शिवाजीने शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि स्वतःला राज्याभिषेक करून
आपले राज्य हे सार्वभौम राज्य आहे हे सिद्ध केले या गोष्टीचा सर्वात मोठा
आनंद राजमाता जिजाबाईला होणे साहजिक आहे. या सुमारास जिजामातेचे
वय ७०च्या घरात होते. आपल्या मुलाचा राज्याभिषेक सोहळा पाहिल्यानंतर
या माऊलीला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले असेल यात शंका नाही.
राज्याभिषेकानंतर केवळ १२च दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी
जिजाबाईचा पाचाड येथे रहात्या घरी मृत्यू झाला. या शोककारक घटनेमुळे
रायगडवरील उत्साहाचे वातावरण संपुष्टात झाले. संभाजी राजांची मुंज पुढे
ढकलण्यात आली.
राज्याभिषेक सोहळा संपल्यानंतर शिवाजी महाराजांना मातृवियोगामुळे दुःख
झाले. पण थोर पुरुषाला आपले मन घट्ट करून कठीण प्रसंगांना सामोरे जावे
लागते. शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला आणि आपण
स्वतंत्र, सार्वभौम राजे आहोत असे जाहिर केले ही गोष्ट महाराजांच्या शत्रूंना
सहन होण्यासारखी नव्हती. मुघल, आदिलशहा आणि इतर शत्रूंनी महाराजांविरोधी
कारवाया सुरू केल्या. अर्थात या गोष्टींची शिवाजी महाराजांना कल्पना होतीच.
म्हणून १६७४च्या भर पावसाळ्यात त्यांनी आपल्या शत्रूविरुद्ध मोहिमा
आखण्यास प्रारंभ केला.
☐☐☐
शिवराज्याभिषेक ७९